Farming Crisis : नागपूर पावसाच्या दीर्घ खंडामुळे विदर्भातील खरीप पिकांवर संकटाचे सावट गडद झाले आहे. कापसाची शाखीय वाढ थांबली असून, फुलोरा अवस्थेतील पिकाला पाण्याची नितांत गरज आहे. पूर्व विदर्भातील धानपट्ट्यासह अमरावती विभागातील खरीप पिकांची स्थितीही चिंताजनक बनली आहे. येत्या काही दिवसांत पुरेसा पाऊस न झाल्यास पिकांच्या उत्पादकतेवर थेट परिणाम होण्याची भीती कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे..पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांत खरीपाचे मोठे क्षेत्र आहे. यातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोलीसह काही भाग हा प्रमुख धानपट्टा म्हणून ओळखला जातो. विभागीय कृषी विभागाच्या माहितीनुसार, या सहा जिल्ह्यांत खरीपाचे सरासरी क्षेत्र १८ लाख ९५ हजार ९११ हेक्टर आहे. त्यापैकी १८ लाख ५२ हजार ८६३ हेक्टरवर पेरणी झाली असून, पेरणीची टक्केवारी ९८ टक्के इतकी आहे..Kharif Crop Crisis: पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात खरीप पिके संकटात.मात्र, पेरण्या जवळपास पूर्ण झाल्या असल्या तरी पावसाच्या अनियमिततेने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. एक जूनपासून आतापर्यंत या सहा जिल्ह्यांत सरासरी ६१३.३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण सरासरीच्या ७३.९० टक्के असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी दिली. .१८ मंडलांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊसपूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान असलेल्या मंडलांची संख्या १८ इतकी आहे. यात वर्धा जिल्ह्यात पाच, नागपूरमध्ये आठ, भंडाऱ्यात एक आणि चंद्रपूरमध्ये चार मंडलांचा समावेश आहे. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत अशा मंडलांची संख्या शून्य आहे..Marathwada Rain Break: मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत पिके ताणावर.अमरावती विभागात निम्म्याहून कमीपश्चिम विदर्भातील अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतही पावसाची परिस्थिती समाधानकारक नाही. ऑगस्ट महिन्यात या पाच जिल्ह्यांचे सरासरी पर्जन्यमान २६७.५ मिलिमीटर अपेक्षित असताना आतापर्यंत केवळ १३२.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच सरासरीच्या अवघा ५०.९ टक्के पाऊस झाला आहे..गत वर्षी याच कालावधीत या भागात ६०७.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यावेळी पावसाचे प्रमाण सरासरीच्या १००.६ टक्के होते. यंदा मात्र पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीन, कापूस, तूर आणि इतर खरीप पिकांची वाढ प्रभावित होत आहे. अनेक भागांत शेतकरी पिके सावरण्यासाठी संरक्षित सिंचनाचा आधार घेत आहेत; मात्र मर्यादित पाणीसाठ्यामुळे हा पर्यायही उपलब्ध नाही..कापूस सध्या अनेक भागांत फुलोरा अवस्थेत असून, पाण्याच्या ताणामुळे शाखीय वाढ खुंटली आहे. सोयाबीनची स्थिती तुलनेने समाधानकारक दिसत असली तरी दीर्घकाळ पावसाचा खंड राहिल्यास शेंगा भरण्याच्या अवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे..पावसाच्या खंडामुळे कापसामध्ये शाखीय वाढ थांबली आहे. सध्या हे पीक फुलोरा अवस्थेत आहे, त्यामुळे पिकाला पाण्याची नितांत गरज आहे. सोयाबीनची स्थिती काहीशी समाधानकारक असली तरी या पिकातही उत्पादकतेवर परिणाम होईल, अशी भीती आहे. तुरीच्या बाबतीतही असेच सांगता येईल.- डॉ. विनोद खडसे, कृषी विद्यावेत्ता, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, नागपूर कृषी महाविद्यालय.पावसाने खंड दिल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. त्यासोबतच शेतांत तणाचा प्रादुर्भावही वाढला आहे. ढगाळ वातावरण असल्यामुळे कीड-रोगांचा प्रादुर्भावदेखील दिसून येत आहे. अशा तिहेरी संकटामुळे परिस्थिती अवघड झाली आहे. पावसाबाबत अनिश्चितता व्यक्त करण्यात आल्याने पिकाच्या व्यवस्थापनावर खर्च करावा की नको, ही भीतीदेखील आहे.- अरुण पाटील ठाकरे, धानोरा, ता. दिग्रस, जि. यवतमाळ.सोयाबीनमध्ये तणांचा प्रादुर्भाव वाढल्याने किती व्यवस्थापन करावे आणि किती खर्च करावा, असा प्रश्न भेडसावत आहे. पावसाची अनिश्चितता लक्षात घेता कृषी विभागाकडून आपत्कालीन पीक नियोजनाबाबत तातडीने मार्गदर्शन मिळण्याची गरज आहे.- विकास मोहन राठोड, काटखेडा, ता. पुसद, जि. यवतमाळ.सुरुवातीला बियाणे, खते आणि आंतरमशागतीवर मोठा खर्च झाला. आता पावसाने ओढ दिल्याने पिकांची अवस्था बिकट झाली आहे. कपाशीवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादकतेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.- निर्मला बाबूराव जाधव, धानोरा, ता. दिग्रस, जि. यवतमाळ.साडेतीन एकर सोयाबीन तर चार एकर कापसाची लागवड केली आहे. कपाशी व सोयाबीन पिकावर ढगाळ वातावरणाच्या परिणामी रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. किती वेळा फवारणी करूनही अपेक्षित फरक पडला नाही. आता पीक वाचवण्यासाठी केवळ पावसाचाच एकमेव आधार आहे.- सतीश देशमुख, येरमल, ता. आर्णी, जि. यवतमाळ.पाच एकर सोयाबीन, तीन एकर कपाशी आणि अर्ध्या एकरावर झेंडूची लागवड केली आहे. मात्र, महिनाभरापासून पावसाने खंड दिल्याने पीक वाचविण्यासाठी सध्या संरक्षित सिंचनाचा पर्याय अवलंबिला जात आहे. त्यातही पाणीसाठा मर्यादित असल्यामुळे आतापासूनच चिंता वाटत आहे.- राजूभद्र बगाटे, काली दौलतखान, जि. यवतमाळ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.