Crop Loss Issue: पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता.२) सायंकाळी सर्वदूर झालेल्या पूर्वमोसमी पावसाने पिकांसह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये कांदा, गहू, द्राक्ष, आंबा या पिकांचा प्रामुख्याने समावेश आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून, नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. .जिल्ह्यात जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, इंदापूर, दौंड, बारामती या तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात वादळी वारा आणि गारपिटीसह पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये काढणीस आलेला कांदा, गहू या पिकांसह भाजीपाला पिकांचा समावेश आहे. तसेच फळधारणेच्या अवस्थेतील आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे..Hailstorm Crop Damage: पाऊस, गारपिटीचा २२ हजार हेक्टरला फटका.जिल्ह्यात प्रामुख्याने पश्चिम घाट परिसरातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, खेड, आंबेगाव या तालुक्यांमध्ये आंब्याचे मोठे क्षेत्र आहे. सध्या फळधारणेच्या अवस्थेत आंबा असून अनेक ठिकाणी कैऱ्या लगडलेल्या आहेत. वादळ आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर कैऱ्यांची गळ झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे..शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील निर्वी, कोकडेवाडी, आंधळगाव व न्हावरे परिसरांत सायंकाळी झालेल्या गारपिटीने डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले. काढणीला आलेल्या फळांना तडाखा बसल्याने शेतकरी हतबल झाले असून प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी करण्यात आली आहे. गाराच्या पावसाने डाळिंबाची फळे काळी पडली असून त्यांची गुणवत्ता खराब झाली आहे. .कोकडेवाडी येथील अण्णा रभाजी मारणे यांची दीड एकर बाग १५ दिवसांत तोडणीला येणार होती, मात्र गारपिटीने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याशिवाय संदीप सात्रस, सागर सात्रस, प्रभाकर निंबाळकर, बजरंग मारणे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या डाळिंब, आंबा व सीताफळ बागांना फटका बसला आहे. निर्यातक्षम फळांचे बाजारमूल्य घटल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मंडळ कृषी अधिकारी अनिल पाटील, तलाठी संदीप ढमढेरे व अन्य कर्मचाऱ्यांनी बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली..Hailstorm Crop Damage: वादळ, गारपिटीने पीकहानी सुरूच.नारायणगाव आणि वारूळवाडी (ता. जुन्नर) परिसरात गुरुवारी (ता. २) दुपारी अडीचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान केले. अर्धा तास चाललेल्या पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू आणि फळभाज्यांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे..परिसरात गेल्या चार दिवसांतील हा दुसरा पाऊस आहे. सोमवारी झालेल्या पावसाच्या तुलनेत आजचा जोर अधिक होता. सध्या तालुक्यात गहू मळणी आणि कांदा काढणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. बाजारभाव कमी असल्याने शेतकऱ्यांनी कांदा शेतातच साठवून ठेवला आहे. मात्र, आजच्या पावसाने हा कांदा भिजला. पावसामुळे टोमॅटो, आंबा, द्राक्ष आणि वेलवर्गीय पिकांचेही नुकसान झाले..वीस मेंढरांचा मृत्यूपारगाव शिवारातील वाळूंजनगर (ता. आंबेगाव) येथे गारपिटीच्या फटक्यात मेंढपाळ कैलास शंकर वाळूंज आणि पंढरीनाथ दत्तू आदक यांच्या २० लहान-मोठ्या मेंढरांचा मृत्यू झाला..शिरूरच्या पूर्व भागातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील दोन दिवसांत हे काम पूर्ण होईल.सुवर्णा आदक, तालुका कृषी अधिकारी, शिरूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.