ग्रामीण आणि नागरी अशी विभागणी प्रशासनात योग्य आहे, पण नदीसाठी ही विभागणी उपयोगाची ठरत नाही. नदीचा प्रवाह ही सगळी बंधने तोडून पुढे जातो. म्हणून नदीचे संरक्षण करायचे असेल, तर ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकसूत्रात आणि समन्वयाने काम करणे अत्यंत आवश्यक ठरते..महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नुकताच १२ जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामुळे ग्रामीण महाराष्ट्रात निवडणुकीचे वातावरण तयार होत असून, गावोगावी प्रचाराची लगबग सुरू झाली आहे. गावपातळीवर उमेदवार, कार्यकर्ते, सभा, भेटीगाठी, आश्वासने, विकासाचे नारे, जाहीरनामे सांगणे सुरू होत आहेत. रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, घरकुल, रोजगार, शेतकरी मदत, अनुदान योजनेच्या घोषणा हे विषय नक्कीच महत्त्वाचे आहेत. पण या सगळ्या घोषणांच्या गदारोळात एक विषय असतो जो दरवेळी मागे पडतो, आणि नंतर त्याची किंमत सगळ्या गावाला आणि पंचक्रोशीला मोजावी लागते, तो विषय म्हणजे नदी आणि पाणी..River Conservation: माझ्या गोदावरीला श्वास घेऊ द्या....खरे सांगायचे तर नदी ही गावाची फक्त ‘वाहती रेषा’ नाही, तर नदी ही गावाची जीवनवाहिनी आहे. नदी जिवंत असेल तर विहिरीत पाणी टिकते, शेतात ओलावा राहतो, पशुधनाला पाणी मिळते, गावाचे आरोग्य टिकते आणि गावात स्थैर्य निर्माण होते. पण नदी वाहण्याची थांबली, की गावाचा आधार नष्ट होतो आणि पाणी पुरवठ्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागतो. लोक कूपनलिका घेतात, त्यामुळे खर्च वाढतो, पाण्यासाठी भांडणे वाढतात आणि शेवटी स्थलांतर सुरू होते. काही गावातून तर अशी परिस्थिती आहे, की पाण्याचे टॅंकर देखील बऱ्याच लांब अंतरावरून आणावे लागतात. म्हणूनच निवडणुकीच्या निमित्ताने स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडून येणारे लोकप्रतिनिधी, प्रशासक आणि अधिकारी यांनी राज्यघटनेत उल्लेखिलेल्या नदी आणि पाणी विषयक जबाबदाऱ्यांबाबत जागरूक राहून आपले विहित कार्य पार पाडणे ही काळाची गरज आहे..नदीचे पर्यावरण जपाआजचा प्रश्न एवढाच नाही की ‘पाणी येतं का?’आजचा खरा प्रश्न आहे, की ‘पाणी कुठून येते? आणि ते किती दिवस टिकते?’ हा प्रश्न जर लोकप्रतिनिधी आणि मतदारांनी मनात ठेवला, तर विकासाचा सध्याचा अर्थच बदलून जाईल.आज अनेक ठिकाणी नदीला नाल्यासारखे स्वरूप आलेले आहे. जिथे नदी असायला हवी, तिथे सांडपाणी सोडले जाते. नदीकाठावर माती टाकून भराव केला जातो. नदीच्या वळणावर बांधकाम होते. काही ठिकाणी नदीचे पात्र अरुंद केले जाते. .Raigad River Conservation : रायगडमध्ये नदी संवर्धनाला तिलांजलि.मग काय होते? पावसाळ्यात नदी उसळते आणि पूर येतो; उन्हाळ्यात नदीचे पात्र कोरडे पडते आणि दुर्गंधी पसरते. लोक म्हणतात, की नदीचे पाणी खराब झाले किंवा नदीला पूर आला. पण खरे कारण नदी नसते, खरे कारण असते आपली चूक, आपली बेफिकिरी आणि विवेक शून्य नियोजन.