New Delhi News: भारत- अमेरिकेदरम्यान झालेल्या अंतरिम व्यापार करारावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले. रविवारी (ता. १५) ‘एक्स’ या समाजमाध्यमावर त्यांनी या कराराच्या अनुषंगाने मोदी यांना प्रश्न विचारले. तसेच या कराराच्या नावाखाली ‘आपण भारतीय शेतकऱ्यांचा विश्वासघात अनुभवतो आहोत’, अशा शब्दांत त्यांनी मोदी यांच्यावर हल्लाबोल केला..हा करार अस्तित्वात आल्यापासून गांधी केंद्र सरकारवर शरसंधान साधत आहेत. तसेच या करारातून मोदी यांनी देश विक्रीला काढल्याच्या आरोपांचा पुनरुच्चार करत आहेत. हा विषय देशाच्या भवितव्याशी संबंधित असल्याचे सांगत या कराराद्वारे दुसऱ्या देशाला भारताच्या कृषी क्षेत्रावर दीर्घकालीन नियंत्रण प्रस्थापित करण्यास केंद्र सरकार परवानगी देत आहे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला..पंतप्रधान मोदी यांना प्रश्न विचारत गांधी म्हणाले, की डीडीजीएस आयात करण्याचा वास्तवातील अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे का, की भारतीय पशुधनाला अमेरिकन जीएम मक्यापासून बनलेले ‘डिस्टिलर्स ग्रेन्स’ खाऊ घालण्यात येतील. यातून आपली दुग्धजन्य उत्पादने अमेरिकन शेतीउद्योगावर अवलंबून राहणार नाहीत काय?.India US Trade Deal: एकतर्फी करारात कसले शेतकरी हित?.सोयाबीन आयातीसंदर्भात प्रश्न विचारताना गांधी म्हणाले, की जर भारताने जीएम सोयातेल आयातीला परवानगी दिली तर त्याचे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि देशाच्या इतर भागांतील सोयाबीन उत्पादकांवर काय परिणाम होतील? हे शेतकरी दराबाबतचा आणखी एक धक्का कसा सहन करू शकतील?.तसेच जेव्हा तुम्ही ‘अधिक उत्पादने’ असा शब्दप्रयोग करता, तेव्हा कालांतराने भारताचे डाळ आणि इतर पिकांचे क्षेत्रदेखील अमेरिकन उत्पादनांच्या आयातीसाठी खुले करण्याचा दबाव आपल्यावर आहे काय, असा प्रश्नही त्यांनी मोदी यांना विचारला..भारतीय शेती जीएम पिकांसाठी खुली करण्याबाबतचा पवित्रा सरकारने घेतला असावा, असे अप्रत्यक्षरीत्या सूचित करत गांधी यांनी विचारले, की ‘व्यापारबाह्य अडथळे’ काढणे याचा अर्थ काय? भविष्यात जीएम पिकांबाबतचे भारताचे धोरण सैल करण्याचा, पुरवठा साखळी कमकुवत करण्याचा अथवा हमीभाव आणि अंशदाने कमी करण्याचा दबाव आहे काय? या कराराविषयी चिंता व्यक्त करताना गांधी म्हणाले, की एकदा दरवाजा किलकिला केला, तर त्याला वर्षागणिक आणखी उघडा होण्यापासून रोखणे अवघड होईल. ही परिस्थिती निर्माण होण्यास भारताकडून प्रतिबंध केला जाईल, की प्रत्येक वेळी हळूहळू आणखी पिके कराराचा भाग बनत जातील, असे विचारत शेतकऱ्यांना यासंदर्भात स्पष्टता मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी केंद्र सरकारकडून व्यक्त केली..India US Trade Deal: व्यापार करार - काही प्रश्न.शनिवारी गांधी यांनी ‘एक्स’वरच केंद्र सरकार कापूस उत्पादक व कापड निर्यातदारांना फसवत असल्याचा आरोप केला होता. या पोस्टमध्ये ते म्हणाले, की बांगलादेशाला कापड आणि तयार कपडे निर्यात करण्यासाठी अमेरिकेत शून्य टक्का आयात शुल्काचा लाभ दिला जात आहे, तर भारताच्या निर्यातीवर १८ टक्के आयात शुल्क लावले जात आहे. संसदेत हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा हाच फायदा भारताला हवा असेल, तर बांगलादेशप्रमाणे आम्हालाही अमेरिकेकडून कापूस आयात करावा लागेल, असे मोदी सरकारच्या मंत्र्यांचे उत्तर आले. आम्ही अमेरिकेतून कापूस मागवला तर आमचे शेतकरी उद्ध्वस्त होतील आणि नाही मागवला तर आमचा वस्त्रोद्योग उध्वस्त होईल. हा खरोखरच पर्याय आहे काय, असा सवाल त्यांनी केला..मोदींसाठी राहुल यांचे पाच प्रश्नभारतीय दुग्धजन्य उत्पादने अमेरिकन शेती उद्योगावर अवलंबून राहणार काय?जीएम सोयातेल आयातीमुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांतील शेतकऱ्यांचे काय होणार?डाळी आणि अन्य पिके अमेरिकन आयातीसाठी खुली करणार काय?हमीभाव कमी करण्यासाठी, पुरवठा साखळी कमकुवत करण्यासाठी आणि जीएम पिकांबाबतचे धोरण सैल करण्यासाठी दबाव आहे काय?अमेरिकन कृषिजन्य उत्पादनांसाठी भारताने खुला केलेला दरवाजा उत्तरोत्तर आणखी उघडला जाणार काय?.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.