Nature Therapy: डोळे भरून पाहणे किंवा निसर्गाचा मनसोक्त आवाज ऐकणे या गोष्टी आपल्याला रिचार्ज करतातच, त्यामुळे आपली पंचेंद्रियेसुद्धा जागी राहतात. त्यातून आवश्यक असणारी मनाची शांतता आणि निखळ आनंद मिळतो. इतकेच नव्हे तर आपली संवेदनशीलता टिकवून ठेवण्यासही ही बाब उपयुक्त ठरते. आताच्या धकाधकीच्या जगण्यात आणि तणावयुक्त वातावरणात तर या गोष्टींचे मोल कितीतरी अधिक आहे. म्हणून या गोष्टींची नव्याने ओळख करून घेणे, त्या अंगीकारणे गरजेचे ठरते..डोळे भरून पाहणे ही गोष्ट इतिहासजमा होईल की काय, असेच सध्याचे वातावरण आहे. कारण आता लोक डोळ्यांनी पाहतच नाहीत, ते ‘लेन्स’मधून पाहतात. म्हणूनच निसर्गरम्य ठिकाण असो, अपवादाने अनुभवायला मिळणारा एखादा क्षण असो, कोणतीही दुर्मीळ गोष्ट असो... बहुतांश मंडळी अशा गोष्टी डोळे भरून पाहण्याऐवजी पहिले मोबाइल पुढं करतात- फोटो काढण्यासाठी किंवा व्हिडिओ घेण्यासाठी. या गोष्टी मोबाइलमध्ये टिपल्या जातात खऱ्या, पण त्या ठिकाणी अनुभवण्याचा तो क्षण हरवून जातो तो कायमचाच! गंमत म्हणजे जे टिपलं आहे ते पुन्हा पाहिलं जातं का? तर त्याचे उत्तरही नकारार्थी आहे. टिपलेले सोशल मीडियावर शेअर केले की त्याचे काम संपते. मग ते टिपलेले फोटो, व्हिडिओ मोबाइलमध्ये जंक किंवा कचरा बनून राहतात..पर्यटन स्थळ, गाण्याची मैफील, जाहीर कार्यक्रम, सभा-भाषणे, खेळाचे सामने... काहीही असो, सगळीकडेच मोबाइल उंचावलेले हात पाहायला मिळतात. अगदी जंगल सफारीतही एखादा वन्यप्राणी, विशेषत: वाघ वाटेने चाललेला असतो आणि त्याच्यावर रोखलेले पर्यटकांचे असंख्य कॅमेरे-मोबाइल असे दृश्य तर अगदीच सामान्य झाले आहे. त्याच्या कितीतरी तऱ्हा पाहायला मिळतात. आता तर दिवसेंदिवस हे प्रमाण वाढू लागले आहे. लोक अशा ठिकाणांना भेट देतात किंवा कार्यक्रमांना जातात ते जणू काही फोटो काढण्यासाठी आणि व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठीच!.Natural Farming: जमीन सुपीकतेसाठी नैसर्गिक शेती महत्त्वाची.विज्ञानापाठोपाठ तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीने संपूर्ण जग बदलून टाकले. त्यासोबत माणसाचे रोजचे जगणेसुद्धा प्रभावित केले आहे, इतके की आता हातातील मोबाइल आणि त्यातला डेटा ही जणू अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे जगण्याची गरज बनली आहे. त्या ओघाने सर्वच गोष्टी बदलल्या आहेत. त्याचाच एक परिणाम म्हणजे कोणताही अनुभव घेण्याऐवजी फोटो काढून तो मोबाइलमध्ये साठविण्यासाठी घाई केली जाते. हे आता इतके नकळत होते की वेगळे, अनोखे, चांगले काही डोळ्यांनी पाहायचे असते, अनुभवायचे असते याचे भानही राहत नाही. पण हे करण्यामुळे आपण नेमके काय गमावून बसतो याची कल्पना फारच थोड्या जणांना येते. ‘भवताल इकोटूर्स’च्या सफरींच्या निमित्ताने अनेकदा असे प्रसंग येतात. निसर्गाचे विविध आविष्कार किंवा काही अद्भुत गोष्टी पाहताना त्यातले वेगळेपण समजून घेण्याआधीच हे सर्व मोबाइलच्या कॅमेऱ्यात टिपायचे असते. काही जण तर मोबाइलद्वारे करावयाच्या चित्रीकरणात इतके हरवून जातात की कधी एखाद्या अपघाताला आमंत्रण देतात.