Make America Greate Again: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी अमेरिकेला ‘पुन्हा महान’ बनविण्यासाठी ‘MAGA’ कार्यक्रम हाती घेतला. पहिले पाऊल उचलले ते अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांना हाकलण्याचे. दुसरे काम केले ते, ज्या देशांबरोबर अमेरिकेचा व्यापार आहे त्या देशांनी अमेरिकी वस्तूंवर जितके आयात कर लावले तितके त्यांच्या देशातील आयातीवर सुद्धा लादले. यामुळे जगभर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली..भारतावर अमेरिकेचा दबावभारताबरोबर बोलणी करताना अमेरिकेने काही अटी घातल्या. भारतात आयात होणाऱ्या कृषी उत्पादनांवरील आयात कर घटविणे व अमेरिकेत तयार झालेले जनुक सुधारित (जीएम) सोयाबीन, मका, गहू भारतात आयात करण्यासाठी व्यापार खुला करावा. तसेच दुग्धजन्य पदार्थ, पोल्ट्री उत्पादने भारतात आयात करण्यास कमी आयात कर लावून स्वीकारण्यास मान्यता द्यावी. या शर्ती मान्य केल्या तर भारतातील शेतकऱ्यांना आपला माल मातीमोल भावाने विकावा लागेल हे निश्चित म्हणून कोणत्याही परिस्थितीत भारताला या अटी मान्य करणे शक्य नाही..भारत असे करण्यास तयार नाही, हे लक्षात येताच ट्रम्प यांनी भारताकडून आयात होणाऱ्या मालावर अगोदर २५ टक्के व नंतर ५० टक्के आयात कर ठोकला. अशा परिस्थितीत अमेरिकेतील बाजारात भारतीय माल स्पर्धात्मक राहू शकत नाही व निर्यात ठप्प होणार. याचा सर्वांत जास्त परिणाम भारतातून जाणाऱ्या तांदूळ, मासळी आणि कापड उद्योगावर होणार आहे. इतर शेतीमाल आपण फारसा अमेरिकेला निर्यात करत नाही..Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचे पालुपद.अमेरिकेतून भारतात येणाऱ्या मालावर सरासरी ३९ टक्के आयात कर आकारला जातो व भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या माळावर फक्त ५ टक्के आयात कर आहे. यामुळे अमेरिकेचा जवळपास ४५ बिलियन डॉलरचा व्यापारिक घाटा आहे. या बाबतच ट्रम्प यांची तक्रार आहे. भारत हा जगातील सर्वांत जास्त कस्टम ड्यूटी करणारा देश आहे म्हणून ट्रम्प भारताला ‘टेरिफ किंग’ म्हटले..भारताला सुधारण्याची गरजभारत बहुतेक कच्चा मालच निर्यात करतो. भारताच्या व्यापारावर जर असे निर्बंध लादले गेले, तर आपल्याला नाइलाजाने का होईना सुधारणा करावी लागेल. जगाच्या बाजारपेठेत टिकेल व विकेल असा निर्यातक्षम माल तयार करावा लागेल. या आपत्तीचे इष्टापत्तीत रूपांतर करावे लागले. त्यासाठी काही सुधारणा कराव्या लागतील. प्रक्रिया उद्योग उभे करणे व्यापार करण्यामध्ये सरकारी दखल कमीत कमी असावी, भ्रष्टाचाराला वाव देणारे कायदे, नियम, अटी रद्द कराव्या लागतील. परकीय गुंतवणूक आकर्षित होईल असे वातावरण तयार करावे लागेल. संरक्षण देऊन सुरू असलेले उद्योगांचे लाड बंद करावे लागतील. जगाच्या बाजारपेठेत खंबीरपणे वावरण्याची तयारी ठेवावी लागेल..शेवग्याचे झाड तुटणार का?ही सर्व परिस्थिती पाहता, मुन्शी प्रेमचंद याची एक प्रसिद्ध कथा आठवते. कथा अशी आहे, एका राज घराण्याचे वारसदार असलेले कुटुंब होते. काम करणे म्हणजे कमीपणा मानला जाई म्हणून कुटुंबातील कोणी काम करत नसे. मग काही पिढ्यांत सर्व जमीन जुमला विकला गेला. एक मोठा वाडा, जे त्यांचे घर होते तेवढेच शिल्लक राहिले. काहीच उत्पन्न नाही म्हणून त्यांचे खाण्यापिण्याचे वांदे होऊ लागले..