डॉ. सुयोग खोसे, डॉ. मधुकर मोरेSoil Conservation: पावसाळ्यापूर्वी मृदा आणि जलसंधारणाच्या कामांची तांत्रिक निगा हीच ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेची खरी ताकद आहे. गाळ उपसा, दुरुस्ती, स्वच्छता आणि सुरक्षितता यांसारख्या उपाययोजना वेळेत केल्यास या उपचार पद्धतींची कार्यक्षमता दीर्घकाळ टिकते आणि त्यांचे आयुष्य लक्षणीयरीत्या वाढते. ज्यामुळे मृद् व जलसंधारण होते आणि भूजल पुनर्भरण वाढून पिकांची उत्पादकता वाढते..महाराष्ट्रातील शेतीची रचना पाहिली, तर सुमारे ८० टक्के क्षेत्र पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचे शाश्वत व्यवस्थापन करणे ही केवळ गरज नसून शेतीच्या अस्तित्वाची हमी आहे. राज्यात ‘जलयुक्त शिवार २.०’ सारख्या उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर मृद् व जलसंधारणाच्या विविध संरचना उभारण्यात आल्या आहेत. मात्र या संरचना तयार करणे हेच अंतिम ध्येय नसून त्यांची कार्यक्षमता दीर्घकाळ टिकवून ठेवणे हे खरे आव्हान आहे. यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी योग्य तांत्रिक पद्धतीने निगा, तपासणी आणि दुरुस्ती करणे आवश्यक ठरते. शेतातील मृद् व जलसंधारण उपाययोजनांची देखभाल ही शेतकऱ्याच्या पुढील हंगामातील उत्पादन, जमिनीची सुपीकता आणि पाण्याची उपलब्धता यांच्याशी थेट जोडलेली आहे..Watershed Management : पाणलोटनिहाय ताळेबंद मांडा.गाळ उपसासाठलेला गाळ जलसंधारण संरचनेची साठवण क्षमता तर कमी करतोच, पण तो पाणी पाझर प्रक्रियेतही अडथळा निर्माण करतो..तांत्रिक निकषगाळ उपसा करताना संरचनेची सुरक्षितता आणि कार्यक्षमता टिकवणे अत्यंत आवश्यक आहे. नाल्याचे किंवा साठवण क्षेत्राचे खोलीकरण करताना मूळ तळापासून साधारण ३ मीटरपर्यंत किंवा कठीण भूस्तर लागेपर्यंतच उत्खनन करावे. यापेक्षा अधिक खोलीकरण टाळावे, कारण त्यामुळे संरचनेची स्थिरता धोक्यात येऊ शकते.बांधाच्या संरचनात्मक मजबुतीसाठी बांधापासून किमान ५ मीटर अंतराचा ‘बर्म’ ठेवणे आवश्यक आहे, ज्यामुळे बांधाच्या पायाला धक्का बसत नाही आणि दीर्घकालीन टिकाऊपणा सुनिश्चित होतो..उतारगाळ काढल्यानंतर संरचनेच्या काठांना योग्य अभियांत्रिकी पद्धतीने उतार देणे आवश्यक आहे. साधारण १:१.५ या प्रमाणात समतोल उतार दिल्यास काठांची स्थिरता वाढते, पावसाळ्यात होणारी मातीची धूप कमी होते.उतारावर स्थानिक गवत किंवा झुडपांची लागवड करून जैविक स्थिरीकरण केल्यास संरचनेचे आयुष्य वाढते. पाण्याच्या प्रवाहामुळे होणारे नुकसान टाळता येते..फायदागाळ उपशामुळे साठवण संरचनेची पाणी साठवण्याची क्षमता पुन्हा वाढते, पाझर प्रक्रिया अधिक प्रभावी होते.काढलेला गाळ शेतात पसरवल्यास मातीची सुपीकता वाढते आणि सेंद्रिय घटकांचे प्रमाण सुधारते. यामुळे रासायनिक खतांचा वापर सुमारे ३० ते ३५ टक्क्यांनी कमी होऊ शकतो, तर पिकांच्या उत्पादनात ३० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ दिसून येते.जमिनीतील नत्र, स्फुरद आणि पालाश यांसारख्या प्रमुख अन्नद्रव्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते, ज्यामुळे दीर्घकालीन मृदा आरोग्य सुधारते..