शब्दांच्या पलीकडचा अनुभवखरे तर अनेक ठिकाणे फोटो, व्हिडिओ काढावेत अशीच असतात. कळसूबाई शिखरावर जाणे असेल, भूवैज्ञानिक आश्चर्य असणारी सांधन दरी, केरळच्या समुद्र किनाऱ्यावर पोहोचणारे मॉन्सूनचे वारे, मेघालयातील घनदाट जंगले-तिथला पाऊस, पावसाळ्यापाठोपाठ फुलणारी पुष्पपठारे, कोणत्याही कोकण कड्यावरून सूर्यास्ताचे दर्शन... फोटो घेण्यासाठी योग्य असलेल्या ठिकाणांची ही यादी कितीही लांबवता येईल. तिथे फोटो जरूर घ्यावेत, पण त्या वातावरणाचा अनुभव घेणे ही बाब खरंच उच्च कोटीची असते. त्यामुळे ‘भवताल’ अंतर्गत अशा ठिकाणांना भेटी दिल्यावर त्यांचा घेतलेला खराखुरा अनुभव शब्दांत मांडण्याच्या पलीकडचा असतो. याची दोन-तीन उदाहरणे आवर्जून सांगण्याजोगी आहेत..भंडारदरा नेचर कॅम्पमध्ये सूर्यास्ताच्या वेळी कोकण कड्यावर जाणे होते. ते वातावरण आणि दृश्य इतके विलोभनीय असते की कोणालाही मोबाइल हातात घेण्याचा मोह होईल. फोटो काढल्यानंतर सर्वांना तिथे काही मिनिटांसाठी शांत बसून तिथल्या वातावरणाचा अनुभव घ्यायला सांगितले जाते. शांत बसल्यावर अंगाला स्पर्शून जाणारा वारा, हळूहळू खाली सरकणारा सूर्याचा लाल गोळा, समोर लांबवर पसरलेल्या डोंगररांगा, अवतीभवतीचे पक्षी-वारा-पाने यांचा आवाज या सर्वांची जाणीव होते. हे जाणवणे कमालीचे सुखावणारे असते आणि वेगळ्या विश्वात नेणारे असते. .Natural Farming: नैसर्गिक शेतीने बळीराजा समृद्ध होणार.मेघालयाच्या अशाच एका सफरीमध्ये अंधारात शांत बसून अवती-भवती लुकलुकणारे काजवे न्याहाळणे हा आयुष्यभर साथ करेल असा अनुभव होता. हीच बाब शांततेचा आवाज ऐकण्याची अर्थात शांतता अनुभवण्याची! रात्रीच्या वेळच्या काळ्याकुट्ट अंधारात नीरव शांतता असते. कोणतीही हालचाल, आवाज न करता ती अनुभवणे हे केवळ सुख असते... असे अनुभव घेतल्यावर शरीर आणि मन असे काही प्रफुल्लित होते, की हा अनुभव पुढील काही काळासाठी निश्चितच ऊर्जा देत राहतो..सर्वसाधारणपणे २००० सालापर्यंत सज्ञान किंवा कळत्या वयाच्या असलेल्या लोकांनी हे अनुभव घेतले आहेत. कारण त्या काळात तंत्रज्ञानात इतकी प्रगती झालेली नव्हती. महत्त्वाचे म्हणजे हातात मोबाइल नव्हते आणि असले तरी ते आतासारखे स्मार्ट बनले नव्हते, त्यांचा उपयोग केवळ बोलण्यासाठी आणि फार तर आता कालबाह्य होत असलेले मेसेजेस (एस.एम.