Traditional Festival: दिवाळीची मुहूर्तमेढ ठरणाऱ्या आश्विन कृष्ण द्वादशीला सवत्स गोपूजनाचा शुभ क्षण साजरा करून संपूर्ण भारतात आनंदाचा आणि दिव्यांचा दीपोत्सव सुरू होतो. गोवंशाच्या प्रथम सन्मानात असणारी दिवाळीची परंपरा आजही ग्रामीण भागात श्रद्धेने सुरू आहे. गाय आणि वासरू मूर्ती स्वरूपात शहरातही पुजले जाते. मात्र अशी गोमाता कालवड ऐवजी आपल्या नवजात गोऱ्ह्यासह दिसून आल्यास परंपरेचा विसर आणि वास्तवाचा दाह अशी आधुनिक मानसिकता आज दिसून येते..दरवर्षी गाईस एक वासरू हा जगात अगदी आवडीचा विषय आहे. दिवाळीत नुकत्याच प्रसूत झालेल्या गायीचे पूजन तिच्या वासरासह करण्याची भारतीय परंपरा अनादी काळापासून सुरू आहे. दिवसभर चरून येणारी गाय सायंकाळी दारासमोर सन्मानाने स्वागत करत, सगळा श्रद्धा भाव व्यक्त करत, सनईच्या मंगल स्वरात, पारंपरिक गीत आळवत, घरात दीपोत्सवाची उधळण करत, पौष्टिक नैवेद्यातून गोग्रास अर्पण करत आणि सुदृढ नवजात वासराच्या बालक्रीडांनी न्हाऊन साजरा केला जाणारा सण म्हणजे वसुबारस. याच दिवसापासून घरासमोर अंगणात सुंदर रंगीत रांगोळ्या आणि गोमयाचे रेखीव विविध आकार साकारणे या बाबी सहज माहीत असणारी पिढी आजही समाजात आहे..जोपर्यंत कृषी आधारित अर्थार्जन परिपूर्णपणे ग्रामीण कुटुंबांचा आधार होता, तोपर्यंत एकाही शेतकऱ्याच्या घरासमोर गोवंशाशिवाय अंगण नव्हते. शेतीतला पोषक चारा गोवंशास आणि गाईचे पौष्टिक दूध कुटुंबास हे चक्र गोमय खतामुळे अधिक गतिमान होत होते. शुद्ध देशी गोवंश सांभाळातून शेती, कुटुंब, पर्यावरण, आरोग्य समृद्धी निरंतर लाभत होती. दर वर्षाच्या नवजात कालवडी गोठा भरलेला ठेवायच्या, तर उमदे गोऱ्हे कसदार शेतीतून उत्पन्नात भर घालायचे. हे निसर्ग आणि पर्यावरणाचे चक्र आज नुसते थांबले नसून उलट दिशेने फिरल्याचा अनुभव येत आहे..Vasubaras Diwali Article : माळरानी फुलले चैतन्य....निसर्गात गाय आणि दूध या परस्पर पूरक गोष्टी आहेत. मात्र ‘दुधाशिवाय गाय’ असा आग्रही पुढाकार ठासून सांगताना गोमातेकडून दूधच नको अशी अनेक गोप्रेमींची मागणी वाढत आहे. गोमय आणि गोमूत्रातून मिळणाऱ्या उत्पन्नात गोसांभाळ परवडतो, गो उत्पादनांची संख्या हजारावर गेली आहे, सेंद्रिय शेतीसाठी गाय फायद्याची आहे. या सगळ्या बाबी गोवंश संवर्धनासाठी सुरू असलेल्या मोहिमेत नियमित दिसून येतात. गोशाळेत अगदी २५ टक्के गाईसुद्धा गाभण नकोच यावर एकमत वाढत आहे..मात्र ज्या गाईला वासरूच नाही, त्या गाईंचे सवत्स पूजन दरवर्षी कसे करणार, याबाबत चर्चाच होत नाही. राज्यात दरवर्षी ७० टक्के देशी गोवंश वर्षातील कोणत्याही दिवशी वसुबारस साजरी करण्यासाठी म्हणजे अर्थाने सवत्स पूजनासाठी गोठ्यात उपलब्ध होत नाही, याचा गांभीर्याने विचार केला जात नाही. मात्र जेवढ्या शुद्ध देशी गाई दरवर्षी वासरू देतात तेवढ्याच गाई सन्मानाने सांभाळल्या जातात, हे जळजळीत सत्य असते. गाईकडून दरवर्षी वासरू न मिळणे हा सांभाळणाऱ्या गोपालकाचा पराभव असतो, आणि त्याला वसुबारस साजरा करण्याचा आनंद लाभत नाही..सांभाळलेल्या शुद्ध देशी गोवंशाच्या गाईस नवजात वासरू असताना वसुबारस साजरी करण्यासाठी परंपरेत कधीही साशंकता नव्हती. आपल्या राज्यात गोवंशाची वासरे ‘दररोज सरासरी एक किलो’ या शरीर वजन वाढीत असणारे गोठे, गोपालक, सांभाळाच्या पद्धती या संस्कृतीचा आणि अभिमानाचा वारसा दिसून येतो. आजही खिलार गोवंशाची वासरे सर्वाधिक कौतुकाने वाढवली जातात. मात्र या परंपरेला वासराच्या लिंग वर्गीकरणाचा भेदभाव आधुनिक, व्यवहारिक, पाश्चिमात्य मानसिकतेत सुरू झाला आहे..