अनिकेत लिखार, मनोज कुयटेRural Farming: एकंदरीत, निसर्गाचे पूजन आणि वंदन हा आदिवासी संस्कृतीचा पाया असतो. त्यामुळे ते स्वत:चा, जमिनीचा, जनावरांचा, पशुपक्ष्यांचा, एकूण निसर्गाचा समग्र विचार करणारी शेती पद्धती अंगीकारतात. ही पद्धती निसर्गाशी सुसंवादी, कुटुंबंकेंद्रित आणि शाश्वत टिकणारी आहे. त्यालाच कदाचित आपण ‘सुखाची शेती’ म्हणू शकतो. .ती... दोन अक्षरी शब्द... शेती हा शब्द जरी मनात आला तर सहसा पांढऱ्या सदऱ्यात शेतात उभा असलेला शेतकरी किंवा शेती, शेतकरी आणि बैल असे चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया आहे शेती. परंतु सध्याच्या घडीला शेतीची व्याख्या सर्वसाधारणपणे तोट्याचा व्यवसाय अशीच झाली आहे. ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांच्या मते, शेती करणे म्हणजे जणू एखाद्या रणांगणात उतरण्यासारखे आहे; जिथे वरून कधी बॉम्बगोळा कोसळेल हे सांगता येत नाही. या संदर्भात बॉम्बगोळा म्हणजेच अचानक कोसळणारा मुसळधार पाऊस किंवा बर्फाच्या गारांचा प्रहार होय. हवामान बदलाच्या या काळात एकंदरीत निसर्ग आणि वातावरणाची अवस्था पाहता, कधी अत्याधिक पाऊस पडतो, तर कधी पावसाची कमतरता भासते. काहीच निश्चिती राहिलेली नाही. हवामान बदलाच्या या अनिश्चित परिस्थितीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांनाच बसत आहे..Tribal Culture Festival : निसर्ग संवर्धन, आदिवासी संस्कृतीचा जागर .सपाट भूभागामध्ये शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत कठीण असते. अशा भागातील शेतकरी बहुधा बँकेतून कर्ज घेऊन किंवा सावकाराकडून पैसे उचलून शेती करतात. परंतु, एखाद्या हंगामात पिकाचे नुकसान झाल्यास संपूर्ण मेहनत वाया जाते आणि शेतकऱ्याच्या हातात काहीच उरत नाही. परिणामी शेतकरी मानसिकदृष्ट्या खचतो. अशा परिस्थितीत आत्महत्यांच्या घटना वाढतात.आदिवासी बहुल भागात गेल्यावर मात्र तुम्हाला कदाचित वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण चित्र पाहायला मिळेल. या भागातील शेतकऱ्यांना शेतीतून प्रचंड नफा मिळतो, असे अजिबात नाही; परंतु त्यांची शेती करण्याची पद्धत ही सर्वसमावेशक आणि निसर्गाशी सुसंगत अशी आहे. येथे शेती हे केवळ उपजीविकेचे साधन नसून जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. ते शेतीकडे एक उपासना म्हणून पाहतात. त्यांची निसर्गाशी घट्ट नाळ जोडलेली आहे. .महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, वर्धा, नाशिक, नंदुरबार, पालघर इत्यादी जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकसंख्या आढळते. या भागांमध्ये प्रामुख्याने कोरकू, कातकरी, गोंड, माडिया, कोलाम, भिल, वारली अशा विविध जमाती राहतात. हे लोक त्या प्रदेशातील प्रथम स्थायिक रहिवासी असल्यामुळे त्यांना प्रामुख्याने आदिवासी म्हणून संबोधले जाते.हा आदिवासी समाज जेव्हा पीक पद्धतीचा विचार करतो, तेव्हा त्यांच्या शेतीतील धान्य फक्त बाजारात विक्री करण्यापुरता तो मर्यादित नसतो. उलट, शेतीतून घरगुती धान्य व भाजीपाला पुरेसा मिळेल का, जनावरांसाठी चारा कसा उपलब्ध होईल, याचाही ते तितकाच गांभीर्याने विचार करतात. त्यामुळेच त्यांच्या शेतीत प्रामुख्याने बहुविध पीक पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यामुळे हवामान बदलाचा फटका बसला तरी काही ना काही पीक त्यांच्या हाती लागते. .