India Fruit Trade: सध्या उन्हाळी हंगाम सुरू झाला असून लिंबू, काकडी. कलिंगड, खरबूज आदी पिकांची मागणी वाढली असून आवक सुरू झाली आहे. जळगाव जिल्हा या पिकांमध्ये आघाडीवर असतो. सततचा पाऊस, प्रतिकूल हवामान आदी कारणांमुळे या पिकांना मागील वर्षी मोठा फटका बसला. अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या धैर्याने आपली पिके वाचवण्याचा, बाग जोपासण्याचा प्रयत्न केला. अर्थात उत्पादन यंदा कमी आहे. मात्र दर तेजीत आहेत. शेतकरी निश्चित आशावादी आहेत. .अवीट गोडी व आरोग्यवर्धक अशा उन्हाळी हंगामातील फळांची बाजारात आवक सुरू झाली आहे. कलिंगड, खरबूज व लिंबू आदींना मागील वर्षात व आत्ताही प्रतिकूल हवामानाचा फटका बसल्याने उत्पादनावर परिणाम झाला. परिणामी आवक कमी आहे. काकडी, कलिंगड, खरबूज व लिंबाचे दर यंदा सुरवातीपासून टिकून आहेत. जळगाव जिल्हा वा खानदेश बाबतीत बोलायचे झाल्यास जळगाव बाजार समितीमध्ये काकडी व लिंबाची आवक होत असून कलिंगड, खरबुजाची थेट शिवार खरेदी सुरू आहे. काकडी, लिंबाची बाजार समितीमधील चार -पाच आडतदारांकडे अधिक आवक होते. काही अडतदार या मालांची शेतकऱ्यांकडे आगाऊ मागणी करून ठेवतात..Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ .लिंबू पिकाचे चित्रजळगाव जिल्ह्यात लिंबाचे क्षेत्र तसे कमी आहे. तापी, गिरणा, पांझरा नदीकाठी बागा असून एकूण क्षेत्र तीन हजार हेक्टरच्या आसपास असावे. मागील वर्षी झालेला वादळी पाऊस व गारपिटीत भडगाव, चाळीसगाव व एरंडोल भागातील बागांचे मोठे नुकसान झाले. अर्थात प्रयोगशील व हिम्मतवान शेतकऱ्यांनी त्यातूनही बागा वाचवून त्यांची जोपासना केली. यंदा अतिपाऊस व ढगाळ वातावरण यामुळे लिंबाचे उत्पादन निम्म्याने घटले आहे. मागील ऑक्टोबरमध्येही पाऊस सुरू राहिल्याने हंगाम लांबला. एरवी जानेवारीत सुरू होणारी आवक यंदा उशिरा सुरू झाली. जिल्ह्यात उत्राण (ता.एरंडोल() येथील लिंबू सुवास, चमकदारपणा यासाठी प्रसिद्ध असून परिसरात सुमारे ४०० हेक्टरवर लिंबू बागा आहेत..जळगाव जिल्ह्यातील विविध बाजारांसह मुंबई, पुणे आदी भागातही येथून लिंबू पाठवला जातो. सुरत येथेही त्यास कायमच मोठी उठाव असतो. जळगाव बाजार समितीत जामनेर, पाचोरा, एरंडोल आदी भागातून दररोज १५ ते १६ क्विंटल आवक आहे. किमान ५० तर कमाल ७५ रुपये प्रति किलो या दरांत लिलाव सुरू आहे. जळगाव, भुसावळ शहरांतील किरकोळ बाजारांत हेच दर १० ते १२० रुपये आहेत. लिंबू पिकात हिवाळ्यात तोटा आला. पण सध्या दर स्थिर असल्याचे उत्राण येथील लिंबू उत्पादक अनिल महाजन म्हणाले..Fruit Crop Insurance: हवामानाधारित फळपीक विमा योजनेत परभणीतील १ हजार २१५ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित.काकडीची आवकजिल्ह्यात जामनेर, चोपडा, एरंडोल, पाचोरा, यावल, भुसावळ आदी भागांमध्ये काकडीचे क्षेत्र आहे. सुमारे १५० ते १५५ हेक्टरवर लागवड झाली असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे एकट्या जळगाव बाजारपेठेत आखूड काकडीची दररोज २५ ते ३० क्विंटल, दर प्रति किलो २० ते २५ रुपये तर लांबट काकडीची २४ ते २५ क्विंटल आवक तर दर २५ ते ३० रुपये आहे. मागील हंगामातही आखूड व लांब काकडीचे दर फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत कमाल ३० व किमान २५ रुपये होते..