रवींद्र पालकरHorticulture Tips: महाराष्ट्रात वर्षभर विविध हंगामांत वांगी हे भाजीपाला पीक घेतले जाते. या पिकावर सामान्यतः शेंडा व फळ पोखरणारी अळी, पांढरी माशी आणि कोळी या किडींचा नियमित प्रादुर्भाव दिसतो. मात्र या वर्षी विशेषतः मागील महिन्यापासून वांगी पिकांमध्ये फुलकिडे (थ्रिप्स) प्रादुर्भाव वाढल्याचे दिसत आहे..या किडीसाठी महागडी कीटकनाशके वापरूनही अपेक्षित नियंत्रण न साधल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. वांगीवर थ्रिप्स टबाकी (Thrips tabaci) व थ्रिप्स पाल्मी (Thrips palmi) या दोन प्रमुख प्रजातींचा प्रादुर्भाव आढळतो. त्यातही या वर्षी किडींचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी केली असता आकार वैशिष्ट्यांनुसार थ्रिप्स पाल्मी प्रजातीचा प्रादुर्भाव स्पष्टपणे जास्त असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या थ्रिप्स प्रजातींची अचूक ओळख, जीवनचक्र समजून घेऊ..शास्त्रीय नाव : थ्रिप्स पाल्मी(Thrips palmi)यजमान पिके : ही बहुभक्षी कीड आहे. ती वांगी, बटाटा, मिरची, कारले, काकडी, कलिंगड, खरबूज, भोपळा, दोडका, झुकिनी, राजमा, वाल, चवळी, सोयाबीन अशा अनेक पिकांवर उपजीविका करते..Brinjal Farming : चमकी वांग्यांचे दर्जेदार उत्पादन.किडीची ओळख :थ्रिप्स किडीची अंडी रंगहीन किंवा फिकट पांढऱ्या रंगाची असून आकार शेंडीसारखा असतो.प्रौढ कीड अतिशय लहान (लांबी साधारण १ ते १.५ मि.मी.) असते. रंग फिकट पिवळा ते हलका तपकिरी असतो. त्यांना पंखाच्या दोन जोड्या असतात. वरच्या पंखांचा आकार खालील पंखांपेक्षा लांब असतो. पंखांच्या काठाला लांब केस असतात. डोळे लालसर रंगाचे असतात. डोक्याच्या वरच्या भागावर तीन बिंदूचा त्रिकोण व त्यामागे एक जोडी लहान केस दिसतात. पोटाच्या बाजूला फारसे केस नसतात, पण पोटाच्या काठाजवळ काही केस आढळतात.पिले प्रौढांसारखीच असतात, परंतु आकाराने लहान व रंगाने फिकट असतात. त्यांना पंख नसतात..जीवनक्रमया किडीचा जीवनक्रम अंडी, पिले, कोष व प्रौढ या चार अवस्थांमधून पूर्ण होतो.या किडीचे प्रजनन मिलनातून किंवा मीलनाशिवाय होऊ शकते. मीलनाद्वारे प्रजनन झाल्यास मादी पिले जन्मतात, तर मिलनाशिवाय प्रजनन झाल्यास नर पिले जन्मतात.अंडी : मादी कीड पानांवर, फुलांमध्ये किंवा छोट्या फांद्यांवर छोट्या चिरा पाडून, त्यातील पेशीजवळ ५० ते २०० अंडी घालते. अंडी उबवण्याचा कालावधी ३ ते ७ दिवसांचा असतो.पिलावस्था - साधारणपणे दोन अवस्थेतून (एनस्टार) ही अवस्था ४ दिवस ते २ आठवड्यांपर्यंत पूर्ण होते..कोष अवस्था - पिलावस्थेचे दोन टप्पे पूर्ण केल्यानंतर पिले जमिनीत किंवा जमिनीवर असणाऱ्या पालापाचोळ्यात मातीचे आवरण तयार करून त्यात कोषावस्थेत जातात. या अवस्थेत कीड अन्न ग्रहण करत नाही. कोषावस्थेदरम्यान दोन उपअवस्था (इंस्टार) आढळतात. पहिली म्हणजे पूर्व-कोषावस्था व दुसरी म्हणजे कोषावस्था. पूर्व-कोष अवस्था साधारणपणे एक ते दोन दिवस टिकते, तर कोष अवस्था आणखी एक ते तीन दिवसांपर्यंत टिकते.प्रौढ मादी कीड १० ते ३० दिवस तर नर कीड २० दिवसापर्यंत जगू शकते.अधिक तापमान व उष्ण वातावरण असेल तर एक पिढी १५ ते १६ दिवसांत पूर्ण होऊ शकते. एका वर्षात किडीच्या साधारण १२ ते १५ पिढ्या पूर्ण होऊ शकतात..