Sarkar Family: त्यांचं सरनोबत सरकार घराणं. हे मूळचे पन्हाळा गडावरचे पाटील. सरनोबत ही त्यांना बहाल केलेली पदवी. संस्थानं खालसा होतील तशी इनाम शेतजमिनीच्या गावी स्थलांतर होण्याच्या दिवसात तिरपणमध्ये स्थायिक झालेलं सुहासचं घराणं. मूळ जमिनीचे हिस्से वाटप होत होत आजमितीला सुहासकडे दहा एकर शेत आहे. मित्रमंडळी सुहासला सरकार म्हणून संबोधतात, पण ती हवा त्याच्या डोक्यात नाही..सुहास आज फक्त एक यशस्वी शेतकरी आहे. बस्स. पूर्वजांच्या कर्तबगारीच्या गप्पांनी पोट चालणार नाही; पण त्यांच्या पुण्याईने आपल्याकडे शेत आहे, ते नीट कसण्यासाठी आहे, याचं भान ठेवून जगणारा एक कष्टाळू शेतकरी..Agrowon Diwali Article: माळरानावर रुजविले हिरवाईचे स्वप्न....बी.ए. झालेल्या सुहासला वनविभागाचं आकर्षण होतं. उद्देश काय तर निसर्ग आणि वन्य जीव यांच्या सान्निध्यात राहता यावं. तिथे नोकरी करण्याचं स्वप्न आणि त्यासाठी खटपटी करण्याचे ते शिक्षण चालू असतानाचे दिवस होते. त्या वेळी घरच्या एकूण वीस एकर शेतीमध्ये बहुतांशी ऊस, भात शेती आणि गुऱ्हाळ घर असा अटाला होता. हा व्याप २००५ पर्यंत वडील संभाळत होते. त्या आधीपासूनच सुहास वडिलांना शेतीकामात मदत करत होता. दरम्यान शिक्षण घेत घेत तो वडिलांना विचारून लावणीचा ऊस तुटून गेल्यावर खोडव्याच्या पिकात आंतरपीक म्हणून कलिंगडं घेऊ लागला..त्याला त्यामधली नस इतकी अचूक सापडली होती की कलिंगड पिकातला तो माहीतगार तज्ज्ञच बनला. त्याने २०१२ पर्यंत उसातल्या कलिंगडात नाव आणि पैसे कमावले. उत्तम गुणवत्तेचं पीक दिल्यावर व्यापाऱ्यांशी सुद्धा नीट संबंध ठेवता येतात, याचे अनुभव सुहासकडे आहेत. त्यानंतर त्याने २०१२ नंतर कोल्हापूर काकडी बियाणे निर्मितीचा प्रयोग केला. पक्व काकडी झाल्यावर ती बाजारात विकायला नेण्यापेक्षा बियाणे निर्मितीची प्रक्रिया क्लिष्ट असते. काकडी पूर्ण वाढ होऊनही शेतातच ठेवली जाते. .त्यानंतर ती कापून त्या मधल्या चिकट गरातल्या शेकडो बिया स्वच्छ धुऊन त्या सावलीत सुकवल्या जात आणि त्यावर बुरशीनाशकाची प्रक्रिया करून त्या पॅकिंग केल्या जायच्या. त्या पूर्ण महाराष्ट्रात वितरित व्हायच्या. सुहासने हा प्रयोग २०१८ पर्यंत केला. यामध्ये सगळा खर्च वजा जाता केवळ तीन महिने कालावधीत गुंठ्याला अडीच हजारांपर्यंत उत्पादन मिळाल्याची नोंद त्याच्या लिखापढीत दिसते. त्यानंतर सुहासने २०२२ पर्यंत केळी पीक घेतले. त्याचे उत्पादन एकरी १८ ते २० टन इतके मिळाले. पण कोरोनाने कंबरडे मोडल्यानंतर सुहास झेंडू फुलाकडे वळला. त्याने केळीला समांतरच २०१८ पासून काही क्षेत्रावर झेंडूचे उत्पादन चालू केले होतेच. पण केळीनंतर मात्र तो पूर्णतया झेंडूचा उत्पादक झाला. तीन महिन्यांच्या या फुलशेतीच्या कालावधीमध्ये सणवारांचा अथवा लग्नसराईचा अभ्यास करून रोप लागण करावी लागते. गणपती, दसरा, दिवाळी, मार्गशीर्ष या सणांच्या महिन्यांत फुले विक्रीला येतील असे नियोजन लावावे लागते. .Agrowon Diwali Article: शाश्वत शेती पद्धतीशिवाय पर्याय नाही.फुलं नाशिवंत असल्यामुळे काढणीची यंत्रणा तत्पर ठेवावी लागते. याच दरम्यान सुहासचं बंदिस्त फुलशेतीचं आकर्षण वाढत गेलं. झेंडू फुलशेतीच्या अनुभवामुळे निर्माण झालेले व्यापारी संपर्क बळकट होतेच. त्यामुळे सुहास हरितगृहातील (पॉलिहाउस) फुलशेती करण्याच्या तयारीला लागला. या वेळी त्याला सरकारी अर्थसाह्य घेऊन अनुदान तत्त्वावर काम सुरू करण्याची इच्छा असताना सरकारी चालढकलीचा वाईट अनुभव आला. मनस्ताप देणाऱ्या क्लिष्ट प्रक्रियांचा नाद सोडून वैयक्तिक बँक कर्ज करून दहा गुंठ्यांचे सेकंड हँड शेड खरेदी केले. त्याला कर्ज प्रकरण करून संपूर्ण नवे खरेदी करण्याची इच्छा होती. पण सात लाख रुपयांत एक पूर्ण सेटअप मिळाला आणि सुहासचं पॉलिहाउसचं स्वप्न प्रत्यक्षात आलं. २०२२ पासून तो फुलशेतकरी आहे. .सध्या त्याची दोन हरितगृहं आहेत. एक क्रिजेंटीमम् (Cryijuntimum) म्हणजेच शेवंतीच्या पाच ते सहा रंगांच्या फुलांनी बहरलेले हरितगृह आहे. दुसऱ्या १० गुंठ्यांच्या हरितगृहात त्याने लिसियन्ट्स (Lisianthus) या सहा ते सात रंगांच्या फुलांचे हरितगृह उभारले आहे. लिसियन्ट्स ही मूळच्या सकाटा या जपानी बियाण्यांची कंपनी. त्याची रोपवाटिका बंगळूरमध्ये आहे. तिथून रोपे वितरित केली जातात. तीन महिन्यांत फूल हंगाम सुरू होतो. याचे संकलन केंद्र कोल्हापूर येथे आहे. दसऱ्यापासून लग्नसराई संपेपर्यंत फुलांना मागणी असते. याची पण लागण संभाव्य अंदाजानुसार टप्प्याटप्प्याने केली जाते. .सीझनमध्ये मुंबई, गोवा, दिल्ली, कोलकाता, इत्यादी प्रमुख शहरांत सुहासच्या शेतातली फुले जातात. या फुलांची टिकवण क्षमता पंधरा ते वीस दिवसांपर्यंत असते. फुले काढणीसाठी सुहासकडे स्त्री कामगारांची एक स्वतंत्र यंत्रणा आहे. या स्टाफकडून दहा- दहा फुलांचा एक गुच्छ करून घेतला जातो. त्या कामाचे सगळे व्यवस्थापन, क्वालिटी कंट्रोल आणि पॅकिंग ही जबाबदारी सुहासच्या पत्नी संचिता संभाळतात. त्या बी.एस्सी., एमएसडब्ल्यू झाल्या आहेत.(संपूर्ण लेख वाचा २०२6 च्या ॲग्रोवन दिवाळी अंकात).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.