स्वच्छता असो, की पाणी वापराबाबतची जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रा. डॉ. स्नेहल दोंदे या नेहमीच साधी साधने वापरतात. मुलांना सोबत घेत, प्रश्नावल्या भरणे, सर्व्हेक्षण करणे, माहितीचा अधिकार वापरणे अशा साधनांनी त्यांनी अनेक प्रकल्प यशस्वीरीत्या पार पाडले आहेत. स्पष्ट आणि सत्य बोलण्यामुळे २०१७ ची आंतरराष्ट्रीय जलपरिषद त्यांनी गाजवून सोडली..भिवंडीतील ओस्वाल महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणून डाॅ.स्नेहल दोंदे यांची निवड झाली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत प्रेरित करतानाच त्यांच्या मनामध्ये परिसरातील अस्वच्छतेबाबत प्रश्न निर्माण केले. त्यातून सुरू झाले ते भिवंडी स्वच्छता अभियान. विद्यार्थ्यांची माहिती अधिकार कायदा कसा वापरायचा, याबाबत मार्गदर्शन केले. डाॅ. स्नेहल आणि विद्यार्थ्यांनी विविध कार्यालयातून भिवंडीच्या स्वच्छतेसंबंधी माहिती मिळवायला सुरुवात केली. कायदे व नियमांची जाणीव करून देऊन कार्यालयात प्रश्न कसे अचूक विचारायचे, मिळालेल्या माहितीचा कसा उपयोग करायचा हेही डाॅ. स्नेहल दोंदे यांनी उदाहरणासह शिकवले..Water Awareness : सामान्यांच्या जलसाक्षरतेसाठी शासनाचा पुढाकार.त्यातून त्यांच्याकडे भिवंडीतील नदी प्रदूषण, कचरा व स्वच्छता व आरोग्यविषयक माहिती जिल्हाधिकारी कार्यालय, एमआयडीसी, एमएमआरडीए, जिल्हा परिषद, प्रदूषण महामंडळ, आरोग्य विभागाकडून प्रचंड माहिती जमा झाली. या माहितीच्या आधारे नैतिक व कायदेशीर दबाव प्रशासनावर कसा आणता येतो, हेही मुलांना शिकवले. परिणामी, भिवंडीतील प्रशासन बऱ्याच प्रमाणात सक्रिय झाले. परिसरातील स्वच्छता, कचरा निर्मूलन, नदी प्रदूषण याबाबतच्या समस्या सुटण्यास सुरुवात झाली. त्यातूनच स्वच्छ पाण्याचा प्रश्नही बऱ्याच अंशी सुटला..एकदा स्वच्छता होऊन चालणार नव्हते, ती नियमित राहण्यासाठी हवा होता लोकसहभाग. त्यासाठीही मुलांची मदत घेतली. मुलांकडे एक प्रश्नावली देऊन ती विविध गृह सोसायट्यांमध्ये जाऊन भरून आणण्याचे काम दिले. त्यामुळे त्यांना लोकांमध्ये मिसळणे, त्यांच्या बोलणे, चर्चा करणे यांची कौशल्ये तर मिळालीच, पण आपल्याच भागामध्ये लोक कसा विचार करतात, हेही समजले. लोकांना स्वच्छतेचे महत्त्व समजून देतानाच ती कशा प्रकारे ठेवता येईल, हेही पटवता आले. परिणामी स्वच्छतेच्या कामात लोकसहभाग वाढत गेला. असे ‘सर्व्हे टूल्स’ डाॅ. स्नेहल दोंदे यांचा हुकमी उपाय आहेत..Water Awareness : पाणी बचतीने मानवाचे भविष्य पाण्यासारखे उज्ज्वल होईल.जैवविविधतेच्या संवर्धनासाठी दिशादर्शक कामअध्यापनाच्या निमित्ताने प्रा. डॉ. स्नेहल दोंदे ज्या महाविद्यालयामध्ये गेल्या, तेथील विद्यार्थ्यांना पाणी, नदी आणि पर्यावरणाची जोडण्याचे काम त्यांनी पहिल्यांदा केले. ‘भातसा धरण-२’ या प्रकल्पामुळे स्थानिक जैवविविधतेचे खूप नुकसान झाले होते. त्याची चर्चा माध्यमांपासून विविध पातळीवर होत होतीच. पण सामान्य लोकांमध्ये त्याबाबत जागरूकता आणण्यासाठी व संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी त्यांची काम सुरू झाले. त्यांनी भिवंडीमधील विद्यार्थ्यांकडून स्थानिक जैवविविधतेच्या नोंदी व अभ्यास करून घेतला. यामध्ये मुलांनी प्रत्यक्ष जंगलात जाऊन निरीक्षणे नोंदवली, विविध प्रकारच्या नोंदी केल्या..