Silk Farming Mangement: शेतकरी नियोजन । रेशीमशेतीशेतकरी : गणेश शहादेव जायभायेगाव: दुनगाव, ता. अंबड, जि. जालना. एकूण शेती: ८ एकर तुती क्षेत्र: अडीच एकर.जालना जिल्ह्यातील दुनगाव (ता. अंबड) येथील युवा शेतकरी गणेश शहादेव जायभाये हे २०२१ पासून रेशीम उद्योगाकडे वळले आहेत. कुटुंबाच्या ८ एकर शेतीपैकी २ एकरावर त्यांनी तुती लागवड केली आहे. आगामी काळात आणखी दोन एकरावर तुती लागवडीचे त्यांचे नियोजन आहे. पारंपरिक पिकांपेक्षा कमी खर्चात अधिक उत्पन्न रेशीम शेतीतून मिळत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. असे गणेश सांगतात..गणेश जायभाये यांचे वडील शहादेव एकनाथ जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश रेशीमशेती करतात. गणेश यांच्या आई मीरा जायभाये यांच्याकडे महिला मजुरांची उपलब्धता, तुती बागेतील कामे आणि शेडमधील कामांचे नियोजन असते. त्यांचा लहान भाऊ पुण्यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. तोही सुट्टीच्या दिवशी कामांमध्ये मदत करतो..Silk Farming: रेशमी धाग्यांनी विणला अल्पभूधारक कुटुंबाचा संसार.शेड उभारणीरेशीम कोष उत्पादनासाठी ३०० अंडीपुंज क्षमतेचे शेड २०२१ मध्ये उभारले आहे. या शेडचे आकारमान ६० बाय २२ फूट इतके आहे. त्यात दोन्ही बाजूला ५० फुटांचे दोन रॅक आहेत. एका रॅकवर ५ कप्पे आहेत. त्यानुसार अंडीपुंजांचे विभाजन करून बॅच घेतली जाते. आगामी काळात रेशीम उद्योगात वाढ करण्यासाठी शेडचे आकारमान वाढविण्याचे नियोजन आहे. त्यानुसार एकाच वेळी ४०० अंडीपुंजांची बॅच घेणे शक्य होईल, असे नियोजन केले जाईल..तुती लागवडव्यवसायाच्या सुरुवातीला दोन एकरावर तुती लागवड करण्यात आली. पुढे अर्धा एकर आणखी वाढविली. त्यातून अपेक्षित उत्पन्न येऊ लागले. सुरुवातीला पुरेशी माहिती नसल्यामुळे काही क्षेत्रावर तुती लागवड केली. आता अनुभव गाठीशी आल्याने क्षेत्रात वाढ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. येत्या जानेवारीत आणखी दीड ते दोन एकर क्षेत्र वाढवून साधारण चार एकरांत तुती लागवडीचे त्यांचे नियोजन आहे. असे गणेश सांगतात..बॅच नियोजनएका वर्षात रेशीम उत्पादनाच्या साधारणतः सात बॅच पूर्ण होतात. दोन बॅचमध्ये साधारण ८ ते १० दिवसांचे अंतर राखले जाते. वर्षभरात साधारण ७ बॅच घेतल्या जातात.बॅच नियोजनानुसार चॉकी सेंटरमध्ये चॉकीची आगाऊ मागणी नोंदणी केली जाते. बॅच सुरू करण्याच्या दिवशी चॉकीची उपलब्धता केली जाते. साधारण दोन मोल्ट सेट झालेली चॉकी उपलब्ध करण्यावर भर दिला जातो..प्रत्येक बॅचच्या नियोजनानुसार रेशीम अळ्यांना दर्जेदार तुती पाला उपलब्ध करण्यावर भर दिला जातो. त्यानुसार तुती बागेत कामांचे नियोजन केले जाते.तुती बागेची छाटणी केल्यानंतर साधारण ४० ते ४५ दिवसांत पाला कापणीस येतो. शेडवर बॅच आल्या ते पूर्ण होईपर्यंत दर्जेदार पाला उपलब्ध केला जातो.उन्हाळ्यात शेडमध्ये वातावरण थंड राहण्यासाठी शेडच्या बाजूने झाडांची लागवड करण्यात आली आहे..Silk Farming: रेशीम उद्योगाने दिले आर्थिक स्थैर्य.ऋतुनिहाय बदलसंगोपनगृहात ऋतुनिहाय अपेक्षित बदल केले जातात. प्रत्येक हंगामात रेशीम अळ्यांना योग्य वातावरण निर्मिती करण्यासाठी उपाय केले जातात. त्यानुसार उन्हाळ्यात तापमान कमी राखण्यासाठी प्रयत्न केले जातात. तर हिवाळ्यात उष्णता निर्माण केली जाते. यामुळे रेशीम अळ्यांना कोष निर्मिती करणे अधिक सोयीचे होते. या माध्यमातून दर्जेदार कोष निर्मिती होऊन अधिक उत्पन्न होती येते..