अमरावती जिल्ह्यात बेला वरव, गडचिरोलीमध्ये मरव, नाशिकमध्ये राब पद्धती, तर वर्धा जिल्ह्यात पाटा पद्धती प्रचलित आहे. नंदुरबारमध्येही स्थानिक वैशिष्ट्ये लक्षात घेऊन वेगळी पद्धत आढळते. अशा या विविध पीक पद्धतींत एकदल, द्विदल, तेलबिया, मसालावर्गीय आणि भाजीपाला यांची लक्षणीय विविधता दिसून येते. बियाणे सुद्धा स्थानिकच वापरले जाते. ते त्या त्या प्रदेशातील वातावरणाशी अनुरूप झालेले असते. इतकेच नव्हे तर शेताच्या बांधावर किंवा शेताच्या मधोमध विविध फळझाडांची लागवड करणे हीसुद्धा त्यांची परंपरा आहे. उदाहरणार्थ सीताफळ, चिकू, पेरू, आंबा, बोर, रामफळ, पपई, शेवगा, हादगा, बेल, कवठ इत्यादी झाडांची रेलचेल दिसते..वर्षभर त्यांना या झाडांपासून काही ना काही फळांचे उत्पादन मिळत राहते. त्यांच्या आहारात या फळांचा समावेश असतो. पोषणाच्या दृष्टीने ही गोष्ट महत्त्वाची आहे. शेताच्या बांधावर जनावरांसाठी विविध प्रकारचा चारा लावला जातो. याशिवाय पावसाळा व हिवाळ्याच्या काळात जंगलात चारा मुबलक असतो. त्यामुळे उन्हाळ्यातील गरज भागते. आदिवासी समाज हा मुख्यत्वे जंगलाच्या परिसरात राहतो. तिथे ओढे आणि नाले असतात. त्यामुळे जनावरांना सहजपणे पुरेसे पाणी मिळते. बांधावर लागवड केलेल्या विविध झाडांमुळे पशुपक्ष्यांना सुरक्षित अधिवास मिळतो. हे पक्षी व कीटक यांना शेतीतील महत्त्वाचे कारागीर म्हणायला हरकत नाही. कारण कीड व्यवस्थापनातील त्यांची भूमिका अत्यंत मोलाची आहे..Tribal Women Empowerment: आदिवासी महिला योजनेच्या माध्यमातून होणार सक्षम.या पीक पद्धतीत महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. विशेषतः लहान शेतजमिनी असलेल्या भागांत. महिलांना या पारंपरिक पद्धतीचे सखोल ज्ञान असते. नांगरणी वगळता महिला शेतीतली जवळ जवळ सगळी कामे करतात. कुटुंबाच्या अन्नाच्या गरजा लक्षात घेऊन लागवडीसाठी पिकांचे प्रमाण निश्चित करतात. पिकांची निवड, झुडपे काढणे, बियांचे मिश्रण तयार करणे, पेरणी, तण काढणे, कापणी व धान्य साठवणे या सर्व कामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांच्या कामाची सुरुवात पेरणीपूर्वीच होते, कारण त्या मागील हंगामातील बियाण्यांची काटेकोर निवड व साठवण करतात. हे काम वेळखाऊ असले तरीही त्या अत्यंत काळजीपूर्वक पार पाडतात..अशा सर्वसमावेशक पीक पद्धतीमुळेच आदिवासी समाज बाजारावर पूर्णपणे अवलंबून नसतो. बाजारात जाणारा पैसा वाचतो. घरगुती वापरासाठी पुरेसे व विषमुक्त अन्नधान्य मिळते. त्यामुळे त्यांचे आरोग्यही चांगले राहते. आदिवासी बहुल भागात शेतीव्यतिरिक्तही अनेक उपजीविकेची साधने विकसित झाली आहेत. त्यामध्ये पोषणबाग (परसबाग), कुक्कुटपालन आणि शेळीपालन हे महत्त्वाचे घटक आहेत. जागेची उपलब्धता असल्यामुळे घरात लागणारा भाजीपाला परसबागेतच घेतला जातो. त्यामुळे पालेभाज्या व फळे वर्षभर उपलब्ध होतात. आदिवासी कुटुंबांमध्ये कुपोषणाचे रुग्णही तुलनेने कमी प्रमाणात दिसतात..शेळीपालन हा प्रामुख्याने शेतीपूरक व्यवसाय मानला जातो. गरज भासल्यास शेळ्या विकल्या जातात आणि त्यातून मिळालेला पैसा आपत्कालीन किंवा आवश्यक खर्च भागविण्यासाठी उपयोगी पडतो. मोठ्या जनावरांचे पालन करणे हा त्यांच्या शेतीपद्धतीचा ठळक भाग आहे. बैलांचा वापर जमीन तयार करण्यासाठी, आंतरमशागतीसाठी व मालवाहतुकीसाठी होतो. गाई प्रामुख्याने शेणखतासाठी पाळल्या जातात. दरवर्षी शेतात शेणखत टाकण्याची परंपरा असल्यामुळे सेंद्रिय कर्ब टिकून राहतो, जमिनीची धूप कमी होते आणि मृदा आरोग्य सुरक्षित राहते. काही ठिकाणी म्हशींचे पालनही आढळते; ज्यातून दूध विक्रीबरोबरच दुधावर प्रक्रिया करून खव्यासारखी विविध उत्पादनं केली जातात.(संपूर्ण लेख वाचा २०२५ च्या अॅग्रोवन दिवाळी अंकात)अंक खरेदीसाठी लिंक- https://shorturl.at/TJmdc.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.