डॉ. समाधान सुरवसे सौ. ज्योती खराडे डॉ. सागर पाटील Sustainable Farming: शेणखताचे मूल्यसंवर्धन करण्यासाठी योग्य कुजवण प्रक्रिया, ओलावा व तापमानाचे व्यवस्थापन, सावलीत सुरक्षित साठवण महत्त्वाची आहे. शेणखतामध्ये पीक अवशेषांचा वापर तसेच आवश्यकतेनुसार उपयुक्त सूक्ष्मजीव किंवा जैविक घटकांचा वापर करता येतो. अशा प्रकारे मूल्यसंवर्धित शेणखत हे केवळ सेंद्रिय पदार्थाचा स्रोत न राहता जमिनीच्या आरोग्य सुधारण्यासाठी प्रभावी निविष्ठा बनते. .रासायनिक खतांसोबत चांगले कुजलेले शेणखत वापरणे हे जमिनीची दीर्घकालीन सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी आणि शाश्वत ऊस उत्पादनासाठी अत्यावश्यक आहे. परंतु ताजे शेणखत, अपूर्ण कुजलेले किंवा अयोग्य पद्धतीने साठविले असल्यास त्यातील नत्रासह इतर अन्नद्रव्यांची हानी होते आणि त्याचा पिकाला अपेक्षित लाभ मिळत नाही. त्यामुळे शेणखताचे योग्य पद्धतीने मूल्यसंवर्धन व प्रक्रिया करणे आवश्यक आहे. शेणखताचे मूल्यसंवर्धन म्हणजे त्याचे कुजविणे, पोषक घटकांची हानी कमी करणे, उपयुक्त सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता वाढविणे आणि त्याची गुणवत्ता व अन्नद्रव्य उपलब्धता सुधारणे होय. योग्य प्रक्रिया केलेल्या शेणखतामध्ये सेंद्रिय पदार्थ अधिक स्थिर स्वरूपात उपलब्ध होतात, दुर्गंधी कमी होते, तणांच्या बिया व काही रोगकारक घटकांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते आणि जमिनीत सेंद्रिय कर्बाची भर पडते. यामुळे जमिनीची भौतिक, रासायनिक आणि जैविक सुपीकता सुधारते..Microbial Soil Management: अन्नद्रव्य व्यवस्थापनात सूक्ष्मजीव महत्त्वाचे.शेणखताचे कंपोस्टिंगशेण, गोठ्यातील कचरा, पिकांचे अवशेष, पालापाचोळा इत्यादी सेंद्रिय पदार्थांचे योग्य आर्द्रता, हवा, तापमान आणि सूक्ष्मजीवांच्या क्रियाशीलतेच्या साह्याने नियंत्रित विघटन करून उत्तम दर्जाचे कंपोस्ट तयार करता येते. ताजे शेण, गोठ्यातील कचरा, गोमूत्रमिश्रित माती, ऊस पाचट, वाळलेले गवत, पालापाचोळा आणि इतर सेंद्रिय अवशेष एकत्र करावेत. प्लॅस्टिक, काच, धातू किंवा इतर असेंद्रिय पदार्थ वेगळे काढावेत..पाण्याचा निचरा चांगला होणाऱ्या, सावलीच्या व पूर न येणाऱ्या ठिकाणी कंपोस्ट खड्डा किंवा ढीग तयार करावा. साधारण १.५ ते २ मी. रुंद आणि आवश्यकतेनुसार १ ते १.५ मी. उंच ढीग ठेवणे सोईचे असते. लांबी उपलब्ध जागेनुसार ठेवता येते.प्रथम तळाशी पिकांचे अवशेष किंवा कोरडे सेंद्रिय पदार्थांचा थर द्यावा. त्यावर शेणाचा थर द्यावा. अशा प्रकारे कोरडे पदार्थ, शेण, ओलसर सेंद्रिय पदार्थ यांचे थर तयार करावेत. प्रत्येक थरावर थोडे पाणी शिंपडावे. कंपोस्टिंगसाठी शिफारस केलेले जैविक विघटक सूक्ष्मजीव वापरल्यास विघटनाची प्रक्रिया अधिक परिणामकारक होऊ शकते..कंपोस्टिंगसाठी पदार्थात साधारण ५० ते ६० टक्के आर्द्रता असणे योग्य असते. पदार्थ हातात घट्ट दाबल्यावर तो ओलसर वाटला पाहिजे; मात्र पाणी गळता कामा नये. ढीग कोरडा झाल्यास पाणी शिंपडावे आणि अति पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. ढीग अतिशय घट्ट दाबू नये. १५ ते २० दिवसांनी एकदा ढीग उलटपालट करून आतील पदार्थ बाहेर व बाहेरील पदार्थ आत येतील अशा पद्धतीने मिसळावेत. यामुळे समान विघटन होण्यास मदत होते.सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे सुरुवातीला कंपोस्ट ढिगाचे तापमान वाढते. या उष्ण अवस्थेमुळे अनेक तणांच्या बिया व काही रोगकारक घटक नष्ट होण्यास मदत होते. तापमान कमी झाल्यानंतर ढीग उलटपालट करून पुन्हा हवा उपलब्ध करून द्यावी..योग्य आर्द्रता आणि हवा राखल्यास साधारण २ ते ३ महिन्यांत चांगले कुजलेले कंपोस्ट तयार होते. वापरलेल्या पदार्थानुसार कालावधी कमी-जास्त होऊ शकतो.तयार कंपोस्ट गडद तपकिरी ते काळसर, भुसभुशीत आणि मातीसारखे दिसते. मूळ शेण किंवा पिकांचे अवशेष सहज ओळखू येत नाहीत आणि तीव्र दुर्गंधी राहत नाही. तापमानही सामान्य वातावरणाच्या जवळ आलेले असते. तयार कंपोस्ट पावसापासून सुरक्षित, सावलीच्या ठिकाणी साठवावे. उघड्यावर पावसात ठेवल्यास त्यातील विद्राव्य अन्नद्रव्यांची हानी होते..गोमूत्राचे संकलन आणि वापरगोमूत्र हे शेणखताच्या मूल्यसंवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचे असून त्यामध्ये नत्र, पालाश तसेच काही विद्राव्य अन्नद्रव्ये असतात. गोमूत्र गोठ्याच्या फरशीवरून वाहून गेल्यास किंवा उघड्यावर साचून राहिल्यास त्यातील अन्नद्रव्यांची मोठ्या प्रमाणात हानी होते. त्यामुळे मूत्र वाया न जाता ते शेणखत, पिकांचे अवशेष किंवा इतर शोषक सेंद्रिय पदार्थांमध्ये शोषले जाईल अशी व्यवस्था करणे आवश्यक आहे.गोठ्याची रचना : गोठ्याची फरशी किंचित उताराची ठेवावी, जेणेकरून गोमूत्र एका निश्चित दिशेने वाहून जाईल. गोठ्याच्या शेवटी मूत्र संकलनासाठी नाली व बंदिस्त टाकी तयार करावी. नालीमध्ये गळती होणार नाही याची काळजी घ्यावी..Soil Management : मातीचा जिवंतपणा जपण्यासाठी सेंद्रिय कर्ब आवश्यक.शोषक पदार्थांचा वापर : गोठ्यात शेणासोबत पिकांचे अवशेष, ऊस पाचट, वाळलेले गवत, भुसा, पालापाचोळा किंवा इतर सेंद्रिय पदार्थ अंथरावेत. हे पदार्थ गोमूत्र शोषून घेतात आणि त्यातील विद्राव्य अन्नद्रव्ये सेंद्रिय पदार्थांमध्ये धरून ठेवण्यास मदत करतात.गोमूत्र शेणखतात मिसळणे : गोठ्यातून संकलित झालेले गोमूत्र थेट कंपोस्टच्या ढिगावर किंवा शेणखतावर योग्य प्रमाणात शिंपडता येते. यामुळे गोमूत्रातील अन्नद्रव्ये कंपोस्टच्या सेंद्रिय पदार्थांमध्ये मिसळतात. गोमूत्र उघड्यावर साठवून ठेवण्याऐवजी ते शेणखताच्या ढिगात शोषून घेणे अधिक फायदेशीर ठरते..कंपोस्ट ढिगामध्ये योग्य आर्द्रता गोमूत्राचा वापर करताना कंपोस्ट ढिगामध्ये अति पाणी होणार नाही याची काळजी घ्यावी. आधीच ओलसर असलेल्या ढिगावर मोठ्या प्रमाणात गोमूत्र एकाच वेळी टाकू नये. आवश्यकतेनुसार थोड्या प्रमाणात शिंपडून सेंद्रिय पदार्थांमध्ये समान रीतीने मिसळावे.कंपोस्टिंग दरम्यान व्यवस्थापन : गोमूत्र मिसळलेले शेण व सेंद्रिय पदार्थांचे कंपोस्ट करताना ढिगामध्ये पुरेशी हवा खेळती राहण्यासाठी वेळोवेळी उलटापालट करावी. यामुळे सेंद्रिय पदार्थांचे समान विघटन होते आणि मूत्रातील अन्नद्रव्ये तयार होणाऱ्या कंपोस्टमध्ये समाविष्ट होण्यास मदत होते.तयार झालेले मूल्यसंवर्धित शेणखत : योग्य पद्धतीने गोमूत्र, शेण आणि सेंद्रिय पदार्थ कुजविल्यामुळे तयार होणाऱ्या कंपोस्टमध्ये सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश आणि दुय्यम तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात..