Bhandara News: बावनथडी प्रकल्पातील कालवा क्रमांक ५ मधून शेतीसाठी तत्काळ पाणी सोडावे, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे. सलग दोन वेळा दिलेल्या आश्वासनांनंतरही पाणी न सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे..बावनथडी कालव्याअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये सध्या रब्बी हंगामातील पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. गहू, हरभरा, भाजीपाला यांसारख्या पिकांना पाण्याची अत्यंत गरज असताना प्रशासनाकडून मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पाणी न मिळाल्यास हातातोंडाशी आलेली पिके वाळण्याच्या मार्गावर असून मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे..Lift Irrigation Scheme: ताजनापूर योजनेसाठी शेतकरी आक्रमक होणार.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व पंचायत समिती तुमसरचे माजी उपसभापती शिशुपाल गोपाले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अभियंता, लघूपाटबंधारे विभाग, जलसंपदा कार्यालय तसेच बावनथडी प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. १० जानेवारी रोजी पाणी सोडण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ते पाळले गेले नाही. त्यानंतर १७ जानेवारीची नवी तारीख देण्यात आली; तरीही अद्याप कालव्यात पाणी सोडले गेलेले नाही, असा आरोप करण्यात आला..Tembhu Irrigation Scheme: ‘टेंभू’च्या आवर्तनाने लाभ क्षेत्रात दिलासा.‘‘वारंवार आश्वासने देऊनही प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होत नाही. ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. पिकांसाठी पाण्याची तातडीची गरज आहे. वेळेत पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल,’’ असे शिशुपाल गोपाले यांनी स्पष्ट केले. प्रशासनाची ही बेफिकीर भूमिका शेतकऱ्यांना आंदोलनाकडे ढकलत असल्याचेही त्यांनी नमूद केले..परिसरातील शेतकरी प्रचंड तणावात आहेत. आधीच वाढलेले उत्पादन खर्च, खत-बियाण्यांचे दर, मजुरी आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असताना, पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाणी न मिळाल्यास संपूर्ण हंगाम उद्ध्वस्त होईल. कर्ज फेडायचे कसे, घरखर्च कसा चालवायचा, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत..दरम्यान, प्रशासनाने १० व १७ जानेवारी या दोन्ही तारखांना दिलेले आश्वासन पाळले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. वेळेत पाणी सोडले नाही, तर शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य राज देशमुख यांनी दिला.शासनाने तत्काळ निर्णय घेऊन कालवा क्रमांक ५ मधून पाणी सोडावे, अन्यथा आंदोलन अटळ आहे, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.