सारंग खानापूरकरIndependent India Book Review: पुस्तकाचे नाव : स्वतंत्र भारताची सहा युद्धेलेखक : किरण गोखलेप्रकाशक : मॅजेस्टिक प्रकाशनपृष्ठे : ५५९ मूल्य : ७०० रु..आपल्या भूमीचे प्राणपणाने संरक्षण करणे, ही भारतीयांची मनोवृत्ती आहे. दुसऱ्यांवर आक्रमण करून भूमिविस्तार करणे, हे आपले धोरण नाही. हे एका चांगल्या स्वभावाचे लक्षण असले, तरी त्याचा प्रचंड प्रभाव आपल्या लष्करी आणि राजकीय धोरणांवर पडला असल्याने स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान आणि चीनबरोबर झालेल्या युद्धांमध्ये भारताने वर्चस्वाच्या अनेक संधी गमावल्या असल्याचे किरण गोखले यांनी ‘स्वतंत्र भारताची सहा युद्धे’ या पुस्तकात म्हटले आहे. भारताने कायम शूरवीरांचा गौरव केला आहे. मात्र, केवळ याच भावनेच्या चौकटीत अडकत भारतीयांनी सांघिक शौर्याकडे दुर्लक्ष करत केवळ वैयक्तिक धाडसाला महत्त्व दिल्याने देशाचे मोठे नुकसान झाल्याचा निष्कर्ष गोखले यांनी काढला आहे..Book Review: गावाच्या विकासाचा मूलमंत्र देणारे ‘ग्राम मंत्रालय’.गोखले यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेचच पाकिस्तानबरोबर १९४७ मध्ये झालेला संघर्ष व त्यानंतरचे १९६५, १९७१ आणि १९९९ मधील युद्धांचा आणि चीनबरोबरील १९६२ च्या युद्धाचा अत्यंत सविस्तर आढावा घेत विश्र्लेषण केले आहे. या पाच युद्धांव्यतिरिक्त दहशतवाद आणि नक्षलवादाबरोबर सुरू असलेल्या युद्धाचाही त्यांनी भारतीय युद्धांत समावेश केला आहे. १९४७ चे युद्ध हा भारतासाठी महागडा संघर्ष ठरला..काश्मीरबाबत निर्णय घेण्यास भारतीय नेतृत्वाने केलेल्या अक्षम्य विलंबामुळेच मोठा भूभाग पाकिस्तान आणि चीनच्या घशात गेला आणि हाच भूभाग नंतरच्या सर्व युद्धांचे आणि तणावाचे कारण बनला आहे, असे लेखकाचे निरीक्षण आहे. चीनबाबत गाफील राहिल्याने १९६२ मध्ये ओढवलेला पराभव, १९६५ आणि १९७१ मध्ये निर्णायक विजय मिळूनही वर्चस्वाची आणि गमावलेला भूभाग परत मिळवण्याची संधी गमावणे आणि कारगिल युद्धात जिंकूनही आंतरराष्ट्रीय दबावापुढे व पाकिस्तानच्या अण्वस्त्रेवापराच्या धमकीपुढे झुकणे हा भारतीय नेतृत्वामधील आत्मविश्वासाच्या अभावाचा परिणाम असल्याचे मत लेखकाने मांडले आहे..आपल्या सैन्यदलांच्या क्षमतेवर विश्वास नसल्यानेच दहशतवादाविरोधातील लढाई लांबली आहे. या प्रत्येक युद्धाचे, त्यातील घडामोडींचे सविस्तर वर्णन आणि विश्लेषण करताना गोखले यांनी वापरलेली भाषा काही वेळा एकांगी व टोकाची वाटत असली, तरी दिलेले संदर्भ पाहता त्यावर विचार नक्कीच केला जाऊ शकतो..Book Review: कृषी अर्थव्यवस्थेच्या तळापर्यंत जाताना....कोणत्याही देशासाठी संघर्षाच्या इतिहासाचा अभ्यास हा वर्तमान आणि भविष्यासाठी मोलाचा असतो. युद्धासारख्या महत्त्वाच्या प्रसंगी जे निर्णय घेतले जातात त्यांचा देशावर दीर्घकालीन परिणाम होत असतो. नेमक्या अशा प्रसंगांच्या वेळीच भारतीय नेतृत्वाने कचखाऊ भूमिका स्वीकारल्याने शत्रूचे फावले. आक्रमकांच्या अनेक शतकांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झालेला भारत बलशाली होण्याच्या दिशेने पावले टाकेल, अशी सामान्य भारतीयांची अपेक्षा असताना प्रत्यक्षात बोटचेपे धोरण स्वीकारल्यामुळे पाकिस्तानने अगणित कुरापती काढत भारताचे लचके तोडले..फाळणीसुद्धा अत्यंत नियोजनशून्यतेने राबवत भारताने जखम दीर्घ काळ भळभळती ठेवली असल्याचे लेखकाने म्हटले आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतरही गोवा, दीव-दमणसारखे छोटे प्रदेश लष्करी बळावर सहज ताब्यात घेणे शक्य असताना तेथे डरपोकपणा दाखवल्याचा संताप लेखक व्यक्त करतात. भारताने पाकिस्तानचा कायमच दुर्बळ प्रतिकार केला, धर्माच्या आधारावर फाळणी झालेली असताना सर्वधर्मसमभाव अकारण लादून घेतला, असे आपले मत लेखकाने विविध युद्धांतील विविध प्रसंग सांगत व्यक्त केले आहे. भारतीय नेत्यांनी केवळ शाब्दिक इशारे देण्यातच वेळ खर्च केला आणि युद्धाचे जे सैनिकांनी जिंकले ते राजकारण्यांनी तहात गमावले, यावरही लेखकाने बोट ठेवले आहे..किरण गोखले यांनी या पुस्तकात प्रामुख्याने भारताने गमावलेल्या संधींची चर्चा केली आहे. स्वतंत्र भारत अस्मितेच्या शोधात असताना कधी काँग्रेसच्या नेत्यांनी तर कधी हिंदुत्ववादी नेत्यांनी आपल्या संभ्रमित भूमिकांमुळे देशाला निर्णायक मार्गावर जाण्यापासून वंचित ठेवले. भारतीय लष्करामध्येही धाडसाची कोठेही कमतरता नसली तरी आपल्या क्षमतांची पुरेशी जाणीव नसल्याने आणि दुसरे आपल्यापेक्षा वरचढ असल्याची भावना अकारण मनात रुजवल्याने फार मोठी हानी झाल्याची खंत पुस्तकात व्यक्त करण्यात आली आहे..इतिहासकालापासून भारतावर इतकी आक्रमणे होऊनही शत्रूच्या रणनीतीचा, डावपेचांचा फारसा अभ्यास न करणे, पराभवाची कारणे न शोधणे देशाला फार महागात पडले आहे. विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णाची चांगल्या डॉक्टरने जशी चिकित्सा करावी आणि रुग्ण बरा होण्याच्या हेतूने त्याच्या चुकीच्या सवयी परखडपणे सांगाव्यात, त्याच पद्धतीने लेखकाने भारतीय युद्धांची चिकित्सा केलेली आहे. प्रत्येक युद्धाचे तपशीलवार वर्णन, घटनाक्रमानुसार केलेले विश्लेषण आणि त्याचे झालेले परिणाम ही माहिती अंतर्मुख करणारी आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.