Salaiban Wild Vegetable Festival : बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सालईबन हे ठिकाण आता सर्वदूर परिचित झाले आहे. त्याला कारणही तसेच आहे. जिल्ह्यातील खामगाव येथील तरुणाई फाउंडेशन व महात्मा गांधी लोकसेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पाच वर्षांपासून या ठिकाणी रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षी तीन ऑगस्ट रोजी विविध ठिकाणांहून निसर्गप्रेमींनी त्यास हजेरी लावली. महोत्सव आयोजकांच्या विचारप्रणालीनुसार आजच्या जीवनशैलीत पारंपरिक ठेवा असलेल्या रानभाज्यांचे महत्त्व कमी होत चालले आहे. .शहरी भागात तर या भाज्या सहज उपलब्ध होत नाहीत. रानभाज्यांचे आयुर्वेदिक किंवा आरोग्यदायी महत्त्व वेगळे आहे. अशा विविध गोष्टी लक्षात घेऊन संबंधित दोन्ही संस्थांकडून जनजागृतीसाठी रानभाज्या महोत्सवाची संकल्पना पुढे आली. पाच वर्षांपूर्वी येथे भेट देणाऱ्यांची संख्या दीडशेपर्यंत होती. यंदाचा आकडा लक्षात घेता ती पाचशेपर्यंत पोहोचली आहे..Wild Vegetables: पुरंदर किल्ल्याच्या परिसरात बहरल्या रानभाज्या.निसर्गप्रेमी आता दरवर्षी या महोत्सवाच्या तारखेची प्रतीक्षा करीत असतात. फाउंडेशनचे पदाधिकारी म्हणतात, की रासायनिक निविष्ठांचा वापर केलेल्या भाजीपाल्यांमध्ये कीडनाशकांचे अवशेष राहण्याचा धोका असतो. अशा वेळी सेंद्रिय, नैसर्गिक आहाराची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे. सालईबनातील रानभाज्यांसाठी कोणत्याही रसायनांचा वापर केला जात नाही. महोत्सवात भाज्यांची विक्री होते. मात्र तो खरा उद्देश नाही. रानभाज्यांचे विज्ञान जपणे, विषमुक्त, पौष्टिक आहाराचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोचविणे हादेखील महोत्सवाचा हेतू आहे..सालईबनच्या प्रक्षेत्रावर लागवडमहात्मा गांधी लोकसेवा संघाचे सालईबन येथे सुमारे ७२ एकर प्रक्षेत्र आहे. साल येथे पर्यावरण संवर्धनाचे मोठे कार्य हाती घेण्यात आले आहे. उजाड होत चाललेल्या सातपुड्याच्या या डोंगरात संघासह तरुणाई फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेत सुमारे २५ हजारांवर झाडे लावली आहेत. त्यांचे आता सुंदर वन तयार झाले आहे. जलसंधारणाची कामे केल्याने पावसाचे पाणी मुरण्यासही मोठा हातभार लागला आहे. उजाड माळरान हिरवेगार झाल्याने त्या ठिकाणी असंख्य रानभाज्या उगवतात. याव्यतिरिक्त परिसरातील सातपुडा परिसरातही रानभाज्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. महोत्सवाच्या माध्यमातून येथील आदिवासी महिलांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत..शिवार फेरी, ग्रामीण उद्यमशीलतायंदाच्या महोत्सवाचा प्रातिनिधिक अनुभव सांगायचा तर सुरुवात झाली ती अनोख्या शिवार फेरीने. सालईबनच्या हिरवळीमध्ये सहभागी मंडळींनी स्वतः रानभाज्या शोधल्या. त्यांची ओळख करून घेतली. शिवाय आयुर्वेदाचार्य डॉ. राजेश भोंडे यांनी त्या भाज्यांमागील औषधी विज्ञान उलगडून दाखवले. ही फेरी म्हणजे निसर्गशाळेतील जिवंत धडा घेतल्यासारखी होती. आपल्या आजूबाजूला आरोग्यदायी खजिना आहे. .