आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिने चातुर्मास काळ संबोधला जातो. सण-उत्सव आणि व्रतवैकल्यांचे हे पर्व समजले जाते. याच काळात दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र असे उत्सव तर नागपंचमी, दसरा, दिवाळी असे सण असतात. नुकताच श्रावण मास संपून गणेशोत्सवास धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. सण-उत्सव काळात घरात आनंदी वातावरण तर बारातही चैतन्य फुललेले पाहावयास मिळते. धार्मिक विधी, सण-उत्सवाच्या अनुषंगाने ग्राहकांची खरेदी लगबग असते. .नेमक्या अशावेळी कृत्रिम फुलांच्या उठलेल्या बाजाराने नैसर्गिक फुल बाजार मात्र कोमेजलेला आहे. सण-उत्सवच नाही तर लग्न सोहळे, वाढदिवस, नेहमीची घर सजावट अशा कोणत्याही समारंभात कृत्रिम फुलांचाच वापर वाढला आहे. हार, तोरण, कंठी, फुलदाण्या, माळा, रंगीबेरंगी पडदे यामध्ये कृत्रिम फुलापानांचा वापर होत आहे. टिकाऊ, दिसायला आकर्षक, सजावटीसाठी सोपी यामुळे नैसर्गिक फुलांपेक्षा थोडी महाग असली तरी ग्राहकांचा कल कृत्रिम फुलांकडे दिसतो..Artificial Flowers: कृत्रिम फुलांवरील बंदीची घोषणा हवेतच.परंतु यामुळे पर्यावरण धोक्यात येत असून, फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसत आहे. प्लॅस्टिकच्या बेसुमार वापराने मुळातच पर्यावरणीय अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यात प्लॅस्टिकच्या फुलांची भर पडली आहे. प्रश्न केवळ प्रदूषणाचा नाही तर नैसर्गिक फुलांचा गंध हरवून गेल्याने सण-उत्सवातील चैतन्यमय वातावरण, सकारात्मक ऊर्जेलाही आपण मुकत आहोत..सण-उत्सवांचा हंगाम साधायचा या अनुषंगाने शेतकरी फुलशेतीचे नियोजन करतात. अलीकडच्या काळात रोप निर्मितीपासून ते फुलांची विक्री यांचा खर्च वाढला आहे. पॉलिहाउसमधील फुलशेतीसाठी तर सुरुवातीची गुंतवणूक अधिक असते, शिवाय वार्षिक व्यवस्थापनावरही शेतकरी मोठा खर्च करतात. त्यात वाढत्या नैसर्गिक आपत्ती आणि दरातील मोठा चढउतार यामुळे फुल उत्पादक अडचणीत आहेत..Artificial flowers: कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालावी.अशावेळी ऐन हंगामात कृत्रिम फुलांमुळे नैसर्गिक फुलांची मागणी घटून त्यांना दर कमी मिळत आहेत. मागील दशकभरात कृत्रिम फुलांचा बाजार वाढत जाऊन आज ८० टक्क्यांपर्यंत व्यापला आहे. त्यामुळे राज्यात अनेक शेतकऱ्यांनी फुलशेती करणे सोडून दिले आहे. कृत्रिम फुलांवर बंदी आणण्याची मागणी फूल उत्पादक मागील अनेक वर्षांपासून करीत आहेत. अशावेळी ही बंदी कधी आणणार, याचे उत्तर त्यांना मिळायला हवे. कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची मागणी पावसाळी अधिवेशनातही अनेक आमदारांनी लावून धरली होती..त्यानंतर फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा करून याबाबतचा निर्णय लवकरच केला जाईल, अशी घोषणा केली. परंतु प्लॅस्टिक फुलांच्या बंदीवर राज्यात अजून ठोस निर्णय होऊ शकला नाही. खरे तर पर्यावरण आणि फलोत्पादन व कृषी मंत्रालयाशी संबंधित हा निर्णय असल्याने या सगळ्यांनी एकत्र बसून याबाबत तत्काळ निर्णय व्हायला हवा. फलोत्पादन मंत्र्यांच्या घोषणेप्रमाणे जुलैमध्ये हा निर्णय झाला असता तर या हंगामात कष्ट करून उत्पादित केलेल्या शेतकऱ्यांच्या फुलांना चांगला दर मिळाला असता..पर्यावरस्नेही सण-उत्सव साजरे करण्याचा सल्ला दिला जातो. त्याअनुषंगाने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवर निर्बंध आहेत. थर्मोकोलच्या आरास आणि मखरांवर यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. अशावेळी कृत्रिम प्लॅस्टिकच्या फुलांवरील बंदीबाबत मात्र अक्षम्य दिरंगाई होत आहे. राज्य सरकारने प्लॅस्टिक फुलांचा व्यापार करणाऱ्यांची काळजी करण्यापेक्षा येथील शेतकरी आणि पर्यावरण वाचविण्याचा विचार करायला हवा. त्याशिवाय कृत्रिम फुलांवरील बंदीचा ठोस निर्णय होणार नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.