पुणे : ''सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) भारतीयांना भूकबळीपासून वाचवावे. 'बीटी' बियाण्यांचा (BT Seed) वापर करण्याची परवानगी द्यावी. भारतात सर्व राजकीय पक्ष यांच्यासह पर्यावरणवादी (Environment) यांचे लागेबांधे आहेत. त्यामुळेच 'बीटी' बियाण्यांच्या वापराला विरोध केला जात आहे. हा विषय अतिशय गंभीर असून, यावर वेळीच निर्णय घेतला पाहिजे. अन्यथा भारताची अन्नसुरक्षा (Food Security) धोक्यात येईल'', असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत रघुनाथदादा पाटील बोलत होते. ते म्हणाले, '''बीटी' बियाण्यांचा वापर जगभरात केला जात आहे. यातून उत्पन्नही जास्त आहे. मात्र, याला भारतातून विरोध केला जात आहे. याला सरकार, सर्वच राजकीय पक्ष तसेच पर्यावरणवाद्यांकडून विरोध सुरु आहे. पण या बियाण्यांच्या वापरामुळे देशाला काहीही धोका नाही. 'बीटी' बियाण्यांच्या वापरावर वेळीच निर्णय घेतला नाहीतर देशात अन्नधान्य टंचाई निर्माण होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. त्याला सरकार, विरोधी पक्ष, पर्यावरणवादी हे सर्व जबाबदार असतील. यासंबंधित तज्ञांनी अभ्यास करावा म्हणजे यातील सत्यता लक्षात येईल''.
तसेच अन्न काही कारखान्यात तयार होत नाही. म्हणून त्यावर गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. 'बीटी' बियाण्यांचा देशाला काहीही धोका नाही. अन्नधान्याबाबत देश अडचणीत आणू नका. झाला तेवढा खेळ पुरा झाला. अशाने देशातील 140 कोटी लोकांचे पोट भरणार नाही. आत्तापर्यंत 23 वर्षे या प्रकरणाच्या निकालाला वेळ लागला. यावर सर्वोच्च न्यायालयाने लवकर निर्णय द्यावा, अशी अपेक्षाही रघुनाथदादांनी व्यक्त केली.
नोबेल पुरस्कार विजेत्याच्या प्रश्नाला अद्याप उत्तर नाही
'बीटी' बियाण्यांच्या वापराबाबत नोबेल पुरस्कार विजेते प्रा. सर रिचर्ड जे. रॉबर्ट्स यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर अद्याप उत्तर दिले गेले नाही. तसेच ज्यांना याबाबत ज्ञान नाही त्यांनी बोलू नये. याचा अत्यंत वाईट पद्धतीने प्रचार केला गेला. त्यामुळे आता हा मुद्दा उपस्थित होतो, शास्त्रज्ञाचे ऐकायचे की ज्यांना शेतीमधील काही कळत नाही, असेही रघुनाथदादा पाटील म्हणाले.
कृषीमंत्री तासातासाला बदलतात
'बीटी' बियाण्यांच्या मुद्द्याबाबत राज्याचे कृषीमंत्री यांची भेट घेतली का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले, ''राज्याचे कृषीमंत्री तासातासाला बदलत आहेत'', असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.