अनिल जाधवKharif Pulses Production: देशातील बाजारात कडधान्याची आवक कमी सध्या कमी आहे. पण जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे खरिपातील कडधान्याच्या भावात नरमाई पाहायला मिळाली. हवामान विभागाचा अंदाज पाहता पुढील काळात उत्पादनाविषयी चिंता निर्माण होऊ शकते. पण बाजारावर सध्याची पावसाची परिस्थिती, लागवड, देशात उपलब्ध कडधान्याचा सध्याचा साठा, सरकारकडील बफर साठा, आयातीला पूरक धोरण आणि हरभरा वगळता इतर कडधान्याची सुस्त मागणीचा परिणाम दिसत आहे. .‘एल निनो’मुळे कमी उत्पादकतेच्या शक्यतेमुळे सोयाबीन, कापूस, मका, साखर, गहू, तांदूळ या शेतीमालाच्या भावात वाढ दिसून आली. मात्र उडीद आणि हरभरा वगळता इतर कडधान्याच्या भावात अपेक्षित सुधारणा झाली नाही. त्यातही तूर आणि मुगाचे भाव आजही हमीभावाच्या खालीच आहेत..Pulses Price Hike: डिझेल दरवाढीने डाळींचे दर कडाडले.कडधान्याच्या भावावर दबाव राहण्यामागे प्रामुख्याने सध्या तीन कारणांची चर्चा बाजारात आहे. पहिले म्हणजे माॅन्सूनच्या पावसात बहुतांशी भागात झालेली सुधारणा, सरकारकडील कडधान्याचा साठा आणि सुस्त मागणी. यामध्ये तुरीच्या बाजारावर आयात मालाचा विशेष दबाव दिसत आहे. तुरीचे उत्पादन गेल्या खरिपातही कमीच राहिले होते. मात्र तुरीची आयात आणि सरकारकडील साठ्याचा परिणाम बाजारावर दिसत आहे. मुगाचे उत्पादन मात्र वाढले आहे. २०२५ मध्ये देशात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे उन्हाळी हंगामात मुगाचे उत्पादन वाढले होते. मुगाचे उत्पादन खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामातही झाले. खरीप आणि रब्बीपेक्षाही उन्हाळी हंगामातील मुगाचे उत्पादन विक्रमी राहिले. उन्हाळी हंगामात मुगाचे तब्बल २४ लाख टन उत्पादन झाले होते. मुगाचे उत्पादन एवढ्या प्रमाणात कोणत्याच हंगामात झाले नाही. देशात हरभरा, मूग, मसूरचे उत्पादन वाढल्याने एकूण कडधान्य उत्पादन ६.७ टक्क्यांनी वाढून विक्रमी २७४ लाख टनांवर पोपोचले होते. उत्पादन वाढल्याने देशात भाव कमी झाले होते. त्यामुळे आयात कमी होऊन ६० लाख टनांवर स्थिरावली..यंदा देशात कमी पाऊस आणि कमी उत्पादनाचे संकेत असले तरी सध्या बाजारात हरभरा आणि उडीद वगळता इतर कडधान्याला विशेष उठाव नसल्याचे उद्योगांकडून सांगण्यात येत आहे. याचा परिणाम तूर आणि मुगाच्या भावावर दिसत आहे. मुगाचे भाव कमी झाल्यामुळे मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी हमीभावाने खरेदीसाठी आंदोलन केले होते. जुलै महिन्यात आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्याने खरिपातील कडधान्य उत्पादनाची आशा वाढली आहे. याचाही परिणाम बाजारावर दिसत आहे. उडदाच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये ४०० रुपयांपर्यंत नरमाई पाहायला मिळाली. तरीही उडीद सध्या हमीभावाच्या पुढेच विकला जात आहे..