Maharashtra Sericulture : परभणी उझी माशीच्या नियंत्रणासाठी निसोलीनक्स थायमस या मित्रकीटकांचा वापर पर्यावरणपूरक आहे. रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी या मित्रकीटकांच्या पाऊचचा (एनटी पाऊच) वापर करण्यावर भर देण्याची गरज आहे, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. धीरजकुमार कदम यांनी दिली..राज्यासह मराठवाड्यात शेतीपूरक रेशीम उद्योगाचा विस्तार होत आहे. अनेक शेतकरी वर्षभर सातत्याने रेशीम कोषाचे उत्पादन घेत आहेत. रेशीम कीटकांवर उझी माशीचा कमी-अधिक प्रमाणात प्रादुर्भाव होत असल्याचे आढळून आले आहे. पावसाळा आणि हिवाळ्यात उझी माशीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळतो..Mulberry Farming: जालन्यात पाच हजार एकरांवर तुती लागवडीचे उद्दिष्ट .उझी माशीच्या प्रादुर्भावामुळे रेशीम कोष उत्पादनाचे साधारणतः १५ ते २० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. प्रादुर्भाव अधिक झाल्यास हे नुकसान ४० ते ५० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. उझी माशीचा जीवनक्रम १८ ते २२ दिवसांत पूर्ण होतो. प्रादुर्भावग्रस्त रेशीम कीटकांच्या शरीरावर काळे डाग दिसून येतात..उझी माशीच्या नियंत्रणासाठी परोपजीवी मित्रकीटक निसोलीनक्स थायमस (एनटी) यांचे संगोपन करणे गरजेचे आहे. १०० अंडीपुंजांसाठी या परोपजीवी मित्रकीटकांचे तीन पाऊच लावावेत. रेशीम कीटक कोषावर गेल्यानंतर निसोलीनक्स थायमसचे पाऊच चंद्रिकेजवळ ठेवावेत..Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन.उझी माशीच्या कोषावर उपजीविका करणारे निसोलीनक्स थायमस (एनटी) पाऊच रेशीम कीटकांनी चौथी कात टाकल्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी रॅकच्या मध्यभागी टांगून ठेवावेत. त्यातून मित्रकीटक बाहेर पडून उझी माशीचे प्युपा शोधतात आणि त्यामध्ये अंडी घालून ते नष्ट करतात. त्यामुळे उझी माशीची संख्या कमी होऊन कोषाचे होणारे नुकसान टाळता येते..कोष काढणीनंतर एनटी पाऊच खताच्या खड्ड्याजवळ ठेवावेत. रेशीम उद्योजक या मित्रकीटकांची मागणी करत असून, सर्व रेशीम उद्योजकांनी या मित्रकीटकांच्या पाऊचचा वापर करावा, असे आवाहन रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. धीरजकुमार कदम, डॉ. संजोग बोकन, धनंजय मोहोड आणि केंद्रीय रेशीम संशोधन मंडळाच्या विस्तार केंद्राचे डॉ. अशोक जाधव यांनी केले आहे..वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन योजनेच्या प्रयोगशाळेत निसोलीनक्स थायमस पाऊचचे (एनटी पाऊच) उत्पादन सुरू आहे. आगाऊ रक्कम अदा करून मागणी केल्यास कुरिअरच्या साह्याने एनटी पाऊच पाठविले जातात. अधिक माहितीसाठी डॉ. संजोग बोकन (९९२१७५२०००) यांच्याशी संपर्क साधावा.