New Marathi Biography Book: पुस्तक : व्रतस्थ ज्ञानसाधक स. मा. गर्गेलेखक : कविता भालेरावप्रकाशक : पॉप्युलर प्रकाशनडॉ. शैलेंद्र देवळाणकर.ज्येष्ठ पत्रकार, इतिहाससंशोधक आणि समाजविज्ञान कोशकार स. मा. गर्गे यांच्यावरील ‘व्रतस्थ ज्ञानसाधक स. मा. गर्गे’ हा चरित्रग्रंथ नुकताच प्रकाशित झाला. त्यांच्या कन्या कविता भालेराव यांनी हा ग्रंथ लिहिला असून, पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. या निमित्ताने गर्गे यांचा जीवनप्रवास, कार्य आणि विचारांचा घेतलेला हा वेध..महाराष्ट्राच्या वैचारिक इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी आहेत, की ज्यांचे कार्य अनेक ज्ञानशाखांमध्ये पसरलेले आहे. स. मा. गर्गे हे असेच आंतरज्ञानशाखीय व्यक्तिमत्त्व होते. इतिहास, राज्यशास्त्र, समाजकारण, राजकारण आणि संस्कृती यांचा त्यांनी अभ्यास केला होता. पाव शतकाहून अधिक काळ त्यांनी पत्रकारिता केली आणि संस्थाचालक म्हणूनही काम केले. ते चालता-बोलता ज्ञानकोश होते..Book Review: रानमेव्यासारख्या अनवट चवींच्या कथांचा संग्रह.संघर्षमय प्रवासबीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील लहुरी या छोट्याशा गावातून गर्गे यांचा शैक्षणिक प्रवास सुरू झाला. पुढे ते पुण्यात आले. त्या काळात पत्रकारितेसमोर मोठी आव्हाने होती. त्यांना प्रचंड आर्थिक अडचणींनाही तोंड द्यावे लागले. तरीही जिद्द आणि निष्ठेच्या बळावर त्यांनी पुण्यात स्वतःचे स्थान निर्माण केले. कविता भालेराव यांनी हा संघर्षमय प्रवास संवेदनशीलपणे मांडला आहे. त्यामुळे हा ग्रंथ एका व्यक्तीचे चरित्र असण्यासोबतच एका कालखंडाचा वैचारिक दस्तऐवजही आहे..समाजविज्ञानाचा मराठी कोश‘भारतीय समाजविज्ञान कोश’ हे गर्गे यांचे महत्कार्य आहे. आठ-दहा वर्षांच्या परिश्रमातून आणि शंभराहून अधिक अभ्यासकांच्या सहभागातून सहा खंडांचा हा कोश साकारला गेला. या माध्यमातून समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय राजकारण हे विषय पहिल्यांदाच मराठीत उपलब्ध झाले. या कोशाचा उपयोग आजही होतो..इतिहास आणि आगरकरगो. स. सरदेसाई यांच्या आठ खंडांच्या ‘मराठी रियासत’च्या नव्या आवृत्तीचे ते संपादक होते. कोल्हापूर राजघराण्याचा इतिहास मांडणारी ‘करवीर रियासत’ त्यांनी लिहिली. ‘इतिहासाची साधने : एक शोधयात्रा’ हा त्यांचा ग्रंथ आजही संदर्भग्रंथ म्हणून वापरला जातो. नॅशनल बुक ट्रस्टसाठी लिहिलेल्या ‘गोपाळ गणेश आगरकर’ या चरित्रात आगरकरांचे विविध पैलू गर्गे यांनी उलगडले आहेत..Book Review: म्हणी, वाक्प्रचारातून मोहरणारी मायबोली!.राज्यशास्त्र आणि जागतिक दृष्टी‘राज्यशास्त्राचा विकास’ हे गर्गे यांचे पहिले पुस्तक! पुढे ‘सुलभ राज्यशास्त्र’ आणि ‘भारतीय राज्यघटनेचा इतिहास’ हे ग्रंथ आले. ‘शांतिपर्वातील कथा’मधून त्यांनी महाभारतातील राजधर्माचा वेध घेतला. ‘समाज, विज्ञान आणि संस्कृती’मध्ये त्यांनी औद्योगिक क्रांती, साम्राज्यवाद आणि प्रातिनिधिक लोकशाहीचा जागतिक प्रवास मांडला. जग जवळ आल्यामुळे पौर्वात्य-पाश्चात्त्य भेद ओसरत आहे अशी त्यांची भूमिका होती. ज्येष्ठ पत्रकार अनंतराव भालेराव, साहित्यिक सुधीर रसाळ, न्या. नरेंद्र चपळगावकर आणि अभ्यासक भगवंतराव देशमुख यांचा त्यांना सहवास लाभला..माझे गर्गेऋणमराठवाड्यात वाचनसंस्कृती रुजवणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या बलवंत वाचनालयात मी लहानपणी वाचनाचे धडे गिरवले. पुढे पुण्यात मराठवाडा मित्र मंडळाच्या वसतिगृहात मी काही काळ वास्तव्य केले. मराठवाड्यातून आलेल्या माझ्यासारख्या विद्यार्थ्याला त्या वसतिगृहाने आधार दिला. २००८ मध्ये माझ्या ‘भारताचे परराष्ट्र धोरण : सातत्य व स्थित्यंतर’ (प्रतिमा प्रकाशन, पुणे) या ग्रंथाला प्रतिष्ठेचा ‘स. मा. गर्गे उत्कृष्ट वैचारिक ग्रंथ पुरस्कार’ मिळाला. त्यामुळे त्यांच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन माझ्या हस्ते होणे, हा माझ्यासाठी ऋणानुबंधाचा क्षण ठरला..सत्यशोधन आणि नवमानवतावादसत्याचा शोध हे गर्गे यांच्या अभ्यासाचे मुख्य वैशिष्ट्य होते. त्यांनी माहितीचे केवळ प्रसारण केले नाही, तर माहितीचे विच्छेदन केले. आज माहितीचा महापूर आहे, पण तिची चिकित्सा दुर्मीळ झाली आहे. अशा काळात त्यांची ही दृष्टी विशेष महत्त्वाची ठरते. संघर्ष आणि ध्रुवीकरणाच्या युगात त्यांची नवमानवतावादाची संकल्पनाही दिशादर्शक आहे..दस्तऐवजीकरणाची गरजकविता भालेराव यांनी जवळपास तीन वर्षांच्या परिश्रमातून हा ग्रंथ साकारला आहे. अशा प्रकारे ग्रंथ साकार झाले, तर भारतीय विचारवंत, समाजशास्त्रज्ञ आणि राज्यशास्त्रज्ञ जागतिक तोडीचे आहेत, हे जगासमोर येईल. स्थानिक ज्ञानपरंपरा जपत जागतिक दृष्टिकोन विकसित करण्याची प्रेरणा स. मा. गर्गे यांचे जीवनकार्य देते.(लेखक महाराष्ट्र राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक असून, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.