रवींद्र पालकर, डॉ. उत्तम कदम, डॉ. सखाराम आघावAgriculture Pest Management: रब्बी हंगामात गहू हे देशातील एक महत्त्वाचे तृणधान्य पीक असून, त्यावर वाढीच्या विविध अवस्थांमध्ये अनेक किडी व रोगांचा प्रादुर्भाव होतो. या वर्षी सुरुवातीच्या अवस्थेपासूनच मावा या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्यातच या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे मावा किडीची संख्या झपाट्याने वाढलेली दिसून येत आहे. ही कीड गव्हाच्या कोवळ्या पानांवर व ओंब्यांवर समूहाने राहून रस शोषते. परिणामी पिकाची वाढ खुंटून उत्पादनात लक्षणीय घट होते..उपलब्ध शास्त्रीय नोंदींनुसार गहू पिकावर मावा किडीच्या विविध प्रजातींचा प्रादुर्भाव आढळून येतो. या लेखात नमूद केलेली छायाचित्रे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज परिसरात घेतलेली असून, ती मावा कीडीच्या सिटॅबियन अवेने या प्रजातीची आहेत. याच प्रजातीचा प्रादुर्भाव अहिल्यानगर जिल्ह्यातही आढळलेला असला तरी राज्यातील किंवा देशातील सर्वच गहू उत्पादक भागांमध्ये हीच प्रजाती आढळून येते, असे निश्चितपणे म्हणता येणार नाही. आजच्या लेखामध्ये सिटॅबियन अवेने या प्रजातींची ओळख छायाचित्रांच्या माध्यमातून करून घेऊ..शास्त्रीय नाव : सिटॅबियन अवेने (Sitabion avenae)यजमान पिके : गहू, जव (Barley), ओट्स व राई, इ.किडीची ओळख : या किडीचे पंखविरहित व पंखधारी असे दोन्ही प्रकार आढळतात..Wheat Pest : गव्हाच्या ओंब्या वाळू लागल्या; दाणेही गायब.पंखविरहित मावा कीडया किडीची पिले हिरवी किंवा लालसर असतात, तर प्रौढ मावा प्रामुख्याने हिरव्या अथवा तपकिरी रंगाचा दिसतो. प्रौढ मावा किडीची लांबी १.३ ते ३.३ मि.मी असून, त्याचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते, सुईसारखे असते. शृंगिका (ॲन्टेना - Antennae) काळ्या रंगाची असून ती शरीराच्या लांबीपेक्षा किंचित लहान असतात. पाय पिवळसर असून, मांड्यांचे टोक (Femora), मध्य पायखंड (Tibia) आणि पंजे (Tarsi) काळसर रंगाचे दिसतात. पाठीमागील बाजूस असलेले नळीप्रमाणे अवयव (Siphunculi) काळ्या रंगाचे, सरळ असून ते शेपटासारख्या भागापेक्षा (Cauda) थोडेसे अधिक लांब असतात..पंखधारी मावा कीडपंखधारी मावा हिरवा किंवा तपकिरी असून, त्याची लांबी साधारण १.६ ते २.९ मि.मी. इतकी असते. या प्रकारात पोटाच्या वरच्या बाजूस असलेले खंडांमधील काळसर ठिपके अथवा रेषा स्पष्टपणे दिसून येतात, हे या किडीची महत्त्वाची ओळख आहे..जीवनचक्रया किडीचे प्रजनन पूर्णतः पर्यावरणीय परिस्थिती व खाद्य उपलब्धतेवर अवलंबून असते. अनुकूल हवामानात, विशेषतः थंडी कमी असताना व अन्न मुबलकतेमध्ये ही कीड नराशिवाय जिवंत पिल्ले देणाऱ्या मादीद्वारे अलैंगिक प्रजनन करते. अशा परिस्थितीत कमी कालावधीत अनेक पिढ्या तयार होऊन प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. प्रतिकूल हवामानात तापमान घटल्यास किंवा अन्नाची कमतरता भासल्यास ही कीड लैंगिक प्रजनन करते. या अवस्थेत मादी मावा नराशी संयोग करून सुप्त अंडी घालते. ही अंडी अंडाकृती व काळ्या रंगाची असून, प्रतिकूल परिस्थितीत दीर्घकाळ सुप्त अवस्थेत राहतात..Wheat Disease: गहू पिकावरील ‘स्मट’ रोग: कारणे, लक्षणे आणि नियंत्रण .