सांडव्याची निगासांडवा हा संरचनेच्या सुरक्षिततेसाठीचा ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ आहे.दक्षतासांडवा हा मृद् व जलसंधारण संरचनेचा अत्यंत महत्त्वाचा सुरक्षितता घटक असून, तो अतिरिक्त पाण्याचा नियंत्रित विसर्ग करण्याचे कार्य करतो.पावसाळ्यापूर्वी सांडव्यामध्ये साचलेला कचरा, गाळ, झाडेझुडपे, दगड किंवा इतर अडथळे पूर्णपणे काढून टाकणे आवश्यक आहे. विसर्गाचा मार्ग पूर्णपणे मोकळा ठेवल्यास अतिवृष्टीच्या वेळी पाण्याचा दाब नियंत्रित राहतो आणि संरचनेवर अनावश्यक ताण निर्माण होत नाही..पिचिंग दुरुस्तीसांडव्याच्या तोंडाशी आणि प्रवाह मार्गावर असलेले दगडांचे पिचिंग अनेकदा पाण्याच्या वहनांमुळे विस्कळीत होते. अशा वेळी ते पुन्हा योग्य अभियांत्रिकी पद्धतीने ‘सांधमोड रचना’ करून बसवणे आवश्यक आहे.दगडांमधील सांधे घट्ट केल्यास पाण्याचा वेग नियंत्रित होतो. जमिनीची धूप प्रभावीपणे रोखली जाते.ही दुरुस्ती केवळ संरचनेचे संरक्षण करत नाही तर संपूर्ण जलसंधारण प्रणालीची कार्यक्षमता आणि टिकाऊपणाही वाढवते.माती, सिमेंट बांधांचे मजबुतीकरण.भेगाउन्हाळ्यातील उष्णता आणि आर्द्रतेतील बदलांमुळे मातीच्या बांधांमध्ये भेगा पडणे ही सामान्य पण गंभीर समस्या आहे. अशा भेगा वेळेत दुरुस्त न केल्यास पावसाळ्यात पाण्याचा दाब वाढून बांध फुटण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे या भेगा चांगल्या दर्जाच्या मातीने भरून त्यावर योग्य प्रकारे माती दाबून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून माती घट्ट बसून संरचना मजबूत होईल.उंदीर किंवा घुशींसारख्या प्राण्यांनी तयार केलेली बिळे त्वरित शोधून ती बुजवून घ्यावीत. या प्रतिबंधात्मक उपायांमुळे बांधाची अंतर्गत स्थिरता वाढते आणि पाण्याच्या दाबामुळे होणारे नुकसान टाळता येते..Watershed Soil Management: जलसंधारण क्षेत्रातील माती, कार्बन ऱ्हासावर होणारा परिणाम .सिमेंट बांधसिमेंट नाला बांधांमध्ये कालांतराने लहान-मोठे तडे पडणे किंवा भिंतींमध्ये सूक्ष्म फटी निर्माण होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. अशा तड्यांची योग्य दुरुस्ती न केल्यास पाण्याचा झिरपा वाढून संरचनेची मजबुती कमी होते. यासाठी तडे ‘व्ही-नॉच’ पद्धतीने रुंद करून त्यामध्ये उच्च दर्जाचे सिमेंट मोर्टार भरून दुरुस्ती करणे आवश्यक आहे, जेणेकरून जोड अधिक मजबूत होईल.बांधाच्या भिंतींवर उगवलेली झाडे किंवा झुडपे मुळासकट काढून टाकणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्यांच्या मुळांमुळे सिमेंट संरचनेत भेगा निर्माण होऊन दीर्घकालीन नुकसान होऊ शकते..सुरक्षिततामृद् व जलसंधारण संरचनांच्या दुरुस्ती आणि देखभालीची कामे ही शारीरिकदृष्ट्या कष्टाची तसेच काही वेळा जोखमीची असतात. त्यामुळे या कामांदरम्यान केवळ तांत्रिक बाबींवरच नव्हे, तर कामगारांच्या सुरक्षिततेवरही विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य सुरक्षा उपाय न केल्यास अपघात, आरोग्य समस्या किंवा गंभीर धोके उद्भवू शकतात.गाळ उपसा किंवा दुरुस्तीच्या कामांमध्ये कामगारांचा थेट संपर्क माती, गाळ आणि पाण्याशी येतो. हा गाळ अनेकदा सांडपाण्याने दूषित असण्याची शक्यता असते. त्यामुळे वैयक्तिक संरक्षणात्मक साधनांचा वापर जसे, हातमोजे, गमबूट, मास्क आणि आवश्यक असल्यास सुरक्षात्मक चष्मा यांचा वापर करणे अनिवार्य आहे. यामुळे त्वचारोग, संसर्गजन्य आजार आणि श्वसनाशी संबंधित समस्या टाळता येतात..खोल संरचना जसे की विहिरी, शेततळी किंवा पाण्याच्या टाक्या स्वच्छ करताना काही वेळा मिथेन किंवा कार्बन डायऑक्साइडसारखे विषारी वायू साचण्याची शक्यता असते. हे वायू प्राणघातक ठरू शकतात, कारण ते ऑक्सिजनचे प्रमाण कमी करतात. त्यामुळे अशा ठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी वायूंची तपासणी करणे, आवश्यक असल्यास वायुविजन सुनिश्चित करणे आणि सुरक्षितता मानकांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.जेसीबी किंवा इतर जड यंत्रसामग्रीचा वापर करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ओल्या किंवा उताराच्या भागात काम करताना अनुभवी आणि प्रशिक्षित चालकाची नेमणूक करावी. तसेच कामाच्या ठिकाणी विद्युत वाहिन्या, खांब किंवा इतर अडथळ्यांपासून सुरक्षित अंतर राखणे गरजेचे आहे. यामुळे यंत्रसामग्री अपघात टाळता येतात आणि काम सुरक्षितपणे पूर्ण करता येते..सलग समतल चरसलग समपातळी चर हे विशेषतः डोंगराळ आणि उताराच्या क्षेत्रांमध्ये पावसाचे पाणी अडविण्यासाठी आणि जमिनीत झिरपण्यासाठी अत्यंत प्रभावी साधन आहे. या चरांची रचना ठराविक अभियांत्रिकी मापदंडांनुसार करणे आवश्यक आहे.सामान्यतः चरांची रुंदी सुमारे ६० सेंमी आणि खोली ३० सेंमी ठेवली जाते, जेणेकरून पाणी साठवणूक आणि पाणी मुरण्याचे प्रमाण दोन्ही संतुलित राहतात..रिब्सचरामध्ये पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी आणि त्याचा वेग कमी करण्यासाठी ठरावीक अंतरावर मातीचे लहान अडथळे म्हणजेच ‘रिब्स’ तयार करणे अत्यंत उपयुक्त ठरते. साधारण ३ ते ४ मीटर अंतरावर ०.३ मीटर रुंदीचे रिब्स ठेवले जातात. या रिब्समुळे पाणी एका दिशेने वेगाने वाहून न जाता थांबते, पसरते आणि जमिनीत अधिक प्रमाणात झिरपते. यामुळे मातीची धूप कमी होऊन संरचनेची कार्यक्षमता वाढते..देखभालचरांची नियमित देखभाल ही त्यांच्या दीर्घकालीन उपयोगासाठी अत्यंत आवश्यक आहे. चरांमध्ये साठलेली माती, पालापाचोळा आणि इतर सेंद्रिय कचरा वेळोवेळी काढून टाकावा. काढलेली माती उताराच्या खालच्या बाजूला टाकून बर्म अधिक मजबूत करावा.या प्रक्रियेमुळे पावसाचे पाणी अधिक प्रभावीपणे अडवले जाते आणि जमिनीत झिरपते. परिणामी, भूजल पुनर्भरण क्षमतेत सुमारे ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत वाढ होऊन परिसरातील पाणीसाठा दीर्घकाळ टिकण्यास मदत होते.- डॉ. सुयोग खोसे ९४०३६१३४(विषयतज्ज्ञ, कृषी अभियांत्रिकी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, जि. पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.