Organic Farming: केवळ रासायनिक खतांवर भर देत सेंद्रिय खतांकडे दुर्लक्ष करण्याचे परिणाम सर्वच शेतकरी भोगत आहेत. त्यामुळे कमीत कमी मशागतीसह सेंद्रिय पदार्थांची, त्यातही जमिनीखालील पीक अवशेषांच्या कुजविण्याची पद्धत माझ्या सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासातून तयार केली आहे. पिकांचे अन्नद्रव्य व्यवस्थापनच नव्हे, तर जमिनीच्या सुपीकतेचे व्यवस्थापनही सूक्ष्मजीवांच्या माध्यमातून साधता येते..कृषी पदवीधर झाल्यानंतर १९७० मध्ये शेतीला सुरुवात केली. पहिल्या १५-२० वर्षात उत्पादन चांगले मिळाले, तरी पुढे मात्र उत्पादन पातळी घसरत गेले. जमीन तीच, पिके तीच, शेती करण्याची पद्धती आणि संसाधनाचा वापरही तोच असताना हे का घडतेय कळत नव्हते. दरम्यान एका ग्रंथामध्ये आकृती काढलेली दिसली. त्यात झाडाचे जमिनीवरील खोड, पाने यासोबतच जमिनीखाली मुळे, केशमुळे आणि त्याच्याभोवती ठिपक्याच्या स्वरूपात सूक्ष्मजीव दाखवले होते. केशमुळाभोवती त्यांचे प्रमाण अधिक, पुढे ते विरळ होत गेलेले दाखवले होते. .Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?.याचाच अर्थ वनस्पतीच्या अन्न पोषणाचा व सूक्ष्मजीवांचा (रायझोस्फिअर) काहीतरी संबंध असला पाहिजे. आपल्या शेतीतही त्यांचेच प्रमाण कमी झाल्याने पिकांचे पोषण होत नसल्याचा निष्कर्ष मी काढला. ‘इंट्रोडक्शन टू सॉइल मायक्रोबायोलॉजी’ हे पुस्तक मिळवून भू- सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासाला प्रारंभ केला. सूक्ष्मजीव डोळ्यांनी दिसत नसल्याने त्यांचे कार्यही पाहता येत नाही. पण त्यांचे मोल लक्षात आल्याने सूक्ष्मजीवशास्त्राची गोडीच लागली. कोल्हापुरातील ४-५ मोठ्या शैक्षणिक व संशोधन विषयक संस्थांच्या ग्रंथालयातून पुस्तके मिळवून अधिक अभ्यास केला. त्यामुळे माझी समस्या तर सुटलीच, पण अन्य शेतकऱ्यांनाही मदत करता आली..कृषी शास्त्रामध्ये पिकासाठी आवश्यक विविध अन्नद्रव्यांचे माहिती व त्यांच्या शिफारशी देण्यात आलेल्या असतात. पण केवळ रासायनिक खतातून पिकाचे पोषण शक्य होत नाही. या घटकांचे पिकाला शोषणयोग्य घटकांमध्ये रूपांतर करण्याचे काम सूक्ष्मजीव करत असतात. केशमुळाभोवती विविध संप्रेरकाच्या स्रवण्यामुळे सूक्ष्मजीवांकडे अन्नद्रव्यांची मागणी नोंदवली जाते. ती रासायनिक संकेताद्वारे समजताच सूक्ष्मजीव तेवढ्याच प्रमाणात प्रक्रिया करून अन्नद्रव्यांची उपलब्धता करतात. त्यामुळे पिकाचे पोषण होते. पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार (उदा. बाल्यावस्था, वाढीची, फुलोरा व पक्वता) पिकाची गरज बदलत असते. त्यानुसार पोषण उपलब्ध करण्याची चोख व्यवस्था निसर्गाने सूक्ष्मजीवांमार्फत केलेली असते..आपल्या डोळ्यांना दिसत नसले तरी सूक्ष्मजीव हे सजीव आहे. त्यांच्याही जन्म, पोषण, प्रजोत्पादन इ. अवस्था असतात. स्वतःच्या पोषणासाठी ते जमिनीतील सेंद्रिय कर्बाचा वापर करतात. जोपर्यंत जमिनीत सेंद्रिय कर्बाची पातळी योग्य होती,.तोपर्यंत सूक्ष्मजीवांचे कार्य व्यवस्थित होत होते. पिकाचे गरजेप्रमाणे पोषण होत असल्याने उत्पादनही चांगले मिळत होते. पण केवळ रासायनिक खतांचा वापर करत सेंद्रिय खतांकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केल्यानंतर कर्बाचा साठा गरजेपेक्षा अपुरा पडत गेला. त्यातून सूक्ष्मजीवांची आणि पिकांचा उपासमार होऊ लागली. ही बाब लक्षात येताच मी स्वतःच्या शेतामध्ये लक्षणीय बदल केले..