ॲग्रोवन वृत्तसेवा
Ramnath Thakur : पटना : शेतीक्षेत्रात प्रगती साधण्यासाठी नव्या संकल्पना स्वीकारणे काळाची गरज आहे. शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी लहान शेतकऱ्यांना संघटितपणे पुढे यावे लागेल, सामूहिक प्रयत्न करावे लागतील, त्यातून शेतीचे चित्र बदलता येईल. नव्या कृषी क्रांतीमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी व्यक्त केला.
‘सहकार भारती’ संस्थेच्या शेतकरी उत्पादक कंपनी प्रकोष्ठ आयोजित पहिले राष्ट्रीय अधिवेशन २४ व २५ ऑगस्ट रोजी पटना(बिहार) येथील ऊर्जा ऑडिटरियम येथे होत आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात कृषी राज्यमंत्री ठाकूर बोलत आहे. व्यासपीठावर बिहारचे कृषिमंत्री मंगल पांडे, सहकारमंत्री प्रेमकुमार, ‘नाबार्ड’चे उपव्यवस्थापकीय संचालक डॉ. अजयकुमार सूद, बिहार विधानसभा सदस्य डॉ. संजय चौरसिया, ‘नाफेड’चे संचालक अशोक ठाकूर, ‘एनसीसीएफ’'चे अध्यक्ष विशाल सिंग,सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनानाथ ठाकूर, राष्ट्रीय सरचिटणीस उदय जोशी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ठाकूर म्हणाले, की शेतीमध्ये शेतकऱ्यांचे काढणीपश्चात ६० ते ७० टक्के नुकसान होत आहे. ते टाळण्यासाठी शीतसाखळी विकास व मूल्यवर्धनासाठी केंद्र सरकारने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून
कृषी उत्पादनाची गुणवत्तापूर्ण निर्मिती करून जागतिक बाजारपेठ काबीज करावी. शेतकरी उत्पादक असून तो आता व्यापारक्षम बनतोय, त्याची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने प्रयत्नशील राहावे. दिनानाथ ठाकूर म्हणाले, की शेतकऱ्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था व अर्थशास्त्र समजून प्रगतीचा संघटित मंत्र अंगीकारावा.
कार्यक्रमात मान्यवर व उपस्थितांचे स्वागत अधिवेशनाचे समन्वयक सहकार भारतीचे सरचिटणीस दीपक चौरसिया यांनी केले. प्रास्ताविक अखिल भारतीय सहकार भारतीचे सरचिटणीस डॉ. उदय जोशी केले. या वेळी आभार प्रदर्शन सहकार भारतीच्या शेतकरी उत्पादक संघ विभागाचे प्रकोस्था प्रमुख पी. आर. मुरलीधरन यांनी केले. अधिवेशनासाठी देशभरातून १ हजारहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.
‘महासंघाच्या माध्यमातून कोंडी सोडवली जावी’
‘‘शेतकरी एक उत्पादक आहे; मात्र त्याच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देताना उत्पादन व विपणनसंबंधी अभ्यासू घटकांची गरज आहे. त्यामुळे कंपनी स्थापनेनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी हा अभ्यासू व प्रशिक्षित असावा. नवे पैलू संकल्पना त्याच्या ज्ञात असाव्यात. गुणवत्तापूर्ण उत्पादन, प्रक्रिया यासंबंधी अनेक आव्हाने समोर आहेत. त्यांची कोंडी सोडविण्यासाठी महासंघाची गरज असून विकास शक्य आहे, ‘एफपीओ’ने कॉर्पोरेट कंपन्यांशी संलग्न पद्धतीने कामकाज करावे असे मत ‘नाबार्ड’चे उपव्यवस्थापकीय संचालक डॉ.अजयकुमार सूद यांनी व्यक्त केले.
मान्यवरांच्या भाषणातील मुद्दे:
- स्थानिक उत्पादनांच्या माध्यमातून बाजारपेठ मिळवून उत्पन्नवाढ शक्य.
- संधी ओळखून कृषी निर्यातीवर भर देण्याची गरज.
- शेतकरी उत्पादक संघ व्यक्तिगत पातळीवर स्पर्धात्मक कामकाज करू शकत नाही; त्यामुळे महासंघ महत्त्वाचे
- प्रत्येक शेतकरी उत्पादक संघाच्या संचालकांच्या कामकाजामध्ये पारदर्शकता व एकी हवी.
- राज्य व केंद्र सरकारच्या अनेक योजनांच्या माध्यमातून कामकाज विस्तार व्हावा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.