डॉ. पंकज वडस्कर, डॉ. अभिनंदन पाटील, डॉ. भूषण बिरारीAgricultural Advisory: कपाशी पिकात गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनाबरोबरच कापसाच्या गुणवत्तेवरही विपरीत परिणाम होतो. त्यासाठी पेरणी झालेल्या भागांमध्ये सुरुवातीपासूनच कामगंध (फेरोमोन) सापळ्यांची उभारणी करून किडीचे नियमित निरीक्षण करावे. नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा..यंदा राज्यात पावसाचे वितरण असमान राहिल्यामुळे अनेक भागांत कापसाची पेरणी होण्यास विलंब झाला. मात्र मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे बहुतांश ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तरी अद्यापही काही भागांमध्ये पावसाअभावी किंवा अपुऱ्या पावसामुळे पेरणी मर्यादित राहिली आहे. पेरणीनंतर उगवण, रोपांची वाढ आणि पुढे पाते, फुले व बोंडे धारण करण्याच्या टप्प्यात विविध किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यापैकी गुलाबी बोंड अळी ही कापूस पिकातील सर्वांत महत्त्वाची व आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक कीड मानली जाते. .Soybean Germination Issues: सोयाबीन बियाण्याची उगवण कमी होण्याची कारणे.पेरणी झालेल्या भागांत पुढील काही आठवड्यांत कापूस पिकाला पाती व फुले येण्यास सुरुवात होईल. याच काळात गुलाबी बोंड अळीचे पतंग सक्रिय होऊन अंडी घालण्यास सुरुवात करतात. मागील काही वर्षांपासून या किडीमुळे मोठे प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून, उत्पादनाबरोबरच कापसाच्या गुणवत्तेवरही विपरीत होत आहे. या नुकसानीची सुरुवात पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेपासूनच रोखणे गरजेचे असते. यासाठी सर्वांत सोपा, कमी खर्चाचा आणि अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे ‘कामगंध (फेरोमोन) सापळे’. पेरणी झालेल्या भागांमध्ये सुरुवातीपासूनच कामगंध (फेरोमोन) सापळ्यांची उभारणी करून किडीचे नियमित निरीक्षण करणे आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या उपाययोजना राबविणे अत्यंत आवश्यक आहे..गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनाचे महत्त्वगुलाबी बोंड अळी ही कापूस पिकातील सर्वाधिक आर्थिक नुकसान करणाऱ्या किडींपैकी एक आहे. प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये तिचा प्रादुर्भाव सातत्याने आढळून येत आहे. प्रादुर्भाव तीव्र असल्यास उत्पादनात ३० ते ७० टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता असते. कपाशी पिकाला पाती आणि फुले लागण्यास सुरुवात झाल्यानंतर गुलाबी बोंड अळीचे पतंग अंडी घालण्यासाठी सक्रिय होतात. म्हणूनच सुरुवातीपासूनच पिकामध्ये कामगंध (फेरोमोन) सापळ्यांचा वापर करून किडीचे नियमित निरीक्षण करावे. त्याअनुषंगाने एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या उपाययोजना राबविणे ही काळाची गरज आहे..ओळख अन् जीवनक्रममराठी नाव ः गुलाबी बोंड अळीशास्त्रीय नाव ः पेक्टिनोफोरा गॉसिपिएल्ला (Pectinophora gossypiella)किडीचे मादी पतंग १०० ते २०० अंडी एकल किंवा पुंजक्यांनी घालते.