बी. जी. म्हस्के, डॉ. एन. एम. मस्केAgri Business: फुले ही अत्यंत नाजूक असल्याने त्यांचे आयुष्य खूपच कमी असते. त्यामुळे काढणीनंतर त्यांची त्वरित विक्री करणे आवश्यक असते. वेळेत बाजारपेठेत न पोहोचल्यास फुले वाया जातात. त्यासाठी फुलांचे मूल्यवर्धन करून सेंद्रिय, पर्यावरणपूरक उत्पादनांची निर्मिती केल्यास आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरते. फुलांपासून अत्तर, तेल, नैसर्गिक रंग, गुलकंद, सुगंधी पाणी, फुलांचा चहा आणि जैविक खते अशी अनेक उत्पादन तयार करता येतात..विविध फुलांचा उपयोग पूजाअर्चा, सजावट किंवा सण-उत्सवांमध्ये केला जातो. या काळात फुलांना चांगले बाजारमूल्य मिळते. फुलांमधील विविध गुणांमुळे त्यांचे औद्योगिक आणि व्यापारी महत्त्व देखील झपाट्याने वाढत आहे. फुलांवर आधारित प्रक्रिया उद्योग हा शेती, उद्योग आणि निर्यात या तिन्ही क्षेत्रांना जोडणारा व्यवसाय होत आहे. ताज्या फुलांवर प्रक्रिया करून विविध प्रकारची मूल्यवर्धित उत्पादने तयार केली जातात..जसे की सुकवलेली फुले, अत्तर, फुलांचे तेल, नैसर्गिक रंग, गुलकंद, सुगंधी पाणी, फुलांचा चहा आणि जैविक खते अशी अनेक उत्पादन तयार केली जातात. या माध्यमातून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळण्यास मदत होते. याशिवाय रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतात. जागतिक बाजारपेठेत सेंद्रिय, नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक उत्पादनांची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने फुलांच्या प्रक्रिया उद्योगाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतासारख्या फुलांच्या उत्पादनक्षम देशात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि निर्यात संधी उपलब्ध आहेत..Flower Farming: फुलशेतीतील मूल्यवर्धनातून कुटुंबाला आर्थिक सक्षमता .मूल्यवर्धित उत्पादने सुकवलेली फुलेसुकवलेल्या फुलांचा वापर प्रामुख्याने सजावट, ग्रीटिंग कार्ड, बुकमार्क, हस्तकलेच्या वस्तू आणि भेटवस्तू निर्मिती करण्यासाठी होतो. ही उत्पादने दीर्घकाळ टिकत असून जागतिक बाजारपेठेतही या उत्पादनांना चांगली मागणी आहे. हा कमी भांडवलात सुरू करता येणारा घरगुती व्यवसाय असून या माध्यमातून महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध होतात..अत्तर आणि सुगंधी तेल निर्मिती गुलाब, मोगरा, लव्हेंडर, चंपा अशा सुगंधी फुलांपासून नैसर्गिक अत्तर व सुगंधी तेल तयार केले जाते. यांचा उपयोग विविध परफ्युम, साबण, अरोमाथेरपी आणि कॉस्मेटिक उद्योगांमध्ये केला जातो. जागतिक बाजारपेठेमध्ये नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या अत्तरांना चांगली मागणी आहे..नैसर्गिक रंग निर्मिती झेंडू, गुलाब, शेवंती, हिबिस्कस इत्यादी फुलांपासून नैसर्गिक रंग तयार करता येतात. हे रंग कपडे, खाद्यपदार्थ आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरले जातात. रासायनिक रंगांना पर्यावरणपूरक पर्याय म्हणून या फुलांपासून तयार केलेल्या नैसर्गिक रंगाना दिवसेंदिवस मागणी वाढते आहे..Flower Farming Success : अभ्यासपूर्ण गुलाबशेतीतून आर्थिक स्थैर्य, समाधानही .फुलांपासून खाद्यपदार्थ विविध फुलांपासून अनेक मूल्यवर्धित खाद्यपदार्थ तयार केले जातात. यात गुलकंद, सिरप, जॅम, हर्बल चहा आणि विविध पेये तयार केली जातात. हे पदार्थ आयुर्वेदिक आणि आरोग्यदायी असल्याने त्यांना चांगली मागणी असते. आरोग्यासाठी जागृत असलेल्या लोकांकडून या उत्पादनांचे नियमित सेवन केले जाते. त्यामुळे या उत्पादनांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढते आहे..फुलांचा चहा फुलांचा चहा म्हणजे वाळवलेल्या फुलांपासून तयार केलेला हर्बल पेय प्रकार आहे. हा चहा कॅफेन-फ्री असून आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. गुलाब चहा, हिबिस्कस चहा, जाई चहा, कॅमोमाइल चहा, लव्हेंडर चहा असे विविध चहाचे प्रकार फुलांपासून तयार केले जातात. घरगुती पातळीवर हा चहा तयार करून स्थानिक बाजारात त्याची विक्री करता येते. .सौंदर्यप्रसाधने आणि हर्बल उत्पादने विविध फुलांच्या अर्काचा वापर करून चेहऱ्यावर लावल्या जाणाऱ्या फेसक्रीम, साबण, लोशन आणि परफ्युम निर्मिती केली जाते. नैसर्गिक आणि रसायनमुक्त उत्पादने अशी त्यांची ओळख असते. त्यामुळे फुलांच्या अर्काचा वापर करून तयार केलेल्या सौंदर्यप्रसाधनांना बाजारात मागणी वाढते आहे. त्वचेसाठी वापरली जाणारी सौंदर्यप्रसाधने जसे की गुलाबजल, फेस पॅक आणि फेस क्रीम, फुलांच्या अर्काचे साबण, बॉडी लोशन तसेच केसांच्या आरोग्यासाठी हिबिस्कस तेल आणि शाम्पू, लव्हेंडर आणि जाई युक्त केस तेल, सुगंधी नैसर्गिक अत्तर, सुगंधी तेल, हर्बल डिओडोरंट आणि स्प्रे आदी उत्पादनांच्या निर्मितीमध्ये फुलांच्या अर्काचा वापर होतो. बी. जी. म्हस्के ९०९६९६१८०१ (एम. जी. एम. नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, गांधेली, जि. छत्रपती संभाजीनगर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.