डॉ. आनंद गोरेRainfall Deficit: पावसाच्या खंड काळात कोणतीही उपाययोजना सर्व पिकांसाठी किंवा सर्व शेतांसाठी एकसारखी लागू होत नाही. पीक वाढीची अवस्था, जमिनीचा प्रकार, उपलब्ध ओलावा, सिंचनाची उपलब्धता, पिकाची सद्यःस्थिती आणि स्थानिक हवामान परिस्थिती यांचा विचार करूनच निर्णय घ्यावा..पीकवाढीची अवस्था, पानांची स्थिती, मुळांच्या परिसरातील ओलावा, पिकांमध्ये पाण्याच्या ताणाची लक्षणे यांचे नियमित निरीक्षण करावे. हलकी जमीन, मध्यम जमीन आणि भारी जमीन यामध्ये उपलब्ध ओलाव्याचे प्रमाण वेगवेगळे असल्याने सर्व शेतांसाठी एकच उपाययोजना न करता जमिनीचा प्रकार व पिकाची अवस्था विचारात घ्यावी. पिकांमध्ये सकाळच्या वेळी पाने कोमेजणे, पानांचा रंग बदलणे किंवा वाढ मंदावणे यासारखी लक्षणे दिसल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने आवश्यक उपाययोजना करावी..Agriculture Management: पावसाच्या खंडामधील पीक व्यवस्थापनाचे नियोजन.सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी पाण्याचा कार्यक्षम व काटकसरीने वापर करावा. उपलब्ध पाणी संपूर्ण क्षेत्राला कमी प्रमाणात देण्यापेक्षा पिकांच्या संवेदनशील वाढीच्या अवस्थेत संरक्षित सिंचनास प्राधान्य द्यावे. विशेषतः फुलोरा, शेंगा/बोंडांची निर्मिती, दाणे भरणे किंवा फळवाढ यांसारख्या संवेदनशील अवस्थेत आवश्यकतेनुसार संरक्षित सिंचन दिल्यास पिकांना पाण्याच्या ताणापासून संरक्षण मिळण्यास मदत होते. ठिबक व तुषार सिंचनासारख्या कार्यक्षम सिंचन पद्धतींचा वापर करून उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त क्षेत्रासाठी कार्यक्षम वापर करावा..पावसाच्या खंडानंतर पडणारा पाऊस अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे पावसाचे पाणी शेताबाहेर वाहून न जाता शेतात जास्तीत जास्त मुरेल, यासाठी जलसंधारणाच्या उपाययोजना कराव्यात. विशेषतः कपाशी व तूर पिकांमध्ये जलसंधारणाच्या सऱ्या काढून पावसाचे पाणी अडवावे. उपलब्ध परिस्थितीनुसार सरी-वरंबा, कंटूर सऱ्या, बांधबंदिस्ती, शेततळे इत्यादी उपायांचा अवलंब करावा..पावसाच्या खंड काळात पिकांबरोबर तणेही जमिनीतील उपलब्ध पाणी व अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा करतात. त्यामुळे तण नियंत्रणाला विशेष महत्त्व आहे. पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार आवश्यकतेनुसार आंतरमशागत, खुरपणी किंवा शिफारशीनुसार तणनाशकांचा वापर करावा. तणांचे वेळीच नियंत्रण केल्यास उपलब्ध जमिनीतील ओलावा पिकांना अधिक काळ उपलब्ध राहण्यास मदत होते..पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार योग्य वेळी आंतरमशागत करावी. जमिनीच्या पृष्ठभागावर निर्माण झालेल्या भेगा बुजविल्यास बाष्पीभवनाद्वारे होणारा ओलाव्याचा ऱ्हास कमी होण्यास मदत होते. आंतरमशागत करताना पिकांच्या मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. जमिनीची परिस्थिती व पीक अवस्था लक्षात घेऊन योग्य वेळी कोळपणी किंवा इतर आंतरमशागतीची साधने वापरावीत..पावसाच्या खंड काळात पिकांवरील कीड व रोगांचे नियमित निरीक्षण करावे. शेतकऱ्यांनी आठवड्यातून किमान एकदा पिकांची पाहणी करून किडीची संख्या, रोगांची लक्षणे आणि प्रादुर्भावाची तीव्रता तपासावी. शक्य तेथे जैविक निविष्ठा, जैविक नियंत्रण, पक्षीथांबे, चिकट सापळे, फेरोमोन सापळे इत्यादींचा वापर करावा..पिकांच्या ओळींमध्ये उपलब्ध पीक अवशेष, कडबा, गवत किंवा इतर सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन केल्यास जमिनीच्या पृष्ठभागावरील बाष्पीभवन कमी होऊन ओलावा अधिक काळ टिकवून ठेवण्यास मदत होते. आच्छादनामुळे जमिनीचे तापमान नियंत्रित राहण्यास, तणांची वाढ कमी होण्यास आणि कालांतराने सेंद्रिय पदार्थ वाढण्यास मदत होते. त्यामुळे उपलब्धतेनुसार सेंद्रिय खते व जैविक निविष्ठांचा वापर करावा..पावसाच्या खंड काळात जमिनीतील ओलावा कमी असल्यामुळे मुळांद्वारे अन्नद्रव्यांचे शोषण कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत पिकाची वाढीची अवस्था, जमिनीतील उपलब्ध ओलावा आणि स्थानिक हवामान परिस्थिती विचारात घेऊन पिकांच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्यांची फवारणी करावी. आवश्यकतेनुसार पोटॅशिअम नायट्रेट (१ ते २ टक्के) किंवा ००:५०:३४ (१ टक्का) यांची फवारणी ८ ते १० दिवसांच्या अंतराने करण्याची शिफारस करता येते. यामुळे पिकांना पाण्याचा ताण सहन करण्यास मदत होऊ शकते. फवारणी करताना पिकाची अवस्था, उपलब्ध ओलावा आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन अन्नद्रव्यांची निवड, मात्रा व फवारणीची वेळ निश्चित करावी..Agriculture Management: पावसाच्या खंडामधील पीक व्यवस्थापनाचे नियोजन.