विक्री नियोजनउत्पादित रेशीम कोषाची विक्री करण्यासाठी जालना, बीड आणि पूर्णा या ठिकाणची मार्केट जवळ आहेत. सद्यःस्थितीत बीड मार्केटमध्ये विक्री करण्याचा कल अधिक आहे. तेथे कोषाच्या गुणवत्ता आणि दर्जानुसार अपेक्षित दर मिळत असल्याचा त्यांचा अनुभव आहे..मागील कामकाजमागील बॅच संपल्यानंतर शेडची स्वच्छता, निर्जंतुकीकरण करण्यात आले. त्यासाठी शिफारशीत घटकांचा वापर केला.नवीन बॅच नियोजनानुसार मागील महिन्यात २० ऑक्टोबरला चॉकी सेंटरमध्ये चॉकीची मागणी नोंदविली होती. साधारणपणे १५० अंडीपुंजाची मागणी नोंदविण्यात आली.सर्व पूर्वतयारी झाल्यानंतर साधारण १० नोव्हेंबरला चॉकी शेडवर आणली. यातील दोन मोल्ट आधीच चॉकी सेटवर पास झाले होते..चॉकी शेडवर आणल्यानंतर सात दिवसांच्या कालावधीत दिवसातून दोन वेळा दर्जेदार तुती पाला अळ्यांना देण्यात आला. या काळात तिसरा मोल्ट पास होण्यासाठी पाल्याची नियमित मात्रा दिली.मागील काही दिवसांपासून तापमानात चांगलीच घट झाली आहे. त्याचा रेशीम अळ्यांच्या कोष निर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यासाठी उपाययोजना करून शेडमधील तापमान नियंत्रित करण्यावर भर दिला. त्यासाठी बेडवर ताडपत्रीसारख्या पातळ कापडाचा वापर करण्यात आला. त्यामुळे थंडीपासून अळ्यांचे संरक्षण होण्यास मदत मिळाली..आगामी नियोजनपुढील दोन दिवसांत तिसरा मोल्ट पास होईल. तेथून पुढील चौथा मोल्ट बसल्यानंतर सलग पाला दिला जाईल.शेडमध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी विजेचे बल्ब लावले जातील. या माध्यमातून शेडमध्ये साधारणपणे २६ ते २७ अंश सेल्सिअसपर्यंत नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जाईल.या महिन्याच्या अखेरपर्यंत चंद्रिका टाकल्या जातील. त्यानंतर सहाव्या दिवशी कोष वेचणीस सुरुवात होईल..या बॅचमधील काढणी पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. संपूर्ण काढणी एकाच दिवशी पूर्ण केली जाईल.उत्पादित कोषाची विक्री बीड येथील रेशीम मार्केटमध्ये केली जाईल. १५० अंडीपुजांच्या बॅचमधून सरासरी १३० किलो उत्पादन मिळणे अपेक्षित आहे..दर्जेदार पाला व स्वच्छतेवर भररेशीम उत्पादनामध्ये दर्जेदार तुती पाल्याची उपलब्धता हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कारण रेशीम कीटकांना पुरेशा प्रमाणात दर्जेदार पाल्याची उपलब्धता झाली तरच दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण रेशीम उत्पादन मिळण्यास मदत मिळते. तुती बागेत जैविक खतांच्या वापरावर भर दिला जातो. त्यामुळे दर्जेदार तुती पाला उपलब्ध होण्यास मदत मिळते.रेशीम कीटक संगोपनगृहात रेशीम अळ्यांचे संगोपन करताना स्वच्छतेवर अधिक भर दिला जातो. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. शेड स्वच्छता हा रेशीम उद्योगातील महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी वेळोवेळी चुना पावडर, ब्लिचिंग पावडर तसेच रेशीम अळ्यांसाठी उपयुक्त शिफारशीत पावडरचा वापर करून रोगांचा प्रादुर्भाव टाळला जातो. त्यामुळे अळ्या दर्जेदार रेशीम कोष उत्पादन करतात.- गणेश जायभाये ९९२१३३९४९१ (शब्दांकन : संतोष मुंढे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.