ऊस पाचट आणि इतर पीक अवशेषांचे मिश्रणऊस तुटून गेल्यानंतर सर्वसाधारणपणे ८ ते १० टन प्रति हेक्टरी पाचट शेतामध्ये राहते. शेतकऱ्यांचा पाचट जाळून टाकण्याकडे कल असतो, यामुळे सेंद्रिय पदार्थांची मोठी हानी होऊन जमिनीची सुपीकता आणि उत्पादनक्षमता कमी होते. यासाठी पाचट किंवा इतर पीक अवशेष जाळण्याऐवजी शेणासोबत योग्य पद्धतीने कंपोस्टिंग केल्यास त्यांचे प्रभावी पुनर्चक्रण करून उच्च दर्जाचे मूल्यसंवर्धित सेंद्रिय खत तयार करता येते.प्रथम ऊस पाचट व इतर जाड सेंद्रिय अवशेष शक्यतो बारीक करून लहान तुकडे केल्याने सूक्ष्मजीवांकडून विघटनाची प्रक्रिया जलद होते. त्यानंतर शेण, ऊस पाचट, पालापाचोळा, कडबा व इतर सेंद्रिय पदार्थांचे एकाआड एक थर तयार करून प्रत्येक थरावर आवश्यकतेनुसार पाणी शिंपडावे..वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे कुजविणारे जिवाणू वापरल्यास सेंद्रिय अवशेषांच्या विघटनास चालना मिळण्यास मदत होते. कंपोस्ट ढिगामध्ये साधारण ५० ते ६० टक्के आर्द्रता राखावी आणि पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. या प्रक्रियेमध्ये शेणातील सूक्ष्मजीव तसेच जैविक विघटक सेंद्रिय अवशेषांचे विघटन करून त्यांचे स्थिर सेंद्रिय पदार्थांमध्ये रूपांतर करण्यास मदत करतात.ऊस पाचटासारख्या कार्बनयुक्त पदार्थांमुळे कंपोस्टमध्ये सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते, तर शेणामुळे सूक्ष्मजीवांना आवश्यक पोषक घटक व आर्द्रता मिळण्यास मदत होते..जैविक विघटकांचा वापरसेंद्रिय पदार्थांचे जलद, समतोल आणि कार्यक्षम विघटन करण्यासाठी योग्य जैविक विघटकांचा वापर करता येतो. जैविक विघटकांमध्ये सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे उपयुक्त सूक्ष्मजीव असतात. सूक्ष्मजीव शेण, पिकांचे अवशेष, ऊस पाचट, पालापाचोळा आणि इतर सेंद्रिय पदार्थांवर कार्य करून त्यांचे विघटन जलद करतात. त्यामुळे कठीण व तंतुमय पदार्थांचे विघटन होऊन ते अधिक स्थिर सेंद्रिय पदार्थांमध्ये रूपांतरित होतात आणि अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध होण्यास मदत होते.वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने विकसित केलेले कुजविणारे जिवाणू शेणखत, ऊस पाचट, इतर पीक अवशेष, पालापाचोळा व सेंद्रिय पदार्थांच्या विघटन प्रक्रियेला चालना देण्यासाठी उपयुक्त ठरतात. या जिवाणूंच्या वापरामुळे सेंद्रिय पदार्थांचे विघटन जलद व कार्यक्षम पद्धतीने होण्यास मदत होते..ट्रायकोडर्मा हे सेंद्रिय पदार्थांच्या विघटनास चालना देण्याबरोबरच मुळांच्या परिसरातील काही रोगकारक बुरशींचे नियंत्रण करण्यास मदत करणारे उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत. ॲझोटोबॅक्टर वातावरणातील नत्राचे जैविक स्थिरीकरण करून पिकाला उपलब्ध होणाऱ्या नत्राच्या पुरवठ्यात हातभार लावतो. स्फुरद उपलब्ध करून देणारे जिवाणू जमिनीत अल्पविद्राव्य स्वरूपात असलेला स्फुरद विद्राव्य स्वरूपात आणून तो पिकांना उपलब्ध होण्यास मदत करतात. पोटॅशिअम विरघळविणारे सूक्ष्मजीव जमिनीतील अविद्राव्य पालाशचे विद्राव्य स्वरूपात रूपांतर करण्यास मदत करून पिकासाठी पालाशची उपलब्धता वाढविण्यास हातभार लावतात. सेल्युलोलाइटिक सूक्ष्मजीव ऊस पाचट, कडबा, गवत व इतर तंतुमय सेंद्रिय अवशेषांमधील सेल्युलोजचे विघटन करून त्यांचे कंपोस्टमध्ये जलद रूपांतर होण्यास मदत करतात.- डॉ. समाधान सुरवसे ९८६०८७७०४९- सौ. ज्योती खराडे ८२७५०३३८२३(वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु., पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.