नदी ही जिवंत परिसंस्था आहे. तिच्या काठावरची माती, झाडं, गवत, ओलावा, नदीतील मासे, जलचर, नदीमुळे वाढणारे भूजल हे सगळं मिळून नदीचा ‘जीव’ बनतो. म्हणून नदीला नाल्यासारखा वापरणे म्हणजे आपल्या स्वतःच्या पिण्याच्या पाण्याला, आपल्या शेतीला आणि आपल्या आरोग्याला दगा देणे होय..गाव स्वच्छ हवे... पण पाणी घाण चालेल काय?आज अनेक गावे स्वच्छतेकडे वाटचाल करत आहेत. गावात कचरा उचलला जातो, रस्ते झाडले जातात, प्लॅस्टिकवर बंदीची चर्चा होते. घंटा गाडीने घराघरांतून कचरा उचलला जातो. अगदी काही ठिकाणी तर सकाळी भजने, भूपाळ्या देखील ऐकायला मिळतात. पण हा कचरा नेमका कोठे जातो याचा कधी विचार केला आहे काय? बहुसंख्य ग्रामपंचायती हा घनकचरा एक तर रस्ते किंवा महामार्गाच्या बाजूस किंवा नदीच्या काठावर किंवा थेट पात्रात फेकतात..River Conservation : समुदायाच्या सहभागातून वाचेल विदर्भातील नद्यांचे अस्तित्व.हीच गत आपल्या सांडपाण्याची आणि मैलापाण्याची. पण जर गावातील सांडपाणी थेट नदीत जात असेल, तर गाव स्वच्छ होईल का? उलट नदी घाण होते आणि तेच प्रदूषण पुढे विहीर, कूपनलिका, शेतीमध्ये आणि शेवटी आपल्या घरात आणि जेवणाच्या ताटात येते. स्वच्छतेचा अर्थ फक्त ‘दिसणारी साफसफाई’ नाही, तर स्वच्छतेचा खरा अर्थ आहे, सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन. नदीत घाण पाणी जाणे थांबवणे, पाणी पुन्हा वापरणे आणि बचत करणे महत्त्वाचे आहे. स्वच्छ गाव म्हणजे ‘सिमेंटचे रस्ते’ नव्हे; स्वच्छ गाव म्हणजे स्वच्छ नदी आणि सुरक्षित पाणी..नदीचा प्रवास अभ्यासाआपण पुणे महानगराला पाणी पुरविणाऱ्या मुळा आणि मुठा या नद्यांचा प्रवास पाहूयात. मुळशीच्या एकाच डोंगराच्या दोन दिशेला या नद्या उगम पावतात. मुठा नदी छोटी गावे ओलांडून आपल्या पुणे शहरात प्रवेश करते. तीच बाब मुळा नदीची आहे. मुळा खोऱ्यातून वाहत अनेक गावांना वळसा घालून माण हिंजवडी मार्गे बाणेर येथे पुणे शहरात प्रवेश करते. नदीच्या या प्रवासात तिला अनेक छोट्या परंतु महत्त्वाच्या नद्या जसे की राम नदी, देव नदी येऊन मिळते. नदीचा काही काळांपूर्वीचा स्वच्छंदी विहार आणि पवित्रता पाहिल्यास आणि आजच्या स्वरूपात त्याची तुलना केल्यास आपले खुजेपण स्पष्टपणे दिसून येते..River Conservation : सूक्ष्मजीवांनी केले आयाड नदीचे पुनरुज्जीवन.पुढच्या पिढीला या नद्या होत्या असेच सांगावे लागेल, अशी परिस्थिती आली आहे. नदीच्या प्रवासात असंख्य ओढे, नाले, झरे, छोटी नद्या मिळत राहतात. यामुळे नदी वाढते, समृद्ध होते आणि शेवटी समुद्राला जाऊन मिळते. म्हणजे नदीचा प्रवास हा अखंड असतो. नदीला सीमा नसते. ती ग्रामपंचायतीच्या हद्दीत थांबत नाही, नगरपालिका, जिल्ह्याच्या हद्दीत थांबत नाही. नदी ही कोणाच्या एका गावाची नाही. नदी सगळ्यांची आहे..