माझ्याकडे उसाची लागवड, खोडवे व तिसऱ्या वर्षी भात असा पीक फेरपालट होता. पूर्वी कितीही सेंद्रिय खत गोळा केले तरीही भात पिकाला देण्याइतके ते उपलब्ध होत नसे. मग भात पिकाच्या पूर्व मशागतीदरम्यान म्हणजे तीन वर्षांतून एकदा भरपूर शेणखत कंपोस्ट भातासाठी वापरत असे. ते पुढील दोन, तीन वर्षांसाठी पुरेसे होईल, अशी अन्य शेतकऱ्यांप्रमाणे माझीही समजूत होती. पण सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासातून नवीन धडा शिकलो. ते म्हणजे आपण कितीही शेणखत कंपोस्ट वापरले तरी ते एका हंगामात (३ ते ४ महिन्यांत) संपून जाते. पुढील ऊस पीक कोणत्याही सेंद्रिय खताअभावीच निघत होते..मग सुरुवातीला उत्पादन कसे चांगले येत होते? तर माझे वडील ५० टक्के रासायनिक व ५० टक्के सेंद्रिय पेंडी खते हप्त्याने देत असत. केवळ रासायनिक खते देणे हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे असल्याने सेंद्रिय खतांचा वापरच कमी होत गेला. संशोधन केंद्रामध्ये सलग तीन वर्षाच्या प्रयोगातून सेंद्रिय आणि रासायनिक खतांच्या एकत्रित वापरातून खर्चात वाढ होत असली तरी तितक्या प्रमाणात उत्पादन वाढत नसल्याचे पुढे आले होते. या निष्कर्षाप्रमाणे चक्क वडिलांशी वाद करून मी शेतीमध्ये सेंद्रिय पेंडीचा वापर बंद केला होता. अभ्यासादरम्यान एक संदर्भ मिळाला, की सेंद्रिय खतांचा वापर कमी किंवा बंद केला तरी पूर्वीचे सेंद्रिय पदार्थ आणि निसर्गाकडून उपलब्ध होत असलेल्या सेंद्रिय पदार्थाच्या जोरावर पहिली १५ ते २० वर्षे चांगले उत्पादन मिळते. .Sustainable Sugarcane Farming: शाश्वत ऊस शेतीसाठी प्रभावी व्यवस्थापन.त्यानंतर मात्र उत्पादन पातळी घटू लागते. जगभरातील शेतीत याच प्रकारे उत्पादन पातळी घटत असल्याचेही पुढे आले होते. आपल्या भारतातही १९६५-७० च्या काळात सुरू झालेल्या हरितक्रांतीमध्ये रासायनिक खतांचा पुरस्कार केला गेला, पण सेंद्रिय खतांच्या वापराकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे हरितक्रांतीनंतर पुढील १५ ते २० वर्षे भरभरून उत्पादन मिळाले, तरी त्यानंतर उत्पादन घसरत गेले. पण सिंचनाच्या सोई उपलब्ध होत गेल्याने लागवडीखालील क्षेत्र व हेक्टरी उत्पादनामध्ये वाढ झाल्याने आज आपण अन्नधान्यांमध्ये स्वयंपूर्ण आहोत. पण सेंद्रिय कर्ब आणि सूक्ष्मजीवांकडे दुर्लक्ष करत असल्याने आपल्या जमिनीची सुपीकता घसरतच चालली आहे. रासायनिक खतांवरील खर्चात वाढ होत निव्वळ नफा कमी झाला आहे..सेंद्रिय खत व्यवस्थापनआता दरवर्षी दर पिकाला सेंद्रिय खत गरजेइतके टाकले तरच उत्पादन मिळेल हे लक्षात आले. तीन वर्षांतून एकदा सेंद्रिय खते वापरत असतानाच ओढाताण होत होती. प्रत्येक वर्षी सेंद्रिय खते कशी वापरणार? मग पर्यायी मार्गाचा शोध घेण्यास सुरुवात केली. विविध पेंडी खते, लेंडी खते, कोंबडी खत, माशाचे खत हे सारे मार्ग किंमत, वाहतूक व व्यवस्थापन या तत्त्वावर उपयुक्ततेचे नसल्याचे स्पष्ट झाले. मग सेंद्रिय खतासाठी कोणत्याही परिस्थितीत बाजारात न जाता शक्यतो फुकटामध्ये कसे मिळवता येईल, या दिशेने विचार सुरू झाला..