विविध विभागातील प्राध्यापकांनीही त्यांना मार्गदर्शन केले. पहिल्यांदाच मुंबई विद्यापीठाने अशा जैवविविधतेच्या सर्व्हेक्षणासाठी निधी पुरवला. हा प्रकल्प यशस्वी झाला. त्यातून जागरूक झालेल्या मुलांच्या विविध पर्यावरणासंबंधी भेटी व निरीक्षण सहली होत राहिल्या. अशा भेटीवेळी मुद्दाम संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना आमंत्रित केले जाई. त्यातून मुलांची या अधिकाऱ्यांविषयीची भीती कमी झाली. या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये जैवविविधतेचे महत्त्व रुजत गेले. सामान्य समाज आणि प्रशासन यांच्यात समन्वय वाढण्यास मदत झाली. अंतिम ध्येय तर नदी स्वच्छता व पर्यावरणीय संस्कार हेच होते. हा उपक्रम मुंबई विद्यापीठाने स्वीकारला व अन्य महाविद्यालयांनाही असे उपक्रम करण्यास निधी व प्रोत्साहन दिले..Water Scarcity Awareness : लोकसहभागातूनच पाणी टंचाईवर मात शक्य.वाणिज्य (कॉमर्स) शाखेतील मुलांना पाण्यासंदर्भात कोणते प्रकल्प देता येतील, यावर त्यांनी बराच विचार केला. या मुलामुलींना चक्क टेक्स्टाईल किंवा पॅकेजिंग उद्योगामध्ये पाठवले. तिथे उद्योजक देत असलेली पाण्याची किंमत व पाण्याचे खरे मूल्य काढण्याचे कार्य दिले. पाण्याची किंमत म्हणजे पाण्यासाठी ते किती पैसे देतात आणि मूल्य म्हणजे तेच पाणी उपलब्ध नसेल तर या उद्योगाचे रोज किती नुकसान होईल, याचा अंदाज होय..या निमित्त मुले या उद्योगातील उत्पादन निर्मिती, व्यवस्थापन प्रक्रिया शिकली. सोबतच त्यांनी त्या कंपनीचा पाण्याचा ताळेबंद मांडला. त्यातून केवळ मुलांनाच नाही, तर त्या उद्योजकांचेही पाणीविषयक अर्थकारणाबाबत डोळे उघडण्याचे काम केले. पाण्याचा वापर हा आर्थिक मूल्याशी जोडल्यामुळे काटेकोर जलव्यवस्थापनाला चालना मिळाली. मुलेही व्यवसायाभिमुख कौशल्ये शिकलीच, पण त्यांच्यामध्ये पाणी बचती, प्रदूषण याबाबत जागरूकताही निर्माण झाली. डॉ. स्नेहल यांचे कोणतेही काम घेतले तर पठडीबाहेरचेच (आऊट ऑफ बॉक्स) असते..Water Awareness : स्वच्छ पाणी उपलब्धतेबाबत होऊया जागरूक.गाजवली आंतरराष्ट्रीय जलपरिषद...२०१७ मध्ये डाॅ.स्नेहल दोंदे प्रथमच ‘वर्ल्ड वॉटर कौन्सिल’ला उपस्थित राहिल्या. जगभरात पाणी विषयात कार्यरत अनेक व्यक्ती व संस्थांना एकत्र आणणारी ही जागतिक परिषद आहे. तिचे मुख्यालय फ्रान्समध्ये पॅरिसला आहे. या WWC चे सदस्य असलेले डाॅ.