Maharashtra Flood Impact: राज्यातील ६० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र पाण्याखाली गेल्याने राज्याच्या खरीप हंगामाची पुरती वाट लागली आहे. २० मेपासून सतत सुरू असलेल्या पावसाने अपवाद वगळता सगळी पिके नष्ट केली आहेत. आता उरले सुरले पीक हातातोंडाशी आल्यानंतर अतिवृष्टीने त्यावर घाला घातला. तोंडावर दिवाळी आली असताना शेतातील पिकाचा चिखल होणे हे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारे आहे. अशा काळात सरकारने संवेदनशीलपणे काम करण्याची गरज होती. मात्र ते झाले नाही. काहीही झाले तरी सरकारकडून मदतीची अपेक्षा करणे आणि ती नाही मिळाली की झोडपणे हेही संयुक्तिक नाही. पण सरकारच संवेदनशीलपणे काम करत नसेल तर टीका तर होणारच..अतिवृष्टी आणि पुराने शेतकरी वेढला गेल्यानंतर दोन मंत्रिमंडळ बैठका झाल्या. या बैठका म्हणजे केवळ तोंडाची वाफ दवडण्यासाठी होत्या की काय, असे वाटण्याइतपत सरकारने असंवेदनशीलता दाखविली आहे. सरकारने मदत केल्यावर शेतकरी उभा राहील असे नाही. तो त्याची त्याची व्यवस्था पाहत असतो. मात्र पालक या नात्याने तू घाबरू नको, आपत्तीमध्ये मी तुझ्या मागे उभा आहे. कष्टकऱ्यांना मदतीचा हात देऊन आत्मविश्वास देणे हे मोठे काम असते. त्यातून माणसे उभी राहतात आणि नेटाने काम करतात..नुकसानीची सगळीच भरपाई केलेल्या मदतीतून होते असे नाही. त्यामुळे सरकारने आपणच सर्वकाही करतो असा बडेजाव मिरवू नये. पूर आल्यानंतर रस्त्यावर उतरून सामान्यांना धीर देण्याचा सरकारने प्रयत्न केला. काही ठिकाणी त्रुटी होत्या तेथे मंत्री संबधित अधिकाऱ्यांना सूचना देत होते. मात्र नेता करतो मग आपण मागे का, असे समजून चिल्लर नेतेही आयएएस अधिकाऱ्यांना झापू लागले. हे करताना त्याचे व्हिडिओ बनवून समाजमाध्यमांवर टाकू लागले. उबग आणणारे हे वर्तन आता सर्वमान्य होते की काय अशी भीती आहे..Flood Relief: अतिवृष्टीग्रस्त ७१२ कुटुंबांना शासनाकडून मदत जाहीर.राज्यात शेतकरी भुईसपाट झाल्यानंतर करायचे काय असा प्रश्न अनेकांसमोर आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानीचे आकडे समोर होते. तरीही त्यावर काथ्याकूट करण्यात सरकारने धन्यता मानली. गावेच्या गावे पाण्याने वाहून गेली असताना गट नंबरनिहाय पंचनाम्यांवर सरकार आग्रही आहे. पावसाने केवळ शेतीच नव्हे, तर माणसाचे जगणे वाहून नेले आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सलग दोन वेळा महापुराचा फटका बसला आहे. २०१९ च्या महापुरात या भागातील नागरिकांचे जगणे उद्ध्वस्त झाले. कारण अभूतपूर्व महापूर आला आणि नागरिक बिनधास्त राहिले..मात्र २०२१ च्या महापुरावेळी नागरिकांनी सामानसुमान वाचवले. आधीच्या महापुरावेळी केलेल्या चुका दुरुस्त केल्या. ही गावे लगेच उभी राहिली. पशुधन, संसारोपयोगी साहित्य वाचवले. मराठवाडा मुळात दुष्काळी भाग. साथीचा रोग यावा तशी माणसं कर्जाच्या विळख्याने जीवन संपवत आहेत. अशातच कधी काठ न गाठलेल्या नदीचे आक्राळविक्राळ रूप पाहून पोटात खड्डा पडणे स्वाभाविक आहे. या नद्यांनी गावेच्या गावे उद्ध्वस्त केली. शेती, पिके, विहिरी, घरे, संसारोपयोगी साहित्य, शाळा असे सर्व काही व्यापून टाकले. आता हे सगळे उभे करणे सरकारचे काम आहे. पश्चिम महाराष्ट्रात महापूर आल्यानंतर अनेक सामाजिक संस्था, देवस्थानांनी पुढे सरसावत धान्य, कपडे आणि अन्य साहित्यांचा मोठा पुरवठा केला होता. आताही या संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे..कर्जमाफीने प्रश्न सुटेल का?शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करू असे मधाचे बोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीआधी लावले होते. मात्र आता आम्ही कर्जमाफी करू, पण ती कधी करू हे बोललो नव्हतो असे सत्ताधारी कोडगेपणाने सांगत आहेत हा भाग वेगळा. पण अलीकडच्या दोन कर्जमाफीचा विचार केला आणि अलीकडे थकलेल्या कर्जांचा विचार केला, तर या चक्रातून शेतकरी आणि सरकारची सुटका करण्यासाठी काय उपाय, हा मोठा प्रश्न आहे. सरकारने कर्जमाफी करतो असे सांगून पावसाळी अधिवेशनात ‘मित्रा’चे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमुक्तीसाठी समिती नेमली..या समितीचा अजून विस्तार केलेला नाही. ही समिती अभ्यास करून सरकारला शिफारशी करणार होती. मात्र अजून तरी तसे झाले नाही. २०१७ मध्ये तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना लागू केली. या योजनेतील १ लाख २९ हजार कर्जखात्यांची १६४४ कोटी रुपयांची कर्जमाफी अद्याप शिल्लक आहे. तर पाठोपाठ दोन वर्षांनी महात्मा फुले कर्जमुक्ती योजना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली..Agriculture Crisis: अतिवृष्टीने साडेचार लाख हेक्टरवर नुकसान .या योजनेत ३२ लाख कर्जखात्यांची २० हजार ४९७ कोटी कर्जमाफी करण्यात आली. या योजनेतील ४९ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्याप शिल्लक आहे. तर ५० हजारांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार होते, त्यातील ३४६ कोटी अनुदान शिल्लक आहे. बँकांच्या चुकांमुळे २९२० खात्यांना कर्जमाफी मिळालेले नाही..छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेत पात्र आहेत म्हणून महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेतून वगळण्यात आलेल्या पात्र सहा लाख शेतकऱ्यांची अजूनही होलपट सुरू आहे. या शेतकऱ्यांची ५ हजार ९७५ कोटी रुपयांची कर्जमाफी झालेली नाही. गेल्या सहा वर्षांपासून ही फाइल सहकार विभागाकडून वित्त विभागाकडे आणि तेथून मुख्यमंत्री कार्यालयाकडे फिरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेतील अटी आणि शर्तींनी बेहाल झालेल्या शेतकऱ्यांना आता अतिवृष्टी आणि पुरातही नियम अन् अटींमुळे बेहाल व्हावे लागत आहे..विरोधक ओला दुष्काळ लागू करा म्हणून मागणी करत आहेत. तर ओला दुष्काळ ही संकल्पनाच नाही असे सांगून सरकार अंग काढून घेत आहे. आता दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ज्या सोईसवलती लागू केल्या जातात, त्याच सवलती आता लागू करू असे सांगितले जात आहे. मात्र दुष्काळात टंचाई असते, आता ओल्या दुष्काळातील समस्या वेगळ्या आहेत हे सरकारला माहीत असूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. ओल्याला सुक्याचे निकष लावले तर सुक्याबरोबर ओलेही जळून जायचे. त्यामुळे सरकारने आता तरी राजकारणापलीकडे जाऊन या आपत्तीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे..सगळे एकाच सुरात कसे?मंत्रिमंडळ बैठक सातव्या मजल्यावरील सभागृहात झाल्यानंतर माध्यमांना टाळण्यासाठी काही मंत्री गुपचूप निघून जातात. एरवी मुख्यमंत्रीही माध्यमांना टाळतात. पण मंत्रिमंडळ बैठकीत मदतीवरून खल झाला आणि मुख्यमंत्री माध्यमांसमोर गेले. त्यांनी मदत देणार नाही असे न सांगता नीटपणे समजावून सांगितले. त्यानंतर अन्य मंत्री जमेल तसे माध्यमांना सामोरे गेले. काही जण खासगीत बोलू लागले. पण सगळ्यांचा सूर सारखाच. खासगीतही मी काहीतरी महत्त्वाचे सांगत आहे असे सांगून अन्य मंत्री माध्यमांसमोर खुलेपणाने सांगत होते तेच हे खासगीत सांगत होते. त्यामुळे हा ‘सूर’ कुणी ठरवून दिला याचीही खमंग चर्चा मंत्रालयात आहे.: ९२८४१६९६३४(लेखक ‘सकाळ ॲग्रोवन’चे मुंबई प्रतिनिधी आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.