हवामान अनुकूल होताच, या अंड्यांतून फंडॅट्रिक्स म्हणजेच पहिली मादी बाहेर पडते. ही मादी पुढील अलैंगिक पिढ्यांची जनक ठरते आणि येथूनच नवीन वसाहतीची सुरुवात होते. अंडी फुटल्यानंतर किंवा जिवंत पिल्ले जन्माला आल्यानंतर मावा कीड प्रौढ होईपर्यंत चार पिल्लावस्था पार करते. तापमानानुसार साधारण ७ ते १९ दिवसांत पिले प्रौढ अवस्थेत पोहोचतात. प्रौढ कीड ७ ते ९ दिवस जगते. (एकूण जीवनचक्राचा कालावधी तापमानानुसार बदलतो. तापमान जितके जास्त, तितकी वाढ जलद होते. पर्यायाने पिढ्या कमी कालावधीत पूर्ण होतात)..नुकसानीचे स्वरूपकिडीची पिल्ले व प्रौढ दोन्ही गव्हाची पाने व ओंबीतून रस शोषतात. परिणामी पानांचा रंग पिवळा पडतो, पिकाची वाढ खुंटते व ओंब्यांमधील दाणे नीट भरत नाहीत. काही वेळा दाण्यांच्या वजनावरही प्रतिकूल परिणाम होऊन एकूण उत्पादनात लक्षणीय घट दिसून येते. याशिवाय ही कीड कॉर्निकल्सद्वारे गोड व चिकट द्रव (हनीड्यू) स्रवते. या स्रावावर काळ्या बुरशीची (सूटी मोल्ड) वाढ होते. त्यामुळे पानांवरील प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया बाधित होते. परिणामी, संपूर्ण पीक अशक्त बनून, हळूहळू कोरडे पडते. पीक वाळण्याची लक्षणे दिसून येतात..आर्थिक नुकसान पातळी१० पिले किंवा प्रौढ प्रति झाड.एकात्मिक व्यवस्थापनशेतामध्ये नियमित तणनियंत्रण करून स्वच्छता राखावी.नत्रयुक्त खतांचा संतुलित व शिफारशीनुसार वापर करावा.पिकास कोणत्याही अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये..प्रति एकर १० ते १२ पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा.शेतामध्ये ढालकीड, ग्रीन लेसविंग्स, सिरफिड माशी, अॅफिडियस प्रजाती, अॅफेलिनस प्रजाती या सारख्या उपयुक्त मित्रकीटकांचे संवर्धन व संरक्षण करावे.जैविक नियंत्रणासाठी लेकॅनिसिलियम लेकॅनी या बुरशीजन्य कीटकनाशकाच्या ४ ते ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात..रासायनिक नियंत्रणकिडीने आर्थिक नुकसान पातळी (ETL) ओलांडल्यास पुढील पैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी. पुढील फवारणी पिकाच्या अवस्थेनुसार तज्ज्ञांच्या सल्ल्याने कीटकनाशक बदलून करावी. (प्रमाण ः प्रति लिटर पाणी)क्विनॉलफॉस (२५ टक्के ई.सी.) १ ते २ मि.लि. किंवाथायामेथोक्झाम (२५ टक्के डब्ल्यू.जी.) ०.१ ग्रॅम किंवाबीटा-सायफ्लुथ्रिन (८.४९ टक्के) अधिक इमिडाक्लोप्रिड (१९.८१ टक्के ओ.डी.) संयुक्त कीटकनाशक ०.८ मि.लि.- रवींद्र पालकर ८८८८४०६५२२ (पीएच. डी. स्कॉलर, कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.