स्नेहल दोंदे यांचे महाविद्यालय हे केवळ भारतातूनच नव्हे, तर जागतिक पातळीवरील एकमेव महाविद्यालय. या परिषदेमध्ये अनेक देशांचे अध्यक्ष, धोरणकर्ते, नियोजनकर्ते, पाणी विषयातले मोठे व्यावसायिक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते सदस्य असतात. मात्र दुर्दैवाने पाणी संबंधित मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या व तत्सम व्यावसायिकांचे WWC वर बऱ्यापैकी वर्चस्व असते, कारण त्या परिषदेसाठी प्रायोजक असतात. परिषदेमध्ये होत असलेल्या सर्व जलस्रोत व पाणी वापरासंबंधीच्या चर्चांवर व्यापारी संबंधांचे सावट असते..डॉ. स्नेहल दोंदे यांना हीच परिस्थिती २०१७ च्या परिषदेतही जाणवत होती. पाण्यासंदर्भात कार्यरत स्थानिक व जागतिक पातळीवरील स्वयंसेवी संस्थांना आर्थिक निधीचा पुरवठा करत कंपन्या त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या मांडलिक बनवत असतात. त्यामुळे या परिषदेमध्येही चर्चेत सुरू असलेले विषय सामान्यांच्या हितसंबंधापेक्षाही मूलभूत पायाभूत संरचनांच्या नावाखाली व्यावसायिकांच्या हितसंबंध जपणारे दिसत होते. परिणामी डॉ. दोंदे अस्वस्थ झाल्या. त्यांनी भारतीय शिष्टमंडळातील सर्वांच्या हे लक्षात आणून दिले. पण सर्वजण मूग गिळून शांतच... अस्वस्थतेमध्ये डॉ. दोंदे बोलायला उभ्या राहिल्या. त्यांनी भाषणांमध्ये शास्त्रीय आकडेवारी व संदर्भानिशी सर्वच मुद्द्यांचा परामर्श घेतला. ही परिषद आणि एकूणच डब्ल्यूसीसी ही संस्था तिच्या मूळ उद्देश आणि उद्दिष्टांपासून कशी दूर जात आहे, हे निक्षून सांगितले. पाणी हे नैसर्गिक संसाधन असण्यापेक्षा पूर्णपणे भांडवली वस्तू असल्याचे समजूनच चर्चा सुरू असल्याचे सांगितले..या परिषदेमध्ये खरेतर नवे तंत्रज्ञान, अन्यायाचे निवारण, भविष्यासाठीच्या पाण्यासाठीची धोरणे यावर चर्चा व्हायला पाहिजे, असे ठणकावून सांगितले. त्यांच्या भाषणानंतर सभेचा सारा नूरच पालटला. चक्क कार्यक्रम पत्रिका बदलल्याप्रमाणे डॉ. दोंदे यांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांवर चर्चा सुरू झाल्या. त्यातून परिषदेत संपूर्णपणे पुनर्विचार आणि पुनर्मांडणी देखील झाली. परिषदेची सुरुवात आणि शेवट पूर्ण विरुद्ध असलेल्या मुद्द्यांनी भरलेली होती. यातून जगभरातील जल योद्ध्यांना विचारधारा, कृती कार्यक्रम याविषयी व्यापक व मूलभूत संस्कार झाले. तीनशे प्रतिनिधी ही नवी विचारधारा घेऊन बाहेर पडले. आजवर कोणीही इतक्या स्पष्टपणे ‘डब्ल्यूडब्ल्यूसी’ ला सुनावले नव्हते. पण या निडर व दमदार मांडणीमुळे डॉ. दोंदे या परिषदेत उत्सवमूर्ती ठरल्या. परिषद संपताना घेतल्या जाणाऱ्या फोटोसेशनमध्ये त्या सर्वांच्या केंद्रबिंदू ठरल्या. भारतीय लोकांनी तर त्यांना ‘डब्ल्यूडब्ल्यूसी’ च्या ‘सुषमा स्वराज’ अशी उपाधी दिली..पुढील लेखामध्ये आपण डाॅ.स्नेहल दोंदे यांच्या तिसऱ्या पीएच.डी. संबंधी विषयावर चर्चा करणार आहोत. पश्चिम बंगालमधील गंगा नदीची प्रदूषणमुक्ती हा त्यांचा अभ्यासाचा विषय होता.- सतीश खाडे ९८२३०३०२१८,(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ यापुस्तकाचे लेखक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.