एस.) पाठविण्यापुरता होता. त्यामुळे कोणतीही गोष्ट पाहणे, ऐकणे, अनुभवणे आपोआपच होण्याची शक्यता अधिक असे. पण हातात स्मार्ट फोन आल्यावर हे अनुभवणे मागे पडले आहे. त्या पिढीतील लोकांना त्यांनी घेतलेले अनुभव आणि आताचे वर्तन यातील फरक तरी निदान समजू शकतो. पण स्मार्ट फोनच्या काळातच जन्माला आलेल्या पिढीचे काय? त्यांना मुद्दाम लक्षात आणून दिल्याशिवाय त्यातील फरकच समजणार नाही..म्हणजे नकळतपणे ते कोणत्या गोष्टीला मुकले आहेत हे त्यांना समजणारही नाही. त्यात त्यांचा दोष आहे असे म्हणता येणार नाही. पण हे ज्यांनी हे अनुभवले आहे, ज्यांना याचे महत्त्व माहीत आहे त्यांनी ही बाब लक्षात आणून द्यायला हवी. कारण असे अनुभव घेण्याचे नितांत फायदे आहेत. डोळे भरून पाहणे किंवा निसर्गाचा मनसोक्त आवाज ऐकणे या गोष्टी आपल्याला रिचार्ज करतातच, त्यामुळे आपली पंचेंद्रियेसुद्धा जागी राहतात. त्यातून आवश्यक असणारी मनाची शांतता आणि निखळ आनंद मिळतो. इतकेच नव्हे तर आपली संवेदनशीलता टिकवून ठेवण्यासही ही बाब उपयुक्त ठरते. आताच्या धकाधकीच्या जगण्यात आणि तणावयुक्त वातावरणात तर या गोष्टींचे मोल कितीतरी अधिक आहे. म्हणून या गोष्टींची नव्याने ओळख करून घेणे, त्या अंगीकारणे गरजेचे ठरते..आंतरिक अनुभूतीआताच्या ए.आय. किंवा तंत्रज्ञानाच्या अतिवापराच्या युगातही आपली मूलभूत कौशल्ये महत्त्वाची ठरतात. किंबहुना, तीच तुम्हाला तारणारी ठरतात. डोळे भरून पाहणे, अर्थात कोणत्याही गोष्टीचे निरीक्षण करणे किंवा मन भरून ऐकणे, अर्थात एखादी गोष्ट शांतपणे आत्मसात करणे हे सारे वैयक्तिक विकास आणि प्रगतीच्या दृष्टीनेही तुम्हाला सक्षम बनवतात. मन शांत असल्यावर कोणतीही गोष्ट चांगल्या प्रकारे आत्मसात करणे सोपे बनते. हाही याचा व्यावहारिक फायदा!.या सर्व फायद्यांच्या पलीकडे समाधानाच्या आणि काही अनुभूती घेण्याच्या काही गोष्टी असतात. त्या अतिशय वैयक्तिक असतात. स्वत:पुरत्या आणि मर्यादित स्वरूपाच्या असतात. त्या ना कोणाला सांगण्यासाठी असतात, ना कोणाला शेअर करण्यासाठी असतात, ना आपल्या माध्यमातून त्या इतरांना अनुभवता येतात. अशा गोष्टी आपल्याला आयुष्यभर पुरतात, त्याच आपली साथ करतात. ते मिळविण्यासाठी हे अनुभव महत्त्वाचे ठरतात... काळानुरूप तंत्र, संसाधने, विचारसरणी अशा प्रकारे आपली एकूणच जीवनशैली बदलत असते. तसे माणसाने बदलायलाही हवी. पण कितीही बदलले तरी काही अंगभूत, मूलभूत गोष्टी बदलायच्या नसतात. या गोष्टीही तशाच आहेत. म्हणून मधल्या काळात जे सुटून गेले ते गेले. आता पुन्हा डोळे भरून पाहायला शिकू आणि ते अंमलातही आणू!abhighorpade@gmail.com(लेखक वरिष्ठ पत्रकार असून ‘भवताल’ या पर्यावरण विषयक मंचाचे संस्थापक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.