पावसाच्या खंड काळात पिकांवर येणारा जैविक व अजैविक ताण कमी करण्यासाठी जैविक निविष्ठांचा वापर उपयुक्त ठरू शकतो. उपलब्धतेनुसार व शिफारशीनुसार बायो-एनपीके, बायोमिक्स, मायकोरायझा इत्यादींचा वापर करावा.तसेच शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत आणि इतर सेंद्रिय खतांचा वापर केल्यास जमिनीची भौतिक स्थिती, सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता व पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारण्यास मदत होते..पावसाच्या खंड काळाचा परिणाम केवळ पिकांवरच नव्हे तर पशुधनासाठी उपलब्ध होणाऱ्या हिरव्या चाऱ्यावरही होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपलब्ध पाणी व क्षेत्राचा विचार करून पशुधनासाठी चारा पिकांचे नियोजन करावे. शक्य असल्यास ज्वारी, मका, बाजरी, चारा गवत, बरसीम/लुसर्नसारखी योग्य हंगामी चारा पिके तसेच स्थानिक परिस्थितीस अनुरूप चारा पिकांची निवड करावी. चारा पिकांची निवड करताना पाण्याची उपलब्धता, लागवडीचा कालावधी आणि पशुधनाची संख्या विचारात घ्यावी. मुरघास तयार करावे..कडबा किंवा वाळलेल्या चाऱ्याचे योग्य आकारात कुट्टी केल्यास त्याचा अपव्यय कमी होऊन पशुधनाला चारा खाणे सुलभ होते. उपलब्ध हिरवा चारा, वाळलेला चारा आणि कडधान्यवर्गीय चारा यांचे संतुलित मिश्रण करावे. गरजेनुसार पशुवैद्यकीय/पशुपोषण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खनिज मिश्रण व आवश्यक पूरक खाद्य द्यावे. कमी पौष्टिक कडब्याची पौष्टिकता वाढविण्यासाठी युरिया प्रक्रिया किंवा इतर चारा प्रक्रिया पद्धती वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. चारा साठवताना तो पावसापासून सुरक्षित, कोरड्या व हवेशीर ठिकाणी साठवावा, जेणेकरून बुरशी वाढून चाऱ्याची गुणवत्ता कमी होणार नाही..पावसाचा खंड संपल्यानंतर होणारा पाऊस कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता असल्याने शेतात पाणी अडविण्याची क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे. शेतातील बांध मजबूत करणे, जलसंधारणाच्या सऱ्या, चर, शेततळे आणि इतर जलसंधारणाच्या रचना सुस्थितीत ठेवाव्यात. पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी जास्तीत जास्त जमिनीत मुरेल यासाठी योग्य नियोजन करावे..फळबाग व्यवस्थापनपावसाच्या खंड काळात फळबागेतील झाडांवर पाण्याचा ताण येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे झाडांचे व जमिनीतील ओलाव्याचे नियमित निरीक्षण करावे. फळबागेत उपलब्ध असल्यास ठिबक सिंचनास प्राधान्य द्यावे. झाडांच्या मुळांच्या कार्यक्षम क्षेत्रात आवश्यक तेवढेच पाणी द्यावे. उपलब्ध पाण्यानुसार सिंचनाचे नियोजन करून अनावश्यक पाणी वापर टाळावा..पावसाच्या खंड काळात शक्यतो सकाळी लवकर किंवा सायंकाळी सिंचन करावे. या वेळेत तापमान तुलनेने कमी असल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते. तीव्र उष्णतेच्या वेळी सिंचन टाळणे योग्य ठरते..झाडांच्या बुंध्याभोवती व मुळांच्या परिसरात सेंद्रिय आच्छादन करावे. यासाठी उपलब्ध पीक अवशेष, वाळलेले गवत, कडबा किंवा इतर सेंद्रिय पदार्थ वापरता येतात. आच्छादनामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास, जमिनीचे तापमान नियंत्रित राहण्यास आणि तणांची वाढ कमी होण्यास मदत होते. मात्र आच्छादन थेट झाडाच्या बुंध्याला चिकटून ठेवू नये, कारण त्यामुळे बुंध्याजवळ जास्त आर्द्रता निर्माण होऊन रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते..पावसातील खंडानंतर आर्द्रता व तापमानातील बदलांमुळे काही रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे फळझाडांची नियमित पाहणी करावी. सुकलेल्या, रोगग्रस्त फांद्या व पाने काढून नष्ट करावीत आणि बागेत स्वच्छता ठेवावी. बोर्डो पेस्टचा वापर विशेषतः छाटणीच्या जखमा, खोडावरील जखमा किंवा संबंधित बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव असलेल्या भागावर संबंधित फळपिकासाठी शिफारशीत पद्धतीने करावा..पाण्याचा ताण असताना जास्त प्रमाणात रासायनिक खते जमिनीत देणे टाळावे. झाडांची अवस्था, उपलब्ध ओलावा आणि अपेक्षित उत्पादन लक्षात घेऊन अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. आवश्यकतेनुसार आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने पर्णीय अन्नद्रव्य फवारणी करता येते. मात्र पाण्याचा तीव्र ताण असताना किंवा अतिउष्णतेच्या परिस्थितीत फवारणी न करता योग्य वेळ निवडावी.- डॉ. आनंद गोरे ९५८८६४८२४२(अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.