Potato Prices Crash In West Bengal Farmers Face Heavy Losses: पश्चिम बंगालमध्ये बटाट्याचे घाऊक दर कोसळले आहेत. आंतरराज्य व्यापारात घट तसेच उत्पादक आणि व्यापाऱ्यांकडे कोल्ड स्टोरेजमध्ये बटाट्याचा मोठ्या प्रमाणात शिल्लक साठा पडून असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी राज्यभरातील शेतकऱ्यांना नाइलाजाने कमी किमतीत बटाटा विकावा लागत आहे. .पश्चिम बंगाल हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे बटाटा उत्पादक राज्य आहे. पण सध्याच्या परिस्थिती पाहता पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड आणि बिहार यांसारख्या बटाट्याची मागणी असलेल्या प्रमुख बाजारांत उत्तर प्रदेशच्या बटाट्याने आघाडी घेतली आहे. तसेच या बाजारांत वर्चस्व निर्माण करण्यासाठी उत्तर प्रदेश आंतरराज्य व्यापार वेगाने वाढवत आहे..कोल्ड स्टोरेजमध्ये अजूनही महिनाभर पुरेल इतका बटाट्यांचा साठा शिल्लक आहे. यामुळे बटाट्यांच्या घाऊक दरात सुमारे ५० टक्क्यांची घसरण झाली आहे. याचा मोठा फटका बटाटा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसला आहे. कोल्ड स्टोरेजमध्ये मोठ्या प्रमाणात बटाटा साठा शिल्लक असल्याने दर कोसळले असल्याचा दावा पश्चिम बंगाल कोल्ड स्टोरेज असोसिएशनने केला आहे. परिणामी, शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल सुमारे १०० ते २०० रुपये एवढ्या कमी दराने बटाटा विकावा लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे..Potato New Variety : बटाट्याच्या चार वाणाला मान्यता; बटाटा उत्पादन वाढीसह प्रक्रियेला फायदा.यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला बंगालमधील कोल्ड स्टोरेजमध्ये साठवणूक करुन ठेवलेल्या बटाट्याचा एकूण साठा एकूण सुमारे ७२ लाख टन होता. हा साठा मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे १० लाख टनांनी अधिक आहे. अधिक उत्पादन झाल्यामुळे कोल्ड स्टोरेजमधील साठा वाढला असल्याचे कोल्ड स्टोरेज असोसिएशनमधील पदाधिकारी सांगतात..Potato Cultivation: पश्चिम बंगालमध्ये बटाटा पीक लागवडीखालील क्षेत्र घटणार?.पश्चिम बंगालमध्ये बटाटा साठवणुकीसाठी सुमारे ५०० कोल्ड स्टोरेज आहेत. या स्टोरेजमध्ये बटाटे नेण्याची प्रक्रिया फेब्रुवारी–मार्च महिन्यात सुरू होते. तर साधारणपणे ३० नोव्हेंबरपर्यंत कोल्ड स्टोरेजमधील बटाट्यांचा साठा पूर्णपणे खाली केला जातो. पण यंदा साठा अधिक असल्याने राज्य सरकारने सर्व कोल्ड स्टोरेजमध्ये बटाटे साठवून ठेवण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवली..हा बटाटा किमान नवीन वर्षात जानेवारीपर्यंत कोल्ड स्टोरेजमध्येच राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोल्ड स्टोरेज कमी क्षमतेत चालू ठेवणे अडचणीचे ठरत आहे. पण दर कोसळल्यामुळे नुकसानीला सामोरे जात असलेल्या राज्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या हितासाठी कोल्ड स्टोरेज सुरुच ठेवावी लागतील. सध्याची परिस्थिती संपूर्ण उद्योगासाठी आणि सर्व संबंधित भागधारकांसाठी नुकसानीचे ठरत असल्याचे कोल्ड स्टोरेज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे..ओडिशा, झारखंड आणि बिहार यांसारखी राज्ये मोठ्या प्रमाणावर बंगालच्या बटाट्यांवर अवलंबून आहे. आता या राज्यांमध्ये बटाटे पाठवताना बंगालमधील व्यापाऱ्यांना अडचणी येत आहेत. गेल्या दोन वर्षांत पश्चिम बंगालच्या आंतरराज्य व्यापारात मोठ्या प्रमाणात घट झाली. देशातील सर्वात मोठा बटाटा उत्पादक असलेला उत्तर प्रदेश त्यांची उत्पादने वाढवण्यासाठी सक्रिय विपणन प्रक्रिया राबवत आहे. .या उद्योगातील काही तज्ज्ञांच्या मते, गेल्या वर्षी पश्चिम बंगालने राज्यातर्गंत बटाट्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर आंतरराज्य व्यापारास बंदी घातली. तेव्हा उत्तर प्रदेशने या संधीचा फायदा घेत ओडिशा, झारखंड आणि बिहारसारख्या बाजारपेठांमध्ये त्यांचा शेतमाल पाठवत आघाडी घेतली. त्यानंतर बटाटा उत्पादक आणि व्यापाऱ्यांनी मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगत आंदोलने केली. त्याची दखल घेत राज्य सरकारने नंतर आंतरराज्य व्यापारावरील बंदी उठवली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. .विक्रीत घटदरम्यान, सध्या ओडिशा आणि इतर राज्यांकडून मागणी लक्षणीयरीत्या कमी असल्याचे पश्चिम बंगालमधील व्यापारी सांगतात. ही राज्ये आता उत्तर प्रदेशातून बटाटा खरेदी करत आहेत. तिथे जास्त उत्पादन आणि चांगल्या पायाभूत सुविधा असल्यामुळे बटाटा कमी किमतीत पुरवला जात असल्याचे दिसून आले आहे..मागील वर्षी बंदी लागू केल्याने व्यापारी ओडिशा, झारखंड, बिहार आणि इतर राज्यांना बटाट्यांचा पुरवठा करु शकले नाहीत. नंतर बंदी उठवली गेली. यावर्षी बंगालचा बटाटा या राज्यांमध्ये पाठवला जात आहे, पण त्याचे प्रमाण कमी असल्याचे कोल्ड स्टोरेजचे मालक सांगतात..२०२४ च्या आधी बंगालमधून दरवर्षी इतर राज्यांना सुमारे २० ते २५ लाख टन अतिरिक्त बटाट्याची विक्री होत होती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.