Livestock Farming: अमरावती जिल्ह्यातील तोंगलाबाद गावाने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चाऱ्यामध्ये स्वयंपूर्णता मिळवून राज्यातील अन्य गावांपुढे आदर्श निर्माण केला आहे. स्थानिक प्रशासन, रोजगार हमी योजना, शा व लोकसहभाग यांची सांगड घालून चारा शाश्वतीचा हा प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यात आला आहे. गावातील पाच एकरांतील जंगलावर संकरित नेपियर गवताची लागवड करण्यात आली आहे. आपल्या गरजेनुसार यातील चारा कुट्टीच्या स्वरूपात घेऊन जाण्याची यंत्रणा व सुविधा गावकऱ्यांसाठी तयार करण्यात आली आहे. उपक्रमाचे हे तिसरे वर्ष असून, यंदाच्या दुष्काळात तर त्याचा मोठा फायदा गावकऱ्यांना होताना दिसत आहे. .‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसाचे बदललेले स्वरूप, त्यातून निर्माण झालेली दुष्काळी स्थिती आणि परिणामी शेती व्यवस्थेवर आलेले संकट याचा फटका राज्यातील शेतीसह पशुधनालाही बसला. अनेक भागांत चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, जनावरे सांभाळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत अमरावती जिल्ह्यातील तोंगलाबाद गावाने मात्र चारा उत्पादनात स्वयंपूर्णता मिळवून राज्यात आदर्श निर्माण केला आहे. त्याची वाटचाल अभ्यासण्याजोगी आहे. सात एप्रिल २०२४ रोजीच्या शासन आदेशानुसार शासकीय गायरान जमिनीवर मनरेगा योजनेतून चारा लागवडीची तरतूद करण्यात आली. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये या माध्यमातून चारा लागवडीची शक्यता तपासून पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने चारा पिकांचे ठोंब उपलब्ध करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील कायर (ता. वणी) येथील स्मशानभूमीत चारा लागवड करण्यात आली. तेथील ठोंब गोरक्षण संस्थेला देऊन चाऱ्याची वर्षभर उपलब्धता होऊ लागली..Farmer Guidance: खांडगाव येथे शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाबाबत मार्गदर्शन.तोंगलाबादमधील प्रयोगकै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष नीलेश हेलोंडे- पाटील यांनी २०२४ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर महसूल विभाग व अमरावती पशुसंवर्धन विभागाकडून पडीक जमिनी व चारा पिकांबाबत माहिती घेतली. पहिल्या टप्प्यात करजगाव (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) येथे चारा लागवड करण्यात आली. त्यानंतर विविध गावांतील पडीक जमिनींंवर हा प्रयोग राबविण्याचा प्रयत्न झाला. त्यातून तोंगलाबादचा प्रयोग आकाराला आला. गावातील ग्राम रोजगार सेवक सोपान जऊळकार सांगतात, की हे गाव खारपाणपट्ट्यात येते. येथे उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र असते. .गावात पशुपालकांची संख्या सुमारे १५० पर्यंत आहे. साहजिकच उन्हाळ्यात चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण व्हायची. त्यावर शाश्वत उपाय शोधण्यासाठी २०२४- २५ पासून गावात चारा लागवडीचा प्रयोग सुरू करण्यात आला. तोंगलाबाद शिवारात सुमारे ९० एकर झुडूप स्वरूपाचे जंगल आहे. पैकी पाच एकरांवरील क्षेत्रावर चारा लागवड करण्याचे निश्चित करण्यात आले. रोजगार हमी योजनेतून मजुरांच्या मदतीने जागा साफसूफ करण्यात आली. संपूर्ण क्षेत्रात बंगाली बाभळी असल्याने सुमारे महिनाभर हे काम सुरू होते. पाच एकरांत नांगरट करून लागवडीसाठी बेड तयार करण्यात आले. पशुसंवर्धन विभागाकडून उपलब्ध झालेल्या सुपर नेपियर वाणाच्या ठोंबांची खरेदी झाली. त्यासाठी रोजगार हमी योजनेतून निधी उपलब्ध झाला..मदतीसाठी पुढे आले हातचारा क्षेत्रापासून सुमारे दीड किलोमीटरवर चंद्रभागा नदी आहे. लागवडीला संरक्षित सिंचनाची गरज होती; मात्र त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद नव्हती. अशावेळी तोंगलाबादचे मूळ रहिवासी आणि लासूर येथील ग्रामसेवक संजय मनोहरराव चव्हाण यांनी स्वतःचा कृषीपंप आणि पाइपलाइन चारा क्षेत्रासाठी वापरण्यास दिली.