डॉ. आनंद गोरे, सुरेश खटिंगSustainable Agriculture: गरजेइतका पाऊस झालेल्या भागात मृदा व जलसंधारण, अंतरमशागत, तण नियंत्रण, संतुलित खत व्यवस्थापन तसेच एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनावर भर द्यावा. तर अतिवृष्टी झालेल्या भागात सर्वप्रथम अतिरिक्त पाण्याचा निचरा करून, वाफसा आल्यानंतर अंतरमशागत, जलसंधारण सऱ्या, तण नियंत्रण, संतुलित खत व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड-रोग नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. .यावर्षी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसेच खानदेशातील बहुतांश भागात खरीप पिकांची पेरणी काही प्रमाणात उशिराने झाली असून सध्या सोयाबीन, कापूस, तूर, मूग व उडीद ही पिके साधारणतः २५ ते ३० दिवसांच्या वाढीच्या अवस्थेत आहेत. याशिवाय ऊस, हळद तसेच मोसंबी, संत्रा, डाळिंब, आंबा, पेरू यांसारखी विविध फळपिके जोमदार वाढीच्या अवस्थेत आहेत. मागील तीन ते चार दिवसांत अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झाला असून काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. .Polyhouse Management In Monsoon: पावसाळ्यामधील पॉलिहाउसचे व्यवस्थापन.त्यामुळे प्रत्येक भागातील पावसाच्या प्रमाणानुसार योग्य पीक व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक ठरते. पावसानंतरची व्यवस्थापनाची दिशा ही दोन परिस्थितींनुसार निश्चित करावी. ज्या भागात गरजेइतका पाऊस झाला आहे, तेथे जमिनीमध्ये ओलावा जास्तीत जास्त काळ टिकवून ठेवणे हे प्रमुख उद्दिष्ट असावे. तर ज्या भागात अतिवृष्टी किंवा पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, तेथे अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा करून पिकांच्या मुळांचे संरक्षण करणे आवश्यक आहे..गरजेइतका पाऊस झालेल्या भागातील व्यवस्थापनज्या शेतांमध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे तेथे पुढील काळात पडणाऱ्या प्रत्येक पावसाच्या थेंबाचा शेतामध्येच जास्तीत जास्त मुरावा होईल यासाठी प्रयत्न करावेत. पाऊस थांबल्यानंतर जमिनीत वाफसा आल्यानंतर कोळपणी किंवा खुरपणी करून आंतरमशागत करावी. यामुळे जमिनीवरील भेगा बंद होतात, माती भुसभुशीत राहते, मुळांना हवा मिळते तसेच तणांचे प्रभावी नियंत्रण होऊन पिकांची वाढ जोमदार होते.शेतामध्ये प्रत्येक चार ते सहा ओळींनंतर जलसंधारण सऱ्या काढाव्यात. या सऱ्यांमुळे पुढील पाऊस जमिनीत मुरतो, जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो आणि पावसातील खंडाच्या काळात पिकांना आवश्यक आर्द्रता उपलब्ध होते..पावसानंतर तणांची वाढ वेगाने होत असल्यामुळे वेळेवर निंदणी, कोळपणी करून तण नियंत्रण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मजुरांची उपलब्धता कमी असल्यास कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार योग्य उगवण पश्चात तणनाशकांचा वापर करावा.या कालावधीत कापूस, ऊस, हळद तसेच केळी, डाळिंब, मोसंबी, संत्रा, आंबा व इतर फळपिकांना शिफारशीनुसार वरखत द्यावे. खत दिल्यानंतर हलकी कोळपणी करून मातीची भर दिल्यास अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर होतो व पिकांची वाढ सुधारते..Sugarcane Fertilizer Management: उसासाठी संतुलित खत व्यवस्थापन.कीड व रोगांचे नियमित निरीक्षण करणे आवश्यक आहे. सोयाबीनमध्ये खोडमाशी, पाने खाणाऱ्या अळ्या तर कापसामध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी यांचे निरीक्षण करावे. फेरोमोन सापळे व चिकट सापळ्यांचा वापर करून किडींचे प्रमाण लक्षात ठेवावे आणि आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतरच शिफारशीनुसार कीटकनाशकांची फवारणी करावी.सतत ढगाळ व दमट वातावरणामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. सोयाबीनमध्ये अँथ्रॅक्नोज, रायझोक्टोनिया व कॉलर रॉट, कापसामध्ये करपा, तुरीमध्ये मर रोग तसेच फळपिकांमध्ये फळकूज व पानांवरील डाग यांचे नियमित निरीक्षण करून कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार योग्य बुरशीनाशकांची फवारणी करावी..