गाय-गोऱ्ह्याची बारसगोठ्यातील गाईला दरवर्षी कालवड झाली, तर आनंदाची वसुबारस आणि गोऱ्हा झाला तर संताप असे दिवस आले आहेत. आम्ही देशी गोवंश संवर्धनाचे भोई म्हणणारे अनेक गोपालक गाईला झालेला गोऱ्हा म्हणजे सांभाळण्यास भार समजत असतील तर ते गोवंश सांभाळ तरी किती आत्मीयतेने करतील आणि वंश संवर्धनाचे ध्येय साध्य करतील, याबाबत शंका निर्माण झाली आहे. गोवंश संवर्धन आणि विकास याची शून्य माहिती असणारे गोपालक दिवसेंदिवस वाढत असताना वसुबारस परंपरा टिकेल कशी, हा यक्ष प्रश्न आहे..Dishi Govansh : वसुबारस ः भारतीय गोसंपदेचा गौरव उत्सव.गोवंश संवर्धन आणि समृद्धीचे शिवधनुष्य हजारो नर वासरांच्या निवडीच्या, निकषांच्या, तपासण्यांच्या, आनुवंशिकतेच्या अभ्यासाच्या आधारावर अवलंबून असताना गायीला होणारा गोऱ्हा नकोच अशी भूमिका शुद्ध देशी गोवंशात पायावर दगड पडणारी आहे. प्रत्येक एकर शेतीसाठी, विषमुक्त अन्न निर्मितीसाठी, भूमी सुपोषणासाठी, अपारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठी नर गोवंशाची उपयुक्तता वाढविण्याचे प्रयत्न आजच १०० पट वाढवण्याचे ध्येय ठरणार नाही, तोपर्यंत ‘गाय गोऱ्ह्याची बारस’ आनंदाची ठरणार नाही..नर गोवंशाचे करायचे काय, हा प्रश्न देशी गोवंश विकासात, संवर्धनात आणि सांभाळात विचारण्यापेक्षा नर गोवंशाची उपयुक्तता वाढविण्याचे कौशल्य शोधणे यासाठी अधिक आग्रही पुढाकार अपेक्षित आहे. केवळ कालवड मिळविण्याच्या रेतमात्रा भारतीय गोवंशाच्या संवर्धनात अडचणीच्या ठरतील, कारण निवडीच्या नरगोवंशाचे पर्यायच भविष्यात उपलब्ध असणार नाहीत. प्रगत गोपालनात ज्या देशांनी विकास साधला, त्यांनी नर गोवंश समृद्धीकडे फार अधिक लक्ष दिले आहे, याची जाणीव प्रत्येक गोपालकाच्या मनात ठसणे गरजेचे आहे. दूध नको आणि नर गोवंश नको या मानसिकतेत शुद्ध देशी गोवंश संवर्धन आणि विकास अंकित करण्यापेक्षा परंपरेने दाखविलेला वसुबारसेचा मार्ग म्हणजे दरवर्षी एक वासरू याबाबत आग्रही पुढाकार गरजेचा आहे..राज्यातील किमान दोन गोवंश अधिकृत नोंदणी झालेले असताना, परीक्षणातून सिद्ध झालेले वळू अथवा त्या वंशाच्या रेतमात्राही आज उपलब्ध नाहीत हे वास्तव विसरता कामा नये. इतरही राज्यातील गोवंशाच्या जातीचे खात्रीशीर सिद्ध वळू मिळवण्यासाठी होणारी दमछाक ज्यांना कळते, तेच गोवंशाचे रक्षक ठरू शकतात. गोपालकांच्या दारातील शुद्ध वंशाच्या गाई सदैव नर वासरांसाठीच प्रथम प्राधान्याने सांभाळणे अपेक्षित आहे. तेव्हा, शुद्ध देशी गोवंशात दरवर्षी सहर्ष वसुबारस साजरी करण्याचा योग लाभावा आणि कालवड मिळो किंवा गोरा मिळो त्यात अंतर नको अशी भूमिका असावी..वसुबारसेला गोठ्यात असणारी वासरासह गोमाता म्हणजे दुधाची उपलब्धता. धारोष्ण दूध हा शब्दच बहुतांश पिढीला कालबाह्य ठरला आहे. ज्यांच्या नशिबात घरी दूध देणारी गाय आहे, त्यांनी पुढील पिढीसाठी धारोष्ण दुधाचा संस्कार आपल्या नातवंडांसाठी टिकून ठेवावा असे परंपरेत अपेक्षित आहे. वास्तवात मात्र स्वच्छ दूध, रसायनमुक्त दूध आणि निर्भेळ दूध मिळण्यासाठी समाजातील फारच कमी लोक आज भाग्यवंत ठरत आहेत. आपल्याच गोठ्यातील अशा प्रकारचे पौष्टिक, आरोग्यमयी, ताजे दूध सदैव उपलब्ध असण्यासाठी दुधाशिवाय गाय हा विचार सर्वांनी वगळणे गरजेचे आहे..संस्कृतीने आपणास कामधेनू गोमाता दिली असताना, वेत नको-दूध नको -गोरा नको किंवा तिरस्कार करण्यासाठी संकरित नको, म्हैस नको अशी सगळी विचारसरणी विज्ञान युगात मनातून दूर करून आपल्या शुद्ध देशी गोवंशासाठी अभिमानाने वसुबारस साजरी करण्याचा संकल्प दृढ करावा आणि निसर्ग, पर्यावरण, आरोग्य, भूमी, कुटुंब शाश्वत विकासासाठी प्रगल्भ वैज्ञानिक विचार करावा, हेच अपेक्षित!डॉ. नितीन मार्कंडेय, ९४२२६५७२५१अशासकीय सदस्य, महाराष्ट्र गोसेवा आयोग, पुणे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.