मग त्यांच्या परसात एक मोठे शेवग्याचे झाड होते, ते पहाटे लवकर उठून त्या शेवग्याच्या शेंगा तोडून बाजारात पाठवायचे आणि मिळणाऱ्या पैशावर आपला उदरनिर्वाह करायचे. त्यांच्या वडिलांचे मित्र व नातेवाईक एकदा या कुटुंबाकडे पाहुणे म्हणून काही दिवस राहायला येतात. तेव्हा त्यांच्या लक्षात ही सर्व परिस्थिती येते की हे फक्त या शेवग्याच्या शेंगांवर जगत आहेत. कोणीच काही काम धंदा करत नाही..India US Trade: भारतावर आजपासून ५० टक्के शुल्क लागू.एका रात्री सर्व झोपलेले असताना तो पाहुणा, ते शेवग्याचे झाड तोडून टाकतो व कोणाला न सांगता निघून जातो. या कुटुंबाने हे पाहिल्यावर त्या पाहुण्याला खूप शिव्या घालतात, कोसतात. लवकरच या कुटुंबाची उपासमार व्हायला लागते. मग हळूहळू एक एक जण कामाला जाऊ लागतो. घरात पैशाची आवक सुरू होते व काही महिन्यांत ते कुटुंब व्यवस्थित जीवन जगायला लागते व समृद्ध होते. शेवग्याचे झाड तोडणाऱ्या पाहुण्याचे आभार मानू लागते..भारताला प्रगतीकडे ढकलण्यासाठी ट्रम्प शेवग्याचे झाड तोडायला निघाले आहेत. असे झाले तर भारताला आपल्या पिकांची उत्पादकता वाढवावी लागेल. त्यासाठी जीएमसह इतर प्रगत तंत्रज्ञान स्वीकारावे लागेल. आपल्या उत्पादनाचा दर्जा आंतरराष्ट्रीय करावा लागेल. आधारभूत किमतीवर आधारित भारतातील कृषी अर्थव्यवस्था आता फार काळ चालणे शक्य नाही. भारतातील आधारभूत किमती जागतिक बाजारापेक्षा बऱ्याच जास्त आहेत. आपण स्पर्धा करू शकत नाही व स्वस्त आयातीचा धोकाच जास्त आहे..ताजे उदाहरण आहे कापूस आयातीवरील शुल्क रद्द करण्याचे. भारत अमेरिकेला कपड्यापासून निर्मित कापड निर्यात करतो. आता ५० टक्के टेरिफ लावल्यामुळे भारतातून आयात केलेले कपडे, इतर देशांच्या मानाने महाग होणार. भारतातली कापड उद्योगाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. कापड उद्योगाला सावरण्यासाठी आयात शुल्क शून्य करण्यात आले. भारतात कापसाला हमी किंमत आहे ८११० रुपये प्रतिक्विंटल त्यापेक्षा चांगल्या दर्जाचा कापूस ६५०० ते ६८०० या दराने जागतिक बाजारात उपलब्ध आहे. कापड उद्योगाला भारतील कापूस विकत घेण्यापेक्षा आयात केलेला कापूस स्वस्त पडतो..ही परिस्थिती बदलायची असेल तर ज्या गुणवत्तेचा कापूस आपल्या कापड उद्योगाला हवा आहे तो आपण पिकवला पाहिजे. आपली उत्पादकता इतर देशांच्या बरोबरीने किंवा जास्त असायला हवी. उत्पादन खर्च कमी असायला हवा. हे शक्य आहे जर भारतातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळाले तर! व्यापाराचे स्वातंत्र्य मिळाले तर! भारतातील शेतकरी या संकटावर सहज मात करू शकतो..ट्रम्प यांनी अमेरिकेतील बेकायदेशीर नागरिक हाकलून दिल्यामुळे अमेरिकेत शेतात काम करायला मजूर राहिले नाहीत. मजुराच्या तुटवड्यामुळे तेथील शेतकऱ्यांना, आपली तयार झालेली पिके नांगरून शेतात गाडावी लागली आहेत. आपली तरुण लोकसंख्या ही आपली मोठी ताकद आहे. याला संधी मिळायला हवी. ती ट्रम्प पाहुण्याच्या निमित्ताने मिळू शकते. भारतातील शेतकरी जगाच्या बाजारपेठेत स्पर्धा करू शकतो, टिकू शकतो फक्त त्याला नियंत्रण मुक्त करा. १९९१ मध्ये भारतात खुली कारणाचे वारे वाहू लागले तेव्हाच हे शेवग्याचे झाड तुटेल, अशी अपेक्षा शेतकरी नेते शरद जोशी यांनी व्यक्त केली होती. मात्र शेती क्षेत्रासाठी तेव्हा ते तुटले नाही. आता डोनाल्ड ट्रम्प तात्या हे कार्य करतील, अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.९९२३७०७६४६(लेखक स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.