कलिंगडास विक्रमी दरजिल्ह्यात भाजीपाला पिकांत जामनेर तालुका अग्रेसर आहे. येथील चिंचखेडा, नेरी बुद्रूक, पळसखेडा, हिवरखेडा, गारखेडा, सामरोद, हिंगणे, कापूसवाडी, पहूर, नाचणखेडा, शेंदूर्णी, फत्तेपूर, शहापूर आदी भागांमध्ये कलिंगड, खरबुजाची लागवड झाली आहे. रमझान सणाच्या कालावधीतील दरांचा लाभ व्हावा यासाठी मागील नोव्हेंबरच्या काळातच लागवडीचे नियोजन झाले होते. जिल्ह्यात कलिंगडाची सुमारे साडेचार हजार हेक्टरवर नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत लागवड तर खरबुजाची सुमारे १२०० हेक्टरवर लागवड झाली. प्रतिकूल स्थिती, अति थंडीचा परिणाम म्हणून अनेक भागातील पीक हातचे गेले. यात जामनेरातील अनेक शेतकऱ्यांचे पीक मात्र बऱ्यापैकी हाती आले. पण उत्पादन कमी आहे..खरबुजाचे एकरी १० टन तर कलिंगडाचे २० टनांच्या आसपास उत्पादन अपेक्षित असते. मात्र यंदा ते अनुक्रमे सहा- सात टन व १० ते १२ टन मिळाले आहे. यामुळे रमझान महिना सुरू होतानाच आवक अल्प आहे. जामनेर भागातील अनेक शेतकऱ्यांना कलिंगडास कमाल २३ रुपये प्रति किलोचा दर यंदाच्या १५ ते १९ फेब्रुवारीस मिळाला आहे. खरबुजालाही दर्जानुसार कमाल २४ व किमान २१ रुपये प्रति किलो दर जागेवर मिळत आहेत. जिल्ह्यात खरबुजाची दररोज चार ते पाच ट्रक ( प्रति ट्रक १० टन क्षमता) तर कलिंगडाची पाच ते सहा ट्रक आवक आहे..यंदा कलिंगड क्षेत्र कमीचकलिंगडास मागील वर्षी जागेवर प्रति किलो पाच ते नऊ रुपये र फेब्रुवारी ते मे या कालावधीत मिळाले होते. लागवड अधिक होती. उत्पादनही बरे होते. पण अल्प दर मिळाले. अनेकांचा खर्चही निघाला नाही. यामुळे मोठ्या क्षेत्रात दरवर्षी कलिंगड घेणाऱ्या अनेकांनी यंदाच्या लागवड टाळली. यात काही नवे शेतकरी लागवडीसाठी तयार झाले. परंतु पिकाचे प्रतिकूल वातावरणाने नुकसान झाले. यामुळे कलिंगडाची आवक जळगाव जिल्ह्यात यंदा मागील हंगामाच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी आहे. मागील हंगामात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठ ते १० दिवसांत प्रतिदिन १५ ते १८ ट्रक ( प्रति ट्रक १६ टन क्षमता) कलिंगडाची आवक जळगाव जिल्ह्यात सुरू होती अशी माहिती बाजारपेठ जाणकार नितीन पाटील (नागणखुर्द, ता.जामनेर) यांनी दिली..नेपाळ, आखातात पाठवणूकजळगाव जिल्ह्यातून दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, छत्तीसगड तसेच नेपाळ, सौदी अरेबिया, ओमान, कतार या देशांतही निर्यात झाली आहे. परदेशातून मागणी आहे. मात्र आवक कमी असल्याने खरेदीदार, व्यापाऱ्यांची कलिंगड, खरबुजासाठी धावाधाव, शोधाशोध सुरू असल्याची स्थिती अनेक वर्षानंतर तयार झाली आहे.अनिल महाजन ९७३०१८५४९९ (लिंबू उत्पादक, उत्राण (जि.जळगाव )नितीन पाटील ९८५०८९१६६३(कलिंगड, खरबूज उत्पादक, नागणखुर्द (ता.जामनेर, जि.जळगाव).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.