Dharashiv News: धाराशिव जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या कायद्याचे राज्य आहे की चोरट्यांचे, असा संतप्त सवाल विचारला जाऊ लागला आहे. गेल्या महिनाभरात बेंबळी, ढोकी, कळंब आणि नळदुर्ग यांसारख्या विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या चोऱ्यांच्या सत्रामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. .गोठ्यातून दिवसाढवळ्या म्हशी चोरणे असो की विहिरीतून जड मोटारी लंपास करणे; गुन्हेगारांना आता पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. ठिकठिकाणी गुन्हे नोंद होऊनही चोऱ्यांचे सत्र थांबण्याऐवजी वाढतच चालल्याने, ‘पोलिस फक्त गुन्हे नोंदवण्यापुरतेच मर्यादित आहेत का?’, असा संतप्त सवाल शेतकरी विचारू लागले आहेत..Farm Theft : शेतात पाइप, सिंचन यंत्रणांची नासधूस सुरूच.जानेवारी महिन्यात जिल्ह्यामध्ये चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. बेंबळी, ढोकी, कळंब, शिराढोण आणि नळदुर्ग यांसह जिल्ह्याच्या विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. विशेषतः शेतीसाठी लागणारे महागडे साहित्य आणि पशुधनाला लक्ष्य केले जात असल्याने बळिराजा संकटात सापडला आहे..विहिरीतील मोटार,केबलवर डोळाधाराशिव ग्रामीण, कळंब आणि शिराढोण परिसरातून सर्वाधिक चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. विहिरीतील आणि साठवण तलावातील नामांकित कंपन्यांच्या महागड्या पाणबुडी मोटारी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. केवळ मोटारीच नव्हे, तर शेकडो फूट केबल आणि स्टार्टरही कापून नेले जात आहेत. स्प्रिंकलर, नोझल, लोखंडी पाइपची मोठ्या प्रमाणावर चोरी झाली आहे..दरोडा टाकण्यापर्यंत मजलशेती साहित्यासोबतच जनावरांच्या चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. दारफळ (बेंबळी), शिराढोण आणि कोंढ परिसरातून म्हशी आणि गोठ्यातील जनावरे चोरून नेल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे दुग्धव्यावसायिक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. परंडा येथे तर एका आरोपीला दोन शेळ्यांची पिल्ले दुचाकीवरून चोरून नेताना रंगेहात पकडण्यात आले. जानेवारी महिन्यातील पोलिस नोंदींनुसार, जिल्ह्याभरात लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. चोरटे आता केवळ चोरीच करत नाहीत, तर परंडा येथील घटनेत समोर आल्यानुसार, कोयत्यासारख्या घातक शस्त्रांचा धाक दाखवून दरोडा टाकण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे..Agriculture Theft: सीसीटीव्हीमुळे केबल चोरटे सापडले.रात्रीतून चार शेळ्या, पाच बोकड चोरलेधाराशिव : वाणेवाडी येथे चोरट्यांनी एकाच रात्रीत शेतकऱ्याच्या गोठ्यातून तब्बल नऊ शेळ्या-बोकडांची चोरी केली आहे. यामध्ये शेतकऱ्याचे अंदाजे ७८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गोपाळ चव्हाण (वय ३८) यांचे वाणेवाडी शिवारात गट नं. २४९ मध्ये शेत आहे. मंगळवारी (ता. २७) संध्याकाळी सातच्या सुमारास त्यांनी आपली जनावरे गोठ्यात बांधली होती. मात्र, बुधवारी (ता. २८) पहाटे ५.३०च्या सुमारास ही चोरी उघडकीस आली..चोरट्यांनी रात्री गोठ्यातून चार शेळ्या आणि पाच बोकड चोरून नेले. हजारो रुपये खर्च करून सांभाळलेली नऊ जनावरे चोरीला गेल्याने चव्हाण यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या प्रकरणी चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी (ता. ३०) ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटे केवळ सुटे साहित्यच नव्हे तर थेट मोठ्या संख्येने पशुधन पळवून नेत आहेत..सौरऊर्जा प्रकल्पाची १९०० मीटर केबल लंपासभूम तालुक्यातील आरसोली शिवारात असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पातून चोरट्यांनी हजारो रुपयांची केबल लंपास केली आहे. ११ इन्व्हर्टरची डी.सी. केबल कापून नेल्याने प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी भूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरसोली शिवारातील गट नं. ९३ मध्ये सौरऊर्जा प्रकल्प कार्यरत आहे..गेल्या रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी या प्रकल्पाला लक्ष्य केले. चोरट्यांनी प्रकल्पातील ११ इन्व्हर्टरला जोडलेली १९०० मीटर लांबीची डी.सी. केबल कापून चोरून नेली. या चोरीला गेलेल्या मालाची अंदाजे किंमत ३८ हजार रुपये आहे. या प्रकरणी प्रकल्पाशी संबंधित कृष्णकुमार सारडा (वय २८, रा. लातूर) यांनी शुक्रवारी (ता. ३०) दिलेल्या फिर्यादीवरून भूम पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. जिल्ह्यात सध्या सौरऊर्जा प्रकल्पांच्या साहित्याची चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. निर्जन ठिकाणी असलेले हे प्रकल्प चोरट्यांचे सोपे लक्ष्य ठरत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.