शिरगापुरे के. एच. Soybean Farming: राज्यातील एकूण सोयाबीन क्षेत्रापैकी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र एकट्या मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागांत येते. पूर्णपणे मॉन्सूनच्या पावसावर अवलंबून असलेल्या लातूर, नांदेड, जालना, अमरावती, अकोला आणि यवतमाळ यांसारख्या जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचे उत्पादन पावसाच्या प्रमाणावर ठरते. या वर्षी ‘एल निनो’ परिस्थितीमुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीमध्ये सोयाबीनचे नियोजन करण्यासंदर्भात माहिती घेऊ. .मराठवाडा विभागहा भाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येत असल्याने येथे वेगाने दुष्काळी परिस्थिती निर्माण होते.हलकी ते मध्यम काळी जमीन असल्यामुळे मातीतील ओलावा लवकर संपतो.कडक उन्हामुळे पिकाच्या फुलकळी अवस्थेत पाण्याचा मोठा ताण पडतो..Soybean Crop Management: अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिवळे पडण्यावरील उपाययोजना.विदर्भ विभागभारी आणि खोल चिकणमाती असल्याने पाऊस थांबताच जमिनीला मोठ्या भेगा पडतात.पावसातील प्रदीर्घ खंडामुळे सोयाबीनची मुळे तुटतात आणि अन्नद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता थांबते.वातावरणातील उच्च बाष्पीभवन चक्रामुळे पिके करपून जातात..‘एल निनो’च्या वर्षात या दोन्ही विभागांत मॉन्सूनचे आगमन साधारणपणे २ ते ३ आठवडे उशिराने होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, पिकाच्या वाढीच्या काळात पावसाचा प्रदीर्घ खंड (अनेकदा २१ दिवसांपेक्षा जास्त) पडतो आणि सोबतच उष्णतेची लाट येते. यामुळे जमिनीतील ओलावा वेगाने हवेत उडून जातो आणि सोयाबीनचे पीक प्रचंड ताणाखाली येते. अशा हवामान संकटातून सोयाबीनचे पीक वाचविण्यासाठी सुधारीत पद्धतीने पेरणी करताना शेतात ओलावा टिकवणे, दुष्काळ सहन करणाऱ्या वाणांची निवड करणे आणि ऐनवेळी योग्य उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे..पाणी कमतरतेचे पिकावरील परिणामसोयाबीनच्या पिकाला कोणत्या अवस्थेत पाण्याची सर्वात जास्त गरज असते, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.पेरणी आणि उगवण : जमीन कडक झाल्यास उगवण कमी होते.शाकीय वाढ : ही अवस्था अधिक सहनशील असते; मध्यम स्वरूपाचा पाण्याचा खंड सहन करू शकते. शाकीय वाढीच्या काळात सोयाबीनचे पीक बऱ्यापैकी प्रतिकारक्षम असते. या सुरुवातीच्या काळात जर पाऊस थोडा कमी असेल, तर झाडाची मुळे पाण्याचा शोध घेण्यासाठी जमिनीच्या खाली खोलवर जातात. ते पिकासाठी फायदेशीर ठरते. पण खऱ्या धोक्याची सुरुवात फूलकळी अवस्था, शेंगा धरणे आणि दाणे भरणे या काळात होते. या प्रजोत्पादक अवस्थांमध्ये सोयाबीनला पाण्याची खूप जास्त गरज असते..फूलकळी अवस्था : अत्यंत संवेदनशील काळ, पाण्याचा ताण पडल्यास फूलगळ होते. फूलकळीच्या काळात पाऊस गायब झाला, तर झाडातील संप्रेरकांचे संतुलन बिघडते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर फूलगळ होते आणि शेंगांची संख्या घटते.शेंगा धरणे : अत्यंत संवेदनशील काळ, पाण्याच्या कमतरतेमुळे शेंगांची लांबी कमी होते..