अतिवृष्टी किंवा जास्त पाऊस झालेल्या भागातील व्यवस्थापनज्या भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे किंवा शेतामध्ये पाणी साचले आहे, तेथे सर्वप्रथम अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा करणे अत्यावश्यक आहे. पिकांच्या मुळांभोवती दीर्घकाळ पाणी साचल्यास मुळांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊन वाढ खुंटते तसेच मुळकूज व इतर रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. विशेषतः सोयाबीन, मूग, उडीद, हळद आणि फळपिकांसाठी ही उपाययोजना अत्यंत महत्त्वाची आहे.पाणी ओसरल्यानंतर वाफसा आल्यानंतर कोळपणी करून माती भुसभुशीत ठेवावी. यामुळे मुळांना पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि पिकांची पुनर्वाढ जलद होते. त्याचबरोबर पुढील पावसासाठी संरक्षणात्मक जलसंधारण सऱ्या काढल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा व पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होतात..अतिवृष्टीनंतर तणांची वाढ झपाट्याने होत असल्यामुळे वेळेवर तण नियंत्रण करावे. आवश्यक असल्यास शिफारशीनुसार उगवण पश्चात तणनाशकांचा वापर करावा. जास्त पावसामुळे अन्नद्रव्यांची धूप होण्याची शक्यता असल्याने वाफसा आल्यानंतर वरखत द्यावे. फळपिकांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केल्यास झाडांची जोमदार वाढ टिकून राहण्यास मदत होते.या परिस्थितीत पानांवरील डाग, करपा, मुळकूज, फळकूज तसेच जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे शेताची नियमित पाहणी करून रोगाची प्रारंभिक लक्षणे दिसताच कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार योग्य नियंत्रण उपाययोजना कराव्यात..पीकनिहाय महत्त्वाच्या सूचनासोयाबीन पिकामध्ये आंतरमशागत करून जलसंधारण सऱ्या तयार कराव्यात. पिकाचे नियमित निरीक्षण करावे तसेच पिवळी पडलेली झाडे तपासून आवश्यकतेनुसार योग्य उपाययोजना करावी.कापूस पिकामध्ये शिफारशीनुसार वरखताची मात्रा पूर्ण करून मातीची भर द्यावी. फेरोमोन सापळ्यांचा वापर करून किडींचे व्यवस्थापन करावे.तूर पिकात वेळेवर तण नियंत्रण करावे, जलसंधारण सऱ्या तयार कराव्यात. तसेच मर रोग व शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचे नियमित निरीक्षण करावे..मूग व उडीद पिकामध्ये पाणी साचू देऊ नये. पानांवरील रोगांची लक्षणे दिसल्यास शिफारशीनुसार योग्य बुरशीनाशकाची फवारणी करावी.ऊस पिकामध्ये शिफारशीनुसार नत्र खताचा पुढील हप्ता द्यावा. आंतरमशागत करून मातीची भर द्यावी. आवश्यकतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी. बायोमिक्स व ट्रायकोडर्मा चा वापर केल्यास मुळांची वाढ सुधारते आणि मृदाजन्य रोगांचे प्रमाण कमी राहते. पाणी साचणार नाही याची विशेष काळजी घ्यावी..हळद पिकामध्ये अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा करून नत्र खताचा शिफारशीनुसार हप्ता द्यावा. त्यानंतर मातीची भर द्यावी. सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केल्यास पानांची वाढ व कंद विकास सुधारतो. शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा मिसळून वापर केल्यास कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘बायोमिक्स’ चा वापर केल्यास मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या वाढून कंदांची वाढ, अन्नद्रव्यांचे शोषण व उत्पादनक्षमतेत वाढ होते..मोसंबी, संत्रा, डाळिंब, आंबा, पेरू व इतर फळपिकांमध्ये झाडाभोवती पाणी साचू देऊ नये. गरजेनुसार खतांचा पुरवठा करून सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी. बायोमिक्स व ट्रायकोडर्माचा वापर केल्यास मुळांची वाढ चांगली होते, मृदाजन्य रोग कमी होतात आणि झाडांचा जोम टिकून राहतो. फळकूज, डिंक्या रोग व इतर बुरशीजन्य रोगांचे नियमित निरीक्षणकरून नियंत्रणासाठी उपाययोजना करावी.- डॉ. आनंद गोरे ९५८८६४८२४२( वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.