नुकसानीचे स्वरूपपिले आणि प्रौढ दोन्ही टप्प्यांतील किडी पानाच्या शिरा व मध्य शिरेलगत, खोडाच्या वाढत्या टोकांजवळ, फुलांच्या पाकळ्यांमध्ये व विकसित होणाऱ्या गर्भाशयामध्ये आणि फळांच्या पुटाखाली किंवा देठाजवळ एकत्रितपणे खाऊन उपजीविका करतात. वनस्पतीला खरवडून जखमा करतात. त्यातून बाहेर पडणारा रस ते शोषतात. परिणामी, बाधित पानांवर चांदीसारखी चमक व ठिपके दिसतात. पाने गुंडाळली जाऊन ती सुकतात.फळांच्या देठावर खरडल्यामुळे तपकिरी डाग दिसतात. पाकळ्या आणि विकसित होणारे गर्भाशय वाकडे व विकृत स्वरूप धारण करतात. तीव्र प्रादुर्भाव झाल्यास पानांची वाढ खुंटते. खोड व फांद्या वाळतात. फळांचा आकार लहान राहतो. अतिशय गंभीर परिस्थितीत संपूर्ण रोप मरते. गंभीर अवस्थेत पानांचा रंग पिवळा किंवा तपकिरी होऊन ती खालच्या बाजूने सुकतात. बाधित फळांवर डाग, रंग बदल आणि विकृती दिसून आल्याने फळांना बाजारात चांगला दर मिळण्यात अडचणी येतात..Brinjal Farming: दर्जेदार उत्पादनासाठी नियोजनबद्ध व्यवस्थापन.पोषक वातावरणउष्ण, कोरडे, कमी आर्द्रतेचे वातावरण आणि पावसात खंड पडल्यास या किडीच्या प्रादुर्भावासाठी सर्वाधिक पोषक ठरते. अशा हवामानात या किडीची वाढ, स्थलांतर आणि प्रजनन वेगाने होऊन प्रादुर्भाव तीव्र स्वरूप धारण करतो..एकात्मिक व्यवस्थापनपिकातील खाली पडलेला पालापाचोळा स्वच्छ करावा.पर्यायी खाद्य तणे नष्ट करावीत.पिकाची फेरपालट करताना काकडी (कुकुर्बिटेसी) आणि बटाटा (सोलानेसी) कुळातील पिके किंवा अन्य यजमान पिके घेतलेली नसावी.पीक लहान अवस्थेत असताना प्रकाश परावर्तित करणारे चंदेरी आच्छादन केल्यास किडीची संख्या कमी झाल्याची प्रयोगातील निरीक्षणे आहेत.नत्रयुक्त खतांचा संतुलित वापर करावा.पिकास अतिरिक्त सिंचन टाळावे.निळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या चिकट सापळ्यांचा वापर करून नियमित किडीचे निरीक्षण करावे.कडुनिंबयुक्त कीटकनाशक अॅझाडिरेक्टीन (१० हजार पीपीएम.) २ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी. वातावरणात पुरेशी आर्द्रता असल्यास लेकॅनिसिलिअम लेकॅनी ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी..रासायनिक नियंत्रणउच्च प्रजनन क्षमता, अल्प काळात पूर्ण होणारा जीवनक्रम आणि कीडनाशकांचा असंतुलित व अशास्त्रीय पद्धतीने केलेला वापर अशा काही कारणांमुळे या किडीमध्ये कीटकनाशकाप्रति प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. हे टाळण्यासाठी शिफारस केलेल्या कीटकनाशकाचाच योग्य प्रमाणात वापर करावा. कमी वापराने कीड पुनरुज्जीवन होते. अधिक वापराने प्रतिकारशक्ती वाढते. केंद्रीय कीटक नाशक मंडळ यांच्याकडे नोंदणी नसलेली कीटकनाशके, वनस्पती वाढ नियंत्रके किंवा अनावश्यक सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या फवारण्या करणे टाळावे..थ्रिप्स पाल्मी प्रजातीसाठी : प्रमाण प्रती लिटर पाणीडायफेन्थ्युरॉन (४८ टक्के) अधिक डायनोटेफ्युरान (८ टक्के डब्लू. जी.) (संयुक्त कीटकनाशक) १.२५ ग्रॅम किंवाफ्लुक्सामेटामाइड (३.८ टक्के) अधिक पायरिडाबेन (९.५ टक्के एस.सी.) (संयुक्त कीटकनाशक) १.३३ मि.लि. याप्रमाणे फवारणी करावी.टीप : थ्रिप्स टबाकी या फुलकिडे प्रजातीसाठी अन्य कीटकनाशकांची शिफारस आहे. त्यामुळे थ्रिप्स पाल्मी या प्रजातीचा प्रादुर्भाव नेमकेपणाने ओळखून तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणीचे नियोजन करावे.- रवींद्र पालकर ८८८८४०६५२२(पीएच. डी. स्कॉलर, कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.