माझ्या लक्षात आले, की शेणखताचे मूळ हे कोणत्या तरी वनस्पती किंवा वैरणीमध्येच आहे. चार पायांच्या जनावरांच्या खाण्यानंतर त्यांचे शेणखतात रूपांतर होते. त्यापेक्षा वनस्पतींचेच भाग जमिनीत कुजवले तर? मग सेंद्रिय खत निर्मितीसाठी शेतामध्येच उपलब्ध पीक अवशेषांकडे, तणांकडे कच्चा माल म्हणून पाहू लागलो. इथे सूक्ष्मजीवशास्त्राच्या दोन गोष्टी उपयोगात आल्या. १) सेंद्रिय पदार्थ जमिनीच्या बाहेर कुजविणे चूक आहे. तो थेट जमिनीतच कुजवला पाहिजे. २) तो जितका जास्त काळ कुजत राहील तितकी जमीन व पिकाच्या दृष्टीने चांगले..आमच्या भागात ऊसशेती मोठ्या प्रमाणात असल्याने पहिल्यांदा उसाचे पाचट डोळ्यासमोर आले. ते कुजविण्याच्या पद्धतीच्या शोधात १५ वर्षे गेली. पाचट कुजविण्याची चांगली पद्धत बसविण्यात यश आले तरी आढावा घेताना एक बाब लक्षात आली, ती म्हणजे सर्व १०० टक्के पाचट कुजवूनही उसाच्या उत्पादनात अपेक्षित वाढच मिळाली नाही. मग त्याच्या जोडीला भात फेरपालटाच्या वर्षी उसाचे क्षेत्र नांगरून मशागत करताना निघणारी खोडकी, धसकटे कुजविण्याचा विचार सुरू झाला. रान नांगरले तर अवशेषात भात घेता येणार नव्हता. मग न नांगरता भात पीक घेण्याचे ठरविले. यासाठी सतत उगविणारी खोडवी मारून टाकणे गरजेचे होते. .तणनाशकाद्वारे खोडवे मारून शून्य मशागतीवर जुन्या ऊस सरी वरंब्यातच टोकण पद्धतीने भात शेती केली. उत्तम पीक आले. त्यामुळे पुढील ऊस पिकाची लागवड जुन्या सरी वरंब्यातच सरीच्या तळात एक नांगराचा हलके तास मारून केली. अनेक अडचणी येऊनही पहिल्यापेक्षा ५० टक्के जास्त उत्पादन हाती आले. याला कारण म्हणजे मागील पिकाचे अवशेष जमिनीखाली कुजत राहिल्याने पिकांच्या गरजेइतका सेंद्रिय कर्बाचा पुरवठा सुरू झाला होता. यातून मी माझ्यापुरता नवीन नियम तयार केला. मागील पिकांचे जमिनीखालील अवशेष हेच पुढील पिकांसाठी सेंद्रिय खत. सेंद्रिय खताचा पुरवठा हा शेतीतील एक मोठा ज्वलंत प्रश्न मुळातून संपून गेला. .उसाचे १०० टक्के पाचट कुजवूनही उत्पादन वाढले नव्हते, पण जमिनीखालील अवशेष कुजवल्याने ५० टक्के उत्पादन वाढ मिळाली, हे यशच होते. त्यावरून एक बाब लक्षात आली, ती म्हणजे जमिनीखालील अवशेषाच्या सेंद्रिय खताचा दर्जा व जमिनीवरील अवयवांच्या सेंद्रिय खतापेक्षा अधिक चांगला असला पाहिजे. सेंद्रिय खतातही उच्चनीचता असते. जमिनीखालील अवशेषांचे खत सर्वात चांगले, जमिनीपासून जो जो वरवर जावे, तो तो हलक्या दर्जाचे खत होत जाते. सर्वात हलके खत पानांचे असल्याचे असा निष्कर्ष पुढे आला. त्याही पुढे जात जनावरे वैरण म्हणून पिकाचा शेंडाच प्रामुख्याने खात असल्याने शेणखतही हलक्या दर्जाचे खत असले पाहिजे, या निष्कर्षापर्यंत मी आलो. मग शेणखतासाठीची धावपळ कमी केली. त्याऐवजी जमिनीतील सूक्ष्मजिवांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यावर भर दिला. तो प्रश्न सुटला कि पुढील पीक पोषणाचे अनेक प्रश्न आपोआप सुटत जातात. इतकेच नाही तर आजकाल सर्वत्र वाढलेले जमिनीचा सामू, क्षारतेचे प्रश्नही जागेवरच सेंद्रिय पदार्थ कुजविण्याच्या प्रक्रियेतून सुटू शकत असल्याचे पुढे आले.प्रताप चिपळूणकर ८२७५४५००८८(लेखक कोल्हापूर येथील प्रगतिशील शेतकरी असून, विनामशागत शेती व भूसूक्ष्मजीवशास्त्राचे अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.