तूर हमीभावाच्या खालीतुरीचे उत्पादन गेल्या खरिपात ३६ लाख टनांच्या दरम्यान झाले होते. पण तुरीची आयात वाढल्याने देशात पुरवठा वाढण्यास मदत झाली. मुक्त तूर आयातीचे धोरण सरकारने कायम ठेवले आहे. चालू हंगामात गेल्या वर्षीपेक्षा आयात कमी दिसत असली तरी त्याचे मुख्य कारण देशातील कमी झालेले भाव आहे. देशात तुरीच्या बाजारात चालू हंगामात अद्याप तेजी दिसली नाही. भाव हमीभावाच्याही खाली आहेत. कमी उत्पादन आणि कमी आयात असूनही तेजी नसल्यामुळे अभ्यासकही बुचकळ्यात पडले आहेत. सरकारकडील साठ्याचा परिणाम भावावर होत असल्याचे काही अभ्यासकांचे मत आहे. .सरकारने चालू हंगामात साडेपाच लाख टनांच्या आसपास तुरीची खरेदी केली. सरकारकडे सध्या सात ते आठ लाख टनांच्या दरम्यान तुरीचा साठा आहे. तसेच खरीप लागवडीच्या सुरुवातीच्या काळात कमी पाऊस असल्याने उत्पादनाविषयी बाजारात चिंता व्यक्त केली जात होती. पण जुलैमध्ये झालेल्या पावसाने तूर लागवडीतील पिछाडी बऱ्यापैकी कमी केली. जुलैच्या शेवटपर्यंत तूर लागवड १० टक्क्यांनी कमी दिसत आहे. पण आज किंवा उद्या येणाऱ्या अहवालात ही पछाडी आणखी कमी होण्याची शक्यता दिसत आहे. पुढील काळातील पाऊस आणि हवामानाची स्थिती पाहता उत्पादन कमीच राहण्याची दाट शक्यता आहे. .पण बाजारावर सध्याच्या परिस्थितीचा परिणाम दिसत असल्याचे अभ्यासकांनी सांगितले. यात सरकारकडील साठ्याचा प्रभाव जास्त आहे. भारताला तूर निर्यात करणाऱ्या आफ्रिका आणि म्यानमारवरही एल निनोचा परिणाम होत आहे. त्यामुळे या देशांमधून आयात कमी होण्याचे संकेत सध्या तरी मिळत आहेत. पण आयात कमी झाली तरी सरकारकडील साठा जास्त आहे. तसेच मुक्त आयात धोरण कायम आहे. याचा मानसिक परिणाम बाजारावर दिसत आहे..Pulses Import Reduction: कडधान्य आयातीत १८ टक्क्यांनी घट.ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत पाऊस आणि तापमान कसे राहते, त्यानंतर पुढील दोन महिन्यातील वातावरणाचा परिणाम पिकावर कसा होतो, हेही महत्त्वाचे आहे. हवामान विभागाच्या सध्याच्या अंदाजानुसार पुढे परिस्थिती पिकाला पोषक नसण्याची शक्यता दाट आहे. पुढे जसजसे देशातील उत्पादनाचे चित्र स्पष्ट होईल तसे बाजारावर परिणाम दिसतील. तरीही तूर उत्पादकांना यंदा हमीभावाचा आधार असणार आहे. सरकारने यंदा तुरीचा हमीभाव ४५० रुपयांनी वाढवून ८ हजार ४५० रुपये केला आहे. सरकारही भविष्यातील स्थिती पाहता खरेदी वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे हमीभावाचा मजबूत आधार बाजाराला राहणार आहे. तूर उत्पादक आताच ई-समृद्धी पोर्टलवर नोंदणी करून माल हाती आल्यानंतर बाजारात कमी भाव असल्यास आपली सर्व तूर हमीभावाने सरकारला विकू शकतात. पण विकण्याचे बंधन नाही. बाजारात जास्त भाव असेल तर शेतकरी व्यापाऱ्यांना माल विकू शकतात..हरभरा सुधारण्याचे संकेतदेशातील कडधान्य पुरवठ्याची मदार हरभऱ्यावर असते. हंगाम २०२५-२६ देशातील एकूण कडधान्य उत्पादनात हरभऱ्याचा वाटा ४५ टक्के होता. हरभरा बाजारातील चढ- उताराचा इतरही कडधान्यांच्या भावावर अप्रत्यक्षरीत्या परिणाम होत असतो. हरभरा मागील काही दिवसांपासून वाढलेल्या भावाच्या आसपास स्थिर दिसत आहे. गेल्या हंगामात हरभरा उत्पादन विक्रमी झाले तरी सध्या बाजारातील आवक कमी झालेली आहे. हरभऱ्याला मागणी चांगली आहे. सरकार पुढील काळातील टंचाई लक्षात घेऊन सध्या हरभरा विक्री खूपच कमी करत आहे. यामुळे बाजारात भाव टिकून राहण्यास मदत मिळत आहे..