मादी पात्या, फुले, नवीन बोंड, देठ आणि कोवळ्या पानांच्या खालच्या बाजूस अंडी घालते. किडीची अंडी लांबट व चपटी असून, रंगाने मोत्यासारखी चकचकीत असतात.साधारण पंधरा दिवसांचे बोंड हे किडीला अंडी घालण्यासाठी पसंतीचे ठिकाण असते..पहिल्या दोन आंतरिक अळी अवस्था पांढुरक्या असतात. तिसऱ्या आंतरिक अवस्थेपासून गुलाबी रंगाच्या होतात.कोष अवस्था ८ ते १३ दिवसांत पूर्ण होते. कोष लांब बदामी रंगाचे असतात.किडीचा संपूर्ण जीवनक्रम ३ ते ६ आठवड्यांत पूर्ण होतो.पतंग तपकिरी करड्या रंगाचा असून, पंखावर काळे ठिपके असतात. पतंग निशाचर असून ते कोषातून सकाळी किंवा संध्याकाळी बाहेर पडतात. दिवसा ते मातीत किंवा जमिनीच्या भागात लपून बसतात. खाद्य वनस्पतीअभावी गुलाबी बोंड अळी ६ ते ८ महिन्यांपर्यंत निष्क्रिय अवस्थेत राहते..नुकसानगुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव पिकाच्या वाढीच्या टप्प्यानुसार बदलत जातो. लवकर पेरणी झालेल्या कापूस पिकात पहिल्या पिढीतील अळ्या प्रामुख्याने जुलै-ऑगस्ट महिन्यांत फुले आणि कोवळ्या कळ्यांवर उपजीविका करून त्यांचे नुकसान करतात. पुढील पिढ्यांतील अळ्या पीक साधारण ७० ते ७५ दिवसांचे झाल्यानंतर कोवळ्या बोंडांमध्ये सूक्ष्म छिद्र करून आत प्रवेश करतात. बोंडामध्ये शिरकाव केल्यानंतर त्या बिया आणि सरकीवर उपजीविका करीत संपूर्ण जीवनचक्र पूर्ण करतात. अळीच्या प्रादुर्भावामुळे बिया व तंतूंचा विकास खुंटतो. अळीच्या विष्ठेमुळे बुरशीचा संसर्ग होऊन बोंडे सडतात..प्रादुर्भावाची लक्षणेफुले पूर्णपणे उमलत नाहीत. ती मुरडून डोम कळीच्या स्वरूपात दिसतात, हे सुरुवातीच्या प्रादुर्भावाचे महत्त्वाचे लक्षण आहे.कोवळ्या हिरव्या बोंडांवर दिसणारे लहान काळसर किंवा तपकिरी डाग हे अळीच्या प्रवेशाची सुरुवात दर्शवितात..पूर्ण वाढ झालेली अळी बोंडातून बाहेर पडताना त्यावर सुमारे १.५ ते २ मिमी व्यासाचे गोलाकार निकास छिद्र तयार करते. अशा छिद्रांची उपस्थिती ही गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाची खात्रीशीर ओळख मानली जाते.उघडलेल्या बोंडांवरील जाळीसदृश रचना ही गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाचे महत्त्वाचे लक्षण आहे. विशेषतः हंगामाच्या उत्तरार्धात नुकसान झालेल्या बोंडांवर ती स्पष्टपणे दिसून येते..प्रादुर्भाव वाढण्याची कारणेदीर्घ कालावधीच्या संकरित वाणांमुळे गुलाबी बोंड अळीला वर्षभर खाद्य उपलब्ध होते.बिगर बीटी (रेफ्युजी) कापसाची लागवड न केल्यामुळे प्रतिकारक्षम गुलाबी बोंड अळीच्या पिढ्या निर्माण झाल्या.जिनिंग मिल व मार्केट यार्डमधील कच्च्या कापसाची दीर्घकालीन साठवण गुलाबी बोंड अळीचे स्रोत टिकवून ठेवते.फरदड पीक घेतल्यामुळे गुलाबी बोंडअळीला सतत खाद्य उपलब्ध होऊन तिचा प्रादुर्भाव वाढतो.अळी बोंडामध्ये शिरल्यानंतर रासायनिक कीटकनाशकांनी प्रभावी नियंत्रण करणे कठीण होते..आर्थिक नुकसानीची पातळीकपाशीच्या लागवडीचे प्रतिनिधित्व करतील अशी पात्या-फुले अवस्थेतील २० झाडे निवडून त्यांचे किमान दर आठवड्याने निरीक्