डॉ. संजय काकडेविदर्भासह महाराष्ट्रातील कापूस उत्पादक पट्ट्यामध्ये दहा बारा दिवसांच्या मोठ्या खंडानंतर मागील दोन तीन दिवसांपासून मोठा पाऊस झाला. विशेषतः पश्चिम विदर्भातील बऱ्याच भागात अतिवृष्टी झाली. या मोठ्या पावसानंतर शेतातील जमिनीवर बराच काळ पाणी साचून राहिले. त्यामुळे अन्य खरीप पिकांसोबतच कापूस पिकाचेही मोठे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. .अति पावसामुळे साचलेल्या पाण्यात कपाशीची झाडे बुडून राहिल्यास त्यांच्या कापूस उत्पादनावर अनिष्ट परिणाम संभवतो. विशेषतः कपाशीच्या मुळ्या सडण्याची शक्यता आहे. मुळांना प्रामुख्याने मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. काळ्या भारी जमिनीतून पाण्याचा निचरा कमी होतो. परिणामी, कापसाच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात वाफसा नसल्यामुळे मुळे अन्नद्रव्ये उचलू शकत नाही..Cotton Crop Disease : कापूस पिकावरील दहिया रोगाचे नियंत्रण.लक्षणे ः कपाशीच्या आकस्मिक मरमध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेले असते. त्याच वेळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक कपाशीची झाडे हिरवी असतानाच क्षीण व मलूल होऊन खालच्या बाजूने झुकतात. झाड सुकते. कालांतराने झाडाची पाने गळतात. काही काळाने हे झाड मरते. यालाच आकस्मिक मर म्हणतात. .यासाठी कोणतीही बुरशी, जिवाणू किंवा विषाणू जबाबदार नाही. पाऊस पडल्यानंतर ३६-४८ तासांत आकस्मिक मरची लक्षणे दिसू लागतात. सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात त्यामुळे उत्पादनात मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आकस्मिक मरची लक्षणे दिसून तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे..उपाययोजनाशेतातील साचलेले पाणी चर काढून शेताबाहेर काढावे. सखल भागातील पाण्याला वाट करून द्यावी.पाणी साचलेल्या कपाशी पिकात मरग्रस्त झाडे आढळून आल्यास थोडाफार वाफसा आल्यावर झुकलेल्या झाडांना त्या बाजूने मातीची भर देऊन आधार द्यावा. ती सरळ करावीत. दोन पायांच्या मध्ये घेऊन व्यवस्थित दाबून घ्यावीत.वाऱ्या वादळाने कपाशीचे खोड हलून ढिले पडते, अशी झाडेही मातीची भर देत दाबून घ्यावीत..Cotton Disease : खारपाण पट्ट्यात कपाशीवर ‘स्पोडोप्टेरा’चा प्रादुर्भाव.कॉपर ऑक्सिक्लोराइड २५ ग्रॅम अधिक १५० ग्रॅम युरिया अधिक १०० ग्रॅम पांढरा पोटॅश प्रति १० लिटर पाणी या द्रावणाची प्रति झाडाच्या बुंध्याशी १०० मिलि या प्रमाणे बांगडी पद्धतीने आळवणी करावी. पाठीवरील नॅपसॅक पंपाचे नोझल काढून ही आळवणी करता येईल. किंवा १३:००:४५ हे खत १ किलो अधिक कोबाल्ट क्लोराइड २ ग्रॅम अधिक कॉपर ऑक्सिक्लोराइड २५० ग्रॅम प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणाची प्रति झाड १०० मिलि आळवणी (ड्रेंचिंग) करावी. (*विद्यापीठ शिफारस).आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने लवकरात लवकर दाबून घ्यावी.या उपाययोजना शेतामध्ये झाडे सुकू लागलेली दिसताच लवकरात लवकर (म्हणजे २४ ते ४८ तासांच्या आत) कराव्यात. संभाव्य नुकसान टाळता येईल.वेळोवेळी कोळपण्या करून शेतात भेगा पडणार नाहीत, याची काळजी घ्यावी.डॉ. संजय काकडे, ९८२२२३८७८०कापूस कृषी विद्यावेत्ता, कापूस संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.