हरभरा भावात मागील तीन महिन्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात का होईन वाढ दिसून आली आहे. देशातील बाजारात जून महिन्यात हरभऱ्याचा सरासरी भाव सहा हजार होता. जुलै महिन्यात सरासरी बाजारभावात २०० रुपयांची वाढ होऊन ६२०० रुपये झाला. आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ६४०० रुपये भाव झाला आहे. राज्यातील बाजारातही हरभरा हमीभावाच्या पुढे सरकला आहे. सरासरी सहा हजारांच्या आसपास भाव आहे. राज्य आणि देशातील सरासरी भावात तफावत आवकेमुळे आहे. आवक तुलनेत अधिक राहत असल्याने भाव देशाच्या सरासरीपेक्षा कमी आहे. पुढे सणांमुळे हरभऱ्याची मागणी वाढणार आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योग खरेदी वाढवत आहेत. चालू महिन्यात मागणी आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. सरकारने स्टाॅकमधील हरभरा बाहेर काढला नाही तर भावात आणखी २०० रुपयांपर्यंत सुधारणा अपेक्षित आहे. पण दीर्घकाळातील हरभरा बाजाराचे भविष्य रब्बीतील उत्पादन आणि आयातीवर अवलंबून आहे..रब्बी पिकांसाठी यंदा परिस्थिती बिकट राहण्याची चिन्हे आहेत. एल निनोची तीव्रता वाढत असल्याने पावसावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात देशात कमी पावसाचा अंदाज आहे. यामुळे रब्बी पिकांना कमी पाऊस, सिंचनाची टंचाई आणि वाढत्या उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. सरकारही ही शक्यता लक्षात घेऊन स्टाॅकमधील हरभरा विक्री सध्या कमी करण्याचे धोरण राबवत आहे. एका मर्यादेपलीकडे भाव वाढल्यानंतर सरकार बाजारात हस्तक्षेप करेल, अशी उद्योगांमध्ये चर्चा आहे. सरकारकडे सध्या सुमारे २० लाख टन हरभरा साठा आहे. हा हरभरा यंदाच्या हंगामात खरेदी केलेला आहे..आयातीबाबतही सध्या निश्चित अंदाज येत नाही. मागील हंगामात आयात निम्म्याने कमी झाली होती. देशातील वाढलेले उत्पादन आणि आधीच्या वर्षी झालेली विक्रमी आयात यामुळे देशात भाव कमी होते. याचा परिणाम आयातीवर झाला होता. भारताच्या एकूण हरभरा आयातीत ऑस्ट्रेलियाचा वाटा ७० टक्क्यांपर्यंत असतो. टांझानियातूनही आयात होते. पण या देशांवरही ‘एल निनो’चा परिणाम दिसत आहे. ऑस्ट्रेलियात लागवडीच्या काळात पाऊस झाल्याने लागवड काही प्रमाणात वाढली. यामुळे उत्पादन १२ ते १५ लाख टनांच्या दरम्यान राहण्याची शक्यता येथील सरकारी संस्थेने व्यक्त केली आहे. .तरीही उत्पादन मागील वर्षीच्या २२ लाख टनांपेक्षा कमी राहणार आहे. ऑस्ट्रेलियात उत्पादन घटल्यास आंतरराष्ट्रीय बाजारातच पुरवठा कमी होऊन भावात सुधारणा होऊ शकते. त्यामुळे भारत सरकार आयात शुल्क कमी करू शकते, असा अंदाज उद्योग आणि व्यापारी विश्वातून व्यक्त केला जात आहे. बाजारात सध्या या शक्यतांच्या आधारावर हरभऱ्याचे व्यवहार होत आहेत. हरभरा बाजाराची दीर्घकालीन दिशा नव्या हंगामातील पिकाचा अंदाज स्पष्ट झाल्यानंतर ठरणार आहे. त्यासाठी सप्टेंबरमधील पावसाचे प्रमाण कसे राहते, हा घटक महत्त्वाचा असेल.(लेखक ॲग्रोवन डिजिटलचे कंटेन्ट लीड आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.