
Mumbai News: मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि दिवा स्थानकांच्या दरम्यान सोमवारी (ता.९) सकाळी ९ वाजता एक भीषण अपघात घडला. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
कसारा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मार्गावरील दोन्ही फास्ट लोकल ट्रेनमधून 12 प्रवासी रुळांवर पडले. यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर जखमींची संख्या 8 आहे.
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निळा यांनी सांगितले की, "दोन लोकल ट्रेन समोरासमोर येत असताना फूटबोर्डवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना धडकल्या. त्यामुळे प्रवासी खाली पडले. या अपघाताचे मुख्य कारण गर्दी आणि फूटबोर्डवर प्रवास असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे." असंही निळा म्हणाले.
हा अपघात मुंब्रा स्थानकाजवळ घडला, जिथे एक रेल्वे सीएसएमटीकडे, तर दुसरी कसारा मार्गावर जात होती. रेल्वे आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना कळवा येथील शिवाजी रुग्णालय आणि ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मृत्यू पावलेल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या स्थानिक सेवांवर परिणाम झाला असून, अनेक गाड्या उशिराने धावत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली. रेल्वे प्रशासनाने तपास सुरू केला असून, नवीन रेल्वे गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे (automatic door closure system) बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंब्रा-दिवा मार्गावरील हा पट्टा ‘डेथ ट्रॅक’ म्हणून कुख्यात आहे, कारण यापूर्वीही येथे अनेक अपघात घडले आहेत. रेल्वे प्रवासी संघटनेने या मार्गावरील सुरक्षेच्या समस्यांबाबत वारंवार तक्रारी केल्या आहेत.
या अपघाताबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, “आपल्या देशात माणसाची किंमत नाही. मुंबईतील लोकल ट्रेनमधील गर्दी ही नवी गोष्ट नाही. रेल्वेमंत्री काय करतात? ही परिस्थिती वर्षानुवर्षे तशीच आहे, पण कोणतीही ठोस उपाययोजना होत नाही.” माध्यमांनीसुद्धा राजकारणाप्रमाने या अशा घडणाऱ्या अपघातांचही वार्तांकन कराव असा सल्ला त्यांनी दिला.