७३ वी आणि ७४ वी घटना दुरुस्तीची जाणीव ठेवा...स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम करण्यासाठी ७३ वी आणि ७४ वी घटना दुरुस्ती करण्यात आली. अनुक्रमे २९ विषय ग्रामपंचायत आणि १८ विषय नागरी संस्थांना राज्य घटनेने हस्तांतरित केले आहेत. त्याचा अभ्यास आणि भान निवडून आलेल्या आणि येणाऱ्यांनी ठेवावे. या घटना दुरुस्त्यांमधून स्थानिक संस्थांना पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण आणि स्थानिक विकास यावर काम करण्याची जबाबदारी दिली आहे. लोकप्रतिनिधींनी निवडून येण्यापूर्वी समजून घ्या आणि निवडून आल्यावर त्याची अंमलबजावणी करावी. नदी वाचवणे, पाणी सुरक्षित ठेवणे, प्रदूषण थांबवणे, भूजल वाढवणे हे काही ‘वैकल्पिक’ विषय नाहीत. हेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्तव्य आहे.निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी जर हे भान ठेवले, तर विकासाची दिशा बरोबर असेल. आणि जर हे भान नाही ठेवले, तर विकासाचे कागदावरच होईल आणि पाणी संकट अधिक भयंकर होईल..प्रशासकीय चौकट आणि नद्या !नदीवरून गाव, जिल्हा, तालुका, राज्य आणि देशाची हद्द निश्चित होते हे सर्वश्रुत आहे. आपण नदीला प्रशासकीय चौकटीत बांधायचा फोल प्रयत्न करतो, हे वास्तव आपण कधी समजून घेणार? आपल्याकडे प्रशासनाची चौकट आहे, ग्रामीण भागात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नागरी भागात नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका.ग्रामीण आणि नागरी अशी विभागणी प्रशासनात योग्य आहे, पण नदीसाठी ही विभागणी उपयोगाची ठरत नाही. नदीचा प्रवाह ही सगळी बंधने तोडून पुढे जातो. म्हणून नदीचे संरक्षण करायचे असेल, तर ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकसूत्रात आणि समन्वयाने काम करणे अत्यंत आवश्यक ठरते..जर डोंगरी भागातील गावांनी नदीत सांडपाणी सोडले, जंगलतोड केली, ओढे बुजवले तर खालील शहराला पाणी कुठून मिळणार? आणि जर शहराने नदीत लाखो लिटर सांडपाणी सोडले, नदीकाठावर अतिक्रमण केले, तर पुढील गावांना स्वच्छ पाणी कसे मिळणार? म्हणून नदी वाचवायची असेल तर ‘माझ्या हद्दीपुरते’ हे चालणार नाही. नदीसाठी ‘आपल्या सगळ्यांची जबाबदारी’ ही भावना रुजावी लागेल. म्हणून नदी आणि तिच्या संपूर्ण खोऱ्याला समजून घेणे आणि त्यानुसार आपले वर्तन ठेवणे आणि सुधारणे महत्त्वाचे ठरते. आज उजनी धरणात पुणे, पिंपरी- चिंचवड शहर आणि अन्य नागरी आणि ग्रामीण भागातून येणारे आणि उद्योगातून येणाऱ्या प्रदूषित घटकाच्या पाण्याने लोकजीवन भयावह झाले आहे याचे कधी गांभीर्य आपल्याला येणार?९७६४००६६८३(माजी कार्यकारी संचालक, जलसाक्षरता केंद्र, यशदा, पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.