Solapur News: ‘‘उगवत्या उसाला हात लावून म्हणालो होतो, या वेळचं सगळं कर्ज फेडून टाकायचं. मका पीक तर लवकरच येणार होते, टोमॅटोबद्दल व्यापाऱ्यांशी बोलणी झाली होती..पण आता काहीच उरलं नाही...’’ हे सांगताना तिऱ्हे (ता. उत्तर सोलापूर) येथील बाबासाहेब गवळी या शेतकऱ्यांचा कंठ दाटून आला. त्यांचा तो चेहरा रिकामा, पण दुःखाने थकलेला. त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी नाही, पण त्यांच्या डोळ्यांत लपलेली शेतकऱ्याची जिवंत कहाणी अनुभवायला मिळाली..सीना नदी केवळ पाण्याचा प्रवाह नाही, ती या शेतकऱ्यांच्या घामाची गोष्ट आहे, ती शेतकऱ्यांच्या पोरांच्या शाळेची फी आहे. ती त्यांच्या आई-वडिलांच्या औषधांची आशा आहे आणि जेव्हा ती नदी दुःखाचा महापूर घेऊन येते, तेव्हा फक्त शेतच नाही, माणूससुद्धा कोसळतो, हे चित्र याठिकाणी पाहायला मिळते आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच या शेतात हिरवीगार डोलणारी पिके समृद्धतेने खुणावत होती..पण आता या ठिकाणी केवळ नजर जाईल तिथवर केवळ पाणीच पाणी, कुठे चिखल, कुठे खरवडलेली माती तर कुठे आशाळभूत नजरेने जमिनीवर पहुडलेली काळवंडून गेलेली पिके आणि शिवारे आपल्याला मदतीची याचना करतायत की काय, असा भास व्हावा, अशी अबोल, निःशब्द झाली आहेत..Maharashtra Flood Crisis : आम्ही तुमच्या सोबत आहोत....या अशाच गावांपैकी एक गाव सोलापूर-कोल्हापूर महामार्गावरील तिऱ्हे आहे. या गावालगतच अगदी चिटकून बाबासाहेब गवळी यांची शेती आणि या शेतीला लागूनच सीना नदी वाहते आहे. सीना नदीला यंदा वेगळंच रूप आलं. ‘‘रात्रीच्या अंधारात नदीने पात्र सोडलं. आधी पाणी शेतात शिरलं, नंतर त्याला दिशा उरली नाही आणि आम्हालाही वेळ,’’ बाबासाहेब आठवतात. टोमॅटोच्या दोन एकरावर पाणी सळसळत घुसलं..झाडं मुळासकट उचलून नेली, काही ठिकाणी केवळ टोमॅटोची नुसतीच बुडकी राहिली. वर सगळं खरवडून गेलं. अर्धा एकर मकाही पुरता आडवा झाला, एकही कणस वाचलं नाही आणि ज्याच्यावर आमची स्वप्न होती, सगळं भविष्य उभं होतं तो ऊसही चिपाडासारखा झुकून राहिलाय आता, एकेक आठवणी सांगताना, त्यांना शब्द फुटत नव्हते, प्रत्येकवेळी कंठ दाटत होता. तुम्हाला काय सांगू, आता काय होणार, याची चिंता लागली आहे..बँकेकडून घेतलेलं ५ लाखांचे कर्ज आहे, ते कसं फेडणार, हे सांगताना बाबासाहेब यांचा आवाज थरथरतो. ‘‘कर्ज फेडण्याचं स्वप्न होतं...पण आता हातात ना पिकं, ना पैशाचं साधन. कर्जमाफी झाली, तरच आम्ही वाचणार आहोत, अशी आर्तता त्यांनी व्यक्त केली. तिऱ्हे शेजारच्या शिवणी गावातील रुक्माकांत गुंड यांची आंब्याची बाग, ऊस, मका या पुरात वाहून गेली आहे. त्या आठवणी पुन्हा नको, असे सांगत हा धक्का आम्हाला सहन होत नाही, देवा आता आमची पुन्हा अशी परीक्षा पाहू नको, अशी भावना त्यांनी व्यक्त केली..Flood Crisis: पाण्याला सीमा नाही.आभाळाकडे पाहणारा, जमिनीकडे पाहतोयएका बँकेचे ५ लाखांचे बँकेचे कर्ज आहे, तर खासगी ३ टक्क्याने कर्ज घेतलं आहे. आता हे कर्ज फेडायचं होतं. पण आता कर्ज फेडण्याची ताकद नाही आणि पुन्हा कर्ज मागायचं धाडसही नाही, सरकार पंचनामा करेल, आकडे मांडेल, आकडे विसरेल. पण माझ्या डोळ्यात दिसणाऱ्या या पाण्याची मोजणी कोण करणार?, असं सांगताना प्रमोद गवळी गलबलून जातात. कधी डोकं वर करून आभाळाकडे पाहणारा हा माणूस, आज मात्र पायाखालच्या जमिनीकडे पाहत आहे..जनावरे वाचवली, गोठा वाहून गेला...बाबासाहेब गवळींकडे सात जनावरे आहेत, ती त्यांच्यासाठी घरातील सदस्यासारखीच. पुराची चाहूल लागली. तेव्हाच, या जनावरांना उचलून बाहेर काढलं, त्यांच्या डोळ्यांत भीती होती. तेही समजून गेले होते, की काहीतरी मोठं घडतंय... क्षणाचाही विलंब न करता, त्यांनी गोठ्यातून जनावरं बाहेर काढली, ती वाचली, पण गोठा जमीनदोस्त झाला. पण त्यांना गोठ्यापेक्षाही समाधान याचं आहे की माझी जनावरं वाचली..मातीने माझं सगळं गिळून टाकलं‘‘ज्या मातीत मी हात घालून पिकं उभी केली, त्या मातीनेच आता माझं सगळं गिळून टाकलं...’’ अशी भावना तिऱ्हे गावातीलच प्रमोद यशवंत गवळी या तरुण शेतकऱ्याने व्यक्त केली. ऊस, कांद्यावर मोठी स्वप्ने पाहिली होती. पण एका रात्रीत या पुरासकट ती वाहून गेली. आता काय करावं, असं ते म्हणतात. सीना नदीच्या काठावर त्यांची १० एकर शेती आणि शेतातील घर पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे. .त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. त्यात ६ एकर ऊस, ३ एकर कांदा होता, तो पूर्ण वाहून गेला. घरातलं पाणी काढायला थांबावं लागत नाही, कारण डोळ्यातूनच पाणी थांबत नाही. भांडी, कपडे, संसाराच्या साहित्याचे तुकडे चिखलात माखलेत. प्रमोद गवळी यांना दोन लहान मुलं आहेत. या मुलांना मी काय आणि कसा आधार देऊ, असा प्रश्न पडला आहे. माझ्या खिशात आता काहीच उरलं नाही, सरकारकडूनही अजून काहीच मिळालं नाही, असंही ते म्हणाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.