फक्त त्याकडे पाहण्याची दृष्टी कशी असावी हे या महोत्सवातून शिकण्यास मिळाले. विविध दालनेही उभारण्यात आली. त्यामध्ये सेंद्रिय धान्य, हस्तनिर्मित उत्पादने, बांबूच्या वस्तू, साबण, पारंपरिक चटण्या आणि अर्थातच रानभाज्यांचे विविध प्रकार लोकांनी अनुभवले. विक्री केंद्र नव्हे तर ग्रामीण उद्यमशीलता या प्रदर्शनातून दिसून आली. करटुले, केणा, बांबू कोंब, आघाडा, अंबाडी, फांजी वेल आदी वनस्पती पाहण्यास मिळाल्या.महोत्सव यशस्वी करण्यासाठी फाउंडेशन तसेच सामाजिक कार्यासोबत जुळलेल्या युवावर्गाचाही पुढाकार होता. निसर्गरम्य वातावरणात या ठिकाणी दोन-तीन दिवस मुक्कामी राहून हे कार्य त्यांनी पूर्णत्वास नेले. शिबिर संयोजिका सुचिता श्याम उमाळे, सालईबनचे व्यवस्थापक मंजितसिंग शिख, तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण पिठोरे, सचिव राजेंद्र कोल्हे आदींचाही वाटा महत्त्वाचा ठरला..Wild Vegetables: रानभाज्यांना मिळाली बाजारपेठ.महोत्सवातून होईल जागृतीशरीराला हितकर म्हणून रानभाज्या खायलाच हव्यात. त्यातून ॲनिमिया, मधुमेह, लठ्ठपणा, मासिक पाळीच्या तक्रारी, संधिवात, विविध प्रकारचे कर्करोग आदी विकार दूर ठेवता येतील. त्या पावसाळ्यात उगवतात. त्यासाठी जमीन नांगरावी लागत नाही. स्वतंत्र लागवड करावी लागत नाही. कीडनाशके, खते यांची गरज नसते. लागवड, देखभाल खर्च करावा लागत नाही. रानभाज्यांच्या रूपाने आपले पारंपरिक ज्ञान नष्ट होण्यापूर्वी ते शेतकरी व महिलांच्या समोर येणे आवश्यक आहे. रानभाज्यांच्या सरस पाककृती कशा करता येतील याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे. सातपुडासारखा भूभाग निसर्गसंपन्न आहे. त्यात दरवर्षी असंख्य रानभाज्या तयार होतात. सालईबन येथील महोत्सवाच्या माध्यमातून त्यांच्याविषयीच्या जागृतीचे काम होत आहे. त्याचा परिणाम येत्या काळात निश्चित चांगला दिसून येईल.डॉ. राजेश भोंडे ९८८१४९९७८९ आयुर्वेद व योगतज्ज्ञ.रानभाज्यांच्या पाककृतीकेवळ वनस्पतींची ओळख एवढ्यापुरते मर्यादित न राहता त्यांची पाककृती करून ती खाण्यास उपलब्ध करून देण्याचाही आयोजकांचा हेतू होता. म्हणूनच महोत्सवाचे खरे आकर्षण ठरले ते रानभाज्यांपासून बनविलेले पारंपरिक आणि आरोग्यवर्धक पदार्थ. मोहफुलांचा समावेश केलेली पुरणपोळी, अंबाडीची भाजी, नाचणीची भाकरी, फांजीची डाळभाजी, करवंद कढी, अळूचे मुटकुळे, बांबूचे लोणचे, गुळवेल ठेचा, शेवगा चटणी, समुद्रशोक वनस्पतीचे पराठे, गुंज मुखवास अशा विविध २२ चविष्ट पदार्थांची येथे रेलचेल होते. त्यातून जेवणात वेगळी चव आणि मनात पारंपरिक खाद्यसंस्कृतीची भर घातली गेली.विशेष म्हणजे सर्व पदार्थ तयार करण्यासाठी तरुणाई फाउंडेशनच्या आदिवासी महिला कार्यकर्त्यांनी तीन दिवस जंगलात फिरून भाज्या संकलित केल्या. त्यांच्यापासून विविध पदार्थ बनवले. त्यांची चव चाखण्यासाठी मोठी झुंबड उडाली होती.राजेंद्र कोल्हे ७५८८०८०११३ (सचिव, तरुणाई फाउंडेशन).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.