काही वेळा स्वतःच्या शिवारातील पाणीही दिले. त्यामुळे पाच एकरांवरील चारा पीक जगविणे शक्य झाले. मोकाट तसेच वन्य प्राण्यांपासून हे क्षेत्र संरक्षित करण्याची गरज होती. .लोकसहभागातून त्यासाठी झटका यंत्राची व्यवस्था करण्यात आली. गोपाल लक्ष्मण जउळकार आणि माजी सरपंच रामहरी चंद्रभान राऊत यांनी प्रत्येकी अडीच हजार रुपयांची मदत केली. रामूसेठ मालपानी यांच्याकडे स्वतःचे एकही जनावर नाही. मात्र मुक्या जनावरांप्रति सेवाभावातून त्यांनी ११ हजार रुपयांची मदत केली. जऊळकार सांगतात की शेतकरी आपल्या गरजेएवढा चारा या क्षेत्रातून घेतात. त्याची कुट्टी करून देण्याची सोय करण्यात आली आहे. चारा मोफत देण्यात येतो. मात्र चाफ कटर यंत्र चालवण्यासाठी आवश्यक पेट्रोल इंधनाचा खर्च संबंधित पशुपालकाला करावा लागतो. गावातील पशुपालक एकमेकांसाठी चारा उपलब्ध करताना इंधनाचीही सोय करतात. सामूहिक सहभागातून हा उपक्रम सुरू आहे..Fodder Shortage Planning: चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे नियोजन.चारा शाश्वतीचा गुजरात पॅटर्नकै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष नीलेश हेलोंडे-पाटील म्हणाले, की दुग्ध व्यवसायासाठी वर्षभर चाऱ्याची शाश्वती असावी लागते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या अध्यक्ष महोदयांसोबत चर्चा केली आहे. गुजरातमध्ये अमूल कंपनीने चारा शाश्वतीचा पॅटर्न तयार केला आहे. त्या अंतर्गत ग्रामपंचायतीच्या गायरान जमिनीवर चारा लागवड केली जाते. ही जागा दूध उत्पादक संघांना देण्यात येते. त्यात लागवड केलेला चारा पशुपालकांना उपलब्ध करून देण्यात येतो. दूध विक्रीतील उत्पन्नातून त्यावरील खर्चाची वसुली होते. आपल्याकडेही या धर्तीवर चारा शाश्वती व चारा उत्पादक सहकारी संस्थांची उभारणी करण्याची गरज असल्याचे पाटील म्हणाले..जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुकाची थापतत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि उपजिल्हाधिकारी (रोहयो) ज्ञानेश्वर घ्यार यांनी तोंगलाबादच्या चारा लागवड प्रक्षेत्राला भेट देऊन उपक्रमाची पाहणी केली. पडीक क्षेत्राचा चारा उत्पादनासाठी केलेला वापर, त्यामध्ये रोजगार हमीसह लोकसहभागातून उभी राहिलेली व्यवस्था आणि दुष्काळ निवारणासाठी गावकऱ्यांनी केलेले प्रयत्न यांचे त्यांनी कौतुक केले. नीलेश हेलोंडे - पाटील ९४२०२ ४९५५४(अध्यक्ष, (कै.) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन)सोपान जऊळकार ९३०९७ ७५३२६(ग्राम रोजगार सेवक).माझ्याकडे दोन दुधाळ गायी होत्या. मात्र चाऱ्याची उपलब्धता असल्याने दुष्काळी स्थितीतही एक गाय खरेदी करून संगोपनावर भर दिला. आमच्या गावाप्रमाणे अन्य गावांनी देखील पडीक आणि गायरान जमिनीवर चारा लागवडीची पध्दत अवलंबिल्यास पशुपालनाला चांगली चालना मिळेल. गावाच्या अर्थकारणाला बळ मिळेल.राजेश जानराव सोळंके, पशुपालक, तोंगलाबाद.उन्हाळ्यात चाऱ्याचा प्रश्न गंभीर होतो. त्यामुळे सुरुवातीला एकाच गाईच्या संगोपनावर भर होता. आता बारमाही चारा उपलब्ध होत असल्याने नव्याने एचएफ संकरीत गाय खरेदी केली आहे. त्यापासून प्रति दिन दहा लिटर दूध व ताजा पैसा उपलब्ध होतो. परिणामी संकटकालीन स्थितीत आर्थिक अडचण निर्माण होत नाही.संदीप प्रभाकर जऊळकार. पशुपालक, तोंगलाबाद.राज्यात सर्वत्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अनेक पशुपालक म्हणूनच जनावरांच्या विक्रीवर भर देत आहेत. असे असताना आमचे गाव मात्र चाऱ्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण ठरले आहे. गावातील पशुपालकांना मुबलक चारा उपलब्ध होत असून अन्य गावांतील शेतकऱ्यांनाही ठोंब उपलब्ध करून देण्यात येत आहेत.वैशाली निरंजन पाणझाडे, सरपंच, तोंगलाबाद.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.