दाणे भरणे : अत्यंत संवेदनशील काळ, दाणे बारीक राहिल्याने किंवा शेंगा पोचट राहिल्याने ५० क्क्यांपर्यंत नुकसान होते. जर पाण्याचा ताण दाणे भरण्याच्या अवस्थेपर्यंत कायम राहिला, तर पाने अन्न तयार करणे थांबवतात. यामुळे दाण्यांना पोषण मिळत नाही; परिणामी शेंगा सुकतात, दाणे बारीक आणि सुरकुतलेले राहतात. कृषी विद्यापीठांच्या संशोधनानुसार, या तिन्ही संवेदनशील काळात पडणाऱ्या पाण्याचा ताण एकूण उत्पादनात ३० ते ५० टक्क्यांपर्यंत घट आणू शकतोपीक पक्व होणे : या अवस्थेत पाण्याच्या कमतरतेचा उत्पादनावर फारसा परिणाम होत नाही..Soybean Crop Management : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण .पूर्वमशागत आणि पेरणीचे नियोजनहवामानाशी जुळवून घेणारी शेती ही मॉन्सून सुरू होण्यापूर्वीच सुरू होते. उन्हाळ्यातील योग्य मशागत पिकाला पुढील दुष्काळी संकटाशी लढण्यास सक्षम बनवते.माती परीक्षण आणि खोल नांगरणी ः शेतकऱ्यांनी दरवर्षी आपल्या शेतातील मातीचे परीक्षण करून सेंद्रिय कर्बाचे प्रमाण तपासून घ्यावे. मॉन्सूनपूर्वी, उन्हाळी खोल नांगरणी दर तीन वर्षांतून एकदा करणे आवश्यक आहे. यामुळे काळ्या कसदार जमिनीच्या खाली तयार झालेला कडक थर फुटतो. परिणामी, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि पहिल्या पावसाचे पाणी वाहून न जाता थेट जमिनीत मुरते..दुष्काळ सहन करणारे आणि लवकर येणारे वाण ः एल निनोच्या वर्षात जुन्या आणि जास्त कालावधी घेणाऱ्या वाणांची पेरणी करणे अत्यंत धोक्याचे ठरते. क्षेत्रातील शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठ यांनी विकसित केलेल्या कमी किंवा मध्यम कालावधीत येणाऱ्या वाणांची निवड करावी.फुले दूर्वा (केडीएस ९९२) : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी विकसित केलेला हा वाण मजबूत मूळ रचनेसाठी ओळखला जातो. हा वाण पाण्याचा ताण चांगल्या प्रकारे सहन करतो..एमएयूएस ७२५ आणि एमएयूएस ६१२ (महाबीज ७२५) : मराठवाडा विभागासाठी हे वाण अत्यंत उपयुक्त असून, ते दुष्काळातही स्थिर उत्पादन देतात.एएमएस १००-३९ (पीडीकेव्ही आंबा) : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी विकसित केलेला हा वाण विदर्भासाठी उत्तम आहे. हा वाण ९५ ते १०० दिवसांत काढणीस तयार होतो, त्यामुळे शेवटच्या टप्प्यात पाऊस कमी पडला तरी नुकसान होत नाही.जेएस २०-३४ आणि जेएस ३३५ : कमी कालावधीत येणारे हे वाण मॉन्सून खूप उशिरा सुरू झाल्यास आपत्कालीन परिस्थितीत पेरणीसाठी उत्तम पर्याय आहेत..केवळ कॅलेंडरमधील तारीख पाहून किंवा जुन्या सवयीनुसार पेरणी करणे ही मोठी चूक ठरू शकते. एल निनोच्या वर्षात पहिल्याच किरकोळ पावसावर किंवा कोरडी पेरणी (धूळपेरणी) करणे पूर्णपणे टाळावे. जोपर्यंत शेतात किमान ६० ते ७५ मिमी चांगला पाऊस होत नाही आणि जमीन १५-२० सेंमी खोलपर्यंत ओल होत नाही, तोपर्यंत पेरणी करू नये. पुरेशा ओलाव्याशिवाय केलेली पेरणी बियाणे कुजण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे दुबार पेरणीचा खर्च वाढतो..बियाण्याला जैविक बीजप्रक्रियापेरणीपूर्वी बियाण्याला बुरशीनाशक आणि जैविक खतांची प्रक्रिया करणे अनिवार्य आहे. सुरुवातीच्या काळातील सड आणि मूळकुजव्या रोगापासून बचावासाठी कार्बोक्सिन + थायरम २.५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे प्रक्रिया करावी. यानंतर, रायझोबिअम जॅपोनिकम आणि फॉस्फेट सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया ही जैविक खते प्रत्येकी १० ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावीत. या प्रक्रियेमुळे मुळांवर गाठी लवकर येतात. त्यामुळे जमिनीत कमी ओलावा असतानाही झाड पोषक घटक सहज शोषून घेऊ शकते..ओलावा टिकविण्याचे तांत्रिक उपायपाऊस कमी असतो, तेव्हा शेतात पडणाऱ्या पावसाचा थेंब अन् थेंब जमिनीत जिरवणे गरजेचे असते.रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धत ः मराठवाडा आणि विदर्भातील कोरडवाहू सोयाबीनसाठी बीबीएफ पद्धत हे सर्वांत प्रभावी वरदान ठरले आहे. या पद्धतीमध्ये विशेष बीबीएफ पेरणीयंत्राच्या साह्याने शेतात गादीवाफे आणि दोन्ही बाजूंना खोल सऱ्या तयार केल्या जातात..मापदंड..................प्रमाणित मोजमापगादीवाफ्याची रुंदी...... १२० सेंमी ते १५० सेंमीसरीची रुंदी...............३० सेंमीसरीची खोली.............१५ सेंमी ते २० सेंमीएका वाफ्यावरील ओळी .. ३ ते ४ ओळी (४५ सेंमी अंतरावर).अचानक आलेल्या मुसळधार पावसाचे अतिरिक्त पाणी सऱ्यांमधून सुरक्षितपणे वाहून जाते. पिकात पाणी साचून मूळ कुजण्याचा धोका टळतो. पावसाचा खंड काळातही याच सऱ्यामध्ये पावसाचे पाणी अडवले जाते. कोणत्याही सपाट शेताच्या तुलनेत बीबीएफ शेतातील ओलावा आणखी ७ ते १० दिवस जास्त काळ टिकून राहतो. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रयोगामध्ये कमी पावसाच्या वर्षात बीबीएफ पद्धतीमुळे सोयाबीनच्या उत्पादनात २० टक्के ते २५ टक्के वाढ मिळून आली आहे..संरक्षित मशागत, सेंद्रिय आच्छादनजमिनीची कमीत कमी मशागत केल्यास मातीतील नैसर्गिक ओलावा हवेत उडून जात नाही. यासोबतच, सोयाबीनच्या दोन ओळींमध्ये गव्हाचा पेंढा, कपाशीची धसकटे किंवा पिकांचे अवशेष ५ टन प्रति हेक्टर या प्रमाणात पसरवून आच्छादन करावे. या आच्छादनामुळे जमिनीवर थेट कडक ऊन पडत नाही. बाष्पीभवन ३० टक्क्यांनी कमी होते, तणांचे प्रमाण कमी राहते..आपत्कालीन व्यवस्थापनजेव्हा फूलकळी किंवा शेंगा भरण्याच्या संवेदनशील काळात पावसामध्ये १५ दिवसांपेक्षा जास्त खंड पडल्यास पीक वाचविण्यासाठी पुढील तातडीने उपाय गरजेचे ठरतात.पानांवर अन्नद्रव्यांची फवारणी ः जमितीत ओलाव्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे सोयाबीनची मुळांना खते उचलता येत नाही. परिणामी पिकाची वाढ खुंटते. अशा वेळी तत्काळ ऊर्जा पुरविण्यासाठी पानांवर थेट फवारणी फायद्याची ठरते..१३:००:४५ (पोटॅशिअम नायट्रेट) फवारणी : फूलकळी, शेंगा भरण्याच्या अवस्थेत १३:००:४५ एक ते दोन टक्के म्हणजेच १० ते २० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. पोटॅशिअम पानांमधील रंध्रे नियंत्रित करते, त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. पिकाची कोरडे हवामान सहन करण्याची ताकद वाढते.विद्राव्य खत (१९:१९:१९) : पाण्याचा ताण असताना विद्राव्य १९:१९:१९ दहा ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी केल्यास पानांचा हिरवेपणा टिकून राहतो आणि अकाली पाने गळत नाहीत..बाष्पीभवन रोखणारी रसायने ः तीव्र उन्हापासून पिकाचा बचाव करण्यासाठी केओलीनची ५ टक्के प्रमाणात फवारणी करावी. याचा पानांवर एक बारीक पांढरा थर तयार होतो. त्यामुळे सूर्याची प्रखर किरणे परावर्तित होऊन पिकाचे तापमान कमी होते. पाण्याचा अपव्यय टळतो.संरक्षित सिंचन ः उपलब्ध पाणी सुरुवातीलाच न वापरता राखून ठेवावे. पावसाचा मोठा खंड पडल्यास, सोयाबीनच्या शेंगा धरण्याच्या किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत तुषार सिंचनाचा वापर करून ३० ते ५० मिमी पाणी द्यावे. हे एक पाणी पिकाचे संपूर्ण नुकसान होण्यापासून वाचवू शकते.- शिरगापुरे के. एच. ९५४५६९५१४१सहायक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग, दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.