Solapur News: सीना नदीच्या पुरानं नदीकाठच्या माढा तालुक्यातील केवड, उंदरगाव, सीना दारफळ, राहुलनगर या गावांसह आसपासच्या परिसरात शेतकऱ्यांचं जगणंच उद्ध्वस्त करून टाकलं आहे. हिरव्या शेतांची जागा आता खोल खड्ड्यांनी घेतली आहे. कुठं माती खरडून गेली आहे, तर कुठं शेताचं मैदान झालं आहे, ‘‘नुसतं शेताचं न्हाई, नुकसान बगून पोटातबी खड्डा पडलाय...’’ अशा शब्दात माढ्यातील केवडच्या शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडली. .वैराग-माढा मार्गावर केवड आणि उंदरगावमधून सीना नदी वाहते आहे. या नदीकाठच्या दोन्ही गावांतील शेतकऱ्यांना या महापुराचा मोठा फटका बसला आहे. केवड परिसरातील अनेक शेतकऱ्यांचं आयुष्य पार कोलमडून टाकलं आहे. पीक, माती, शेती सर्व काही वाहून गेलं. आज त्यांच्या शेतात पिकांचा हिरवागार रंग नाही, उसाच्या पानांची सळसळ नाही, आहे ते फक्त ओसाड जमीन, खोल खड्डे आणि या विध्वंसानं निर्माण केलेलं थरकाप उडवणारं चित्र..यापैकीच एक गाव केवड. या केवडचं भौगोलिक क्षेत्र १४०० हेक्टर आहे. त्यात सर्वाधिक १२५० हेक्टरपर्यंत उसाचे क्षेत्र आहे. हा ऊसपट्टा आहे, पण आता हा सर्व ऊसपट्टा चिपाडाचा पट्टा झाला आहे. त्यापैकीच एक केवड येथील दत्तात्रय धर्मे हे शेतकरी, त्यांची केवडमध्ये नदीकाठीच ५ एकर शेती आहे. त्यांची विचारपूस केली, तेव्हा त्यांना रडूच कोसळले. ‘‘मी जगायचं कसं ओ, पाण्यानं सगळंच नेलं...’’.Maharashtra Flood: आमची स्वप्नेही पुरात वाहून गेली.असं म्हणताना त्यांच्या डोळ्यात पाणी दाटले, तर आवाजातली हळहळ ऐकून अंगावर काटा आला. या सर्व ५ एकर क्षेत्रावर उसाचं पीक होतं. पण सीना नदीच्या पुरानं काही क्षणात सगळंच उद्ध्वस्त केलं, ते सांगत होते. आज त्यांच्या कुटुंबावर प्रचंड संकट आलं आहे. एक मुलगा अविनाश शेती करतो, दुसरा मुलगा केदार शिक्षण घेतो आहे. ‘‘आता शेती करायची की मुलाला शिकवायचं, हा प्रश्न आहेच..पण खायचं काय, हा प्रश्न सर्वाधिक मोठा आहे. साहेब, “शेतात पडलेले खड्डे नुसते खड्डे नाहीत, तर आमच्या पोटात हे नुकसान पाहून खड्डा पडला आहे.’’ हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर चिंता जाणवत होती. डोक्यावर बँकेचं साडेतीन लाखांचं आणि खासगी पाच-सहा लाखांचं, असं जवळपास १० लाखांचं कर्ज आहे..‘‘शेतीतून काही मिळणारच नाही, मग कर्ज फेडायचं कसं? साहेब, लई नुकसान झालंय हो... एवढं, असं कधी होईल, असं वाटलंच न्हाई...’’ धर्मे डोळ्यांत पाणी आणून सांगतात. त्याशिवाय नदीकाठच्या शहाजी पाटील, सुभाष पाटील, नानासाहेब पाटील, नाना लोंढे, बापू करंडे, विठ्ठल लटके, समाधान लटके, रावसाहेब लटके, सुधीर करंडे या शेतकऱ्यांचंही नुकसान तेवढंच मोठं झालं आहे..Beed Flood: बीडमधील पाणी ओसरले, पण जनजीवन विस्कळितच.उत्पन्न नाही, कर्ज कसं फेडायचं?‘‘हाता-तोंडाला आलेला घास पुरानं हिसकावून नेला...’’ असं सांगत शंकर भगवान लटके म्हणाले, शेतात तीन एकरांत केळीची बाग आणि दोन एकरांत ऊस उभा होता. केळीची लागवड करून नऊ महिने झाले होते. फक्त महिनाभरावर केळी काढणीला येणार होती, ऊसही महिन्याभरात साखर कारखान्याला जाणार होता. पण अचानक आलेल्या पुराच्या पाण्यानं सर्व काही नेस्तनाबूत केलं..‘‘मागच्या आठ दिवसांत आम्ही शेतात केळीच्या बागेतील घडांकडे पाहून स्वप्नं रंगवत होतो. केळीच्या घडांवर आमच्या कुटुंबाचा उद्याचा संसार लिहिला होता. पण एका क्षणात नदीनं सर्व हिसकावून नेलं,’’ असं सांगताना लटके यांना रडू कोसळले. केवळ पीकं नव्हे तर शेतातील ड्रीपचं साहित्य, शेतीसाठी वापरलेलं सामान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतातील सुपीक मातीसुद्धा पाण्यानं वाहून नेली..आई-वडील, पत्नी अमृता आणि दोन मुलं ऋतुराज व शिवराज या आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह फक्त शेतीवर अवलंबून आहे. मात्र आता हातात काहीच नाही. यातच बँकेचं १ लाख ६० हजार रुपयांचं कर्ज त्यांच्या डोक्यावर आहे. ‘‘आता उत्पन्न नाही, कर्ज कसं फेडायचं? दोन-तीन वर्षांनीही यातून बाहेर पडता येईल का, अशी काळजी सतावत आहे,’’ असं म्हणत लटके यांनी हळहळ व्यक्त केली..‘‘द्राक्षाची गोडी छाटणी कसली...आता फक्त कडू आठवणी शिल्लक’’केवडमधील सुग्रीव करंडे हे तर पुरते हतबल झाले आहेत, संकटच एवढे मोठे आहे, की त्यावर मात करायला त्राणच उरले नाही, अशी त्यांची भावना झाली आहे. ‘‘या महिन्यात द्राक्षाची गोडी छाटणी करायची होती. पण कसली छाटणी साहेब... आता फक्त कडू आठवणी शिल्लक राहिल्यात.’’ असं सांगताना त्यांचा आवाज दाटून आला. करंडे यांची ६ एकर शेती आहे. त्यात ३ एकर द्राक्ष, २ एकर ऊस आणि २ बेदाणा शेड होती. पाण्याच्या महापुरानं सर्वच उध्वस्त झालं. ऊस, द्राक्ष गेलंच..पण प्रत्येकी २० टनांचे दोन बेदाणा शेड, दोन पाणबुडी मोटारी, ट्रॅक्टर, ब्लोअर, क्रेट – असं साहित्यही सगळं पाण्यानं वाहून नेलं. सुमारे ३५ लाखाचं नुकसान झालं. द्राक्ष, उसासाठीच आणलेलं लाखभराचं खतही गेलं. एवढ्या वर्षांची मेहनत एका क्षणात संपली.’’ आता काय करावं, एवढं नुकसान भरुन कसं मिळणार, याची चिंता व्यक्त करताना सरकारनं ठोस मदत करावी, तरंच आम्ही जगतो, नाही तर काय खरं नाही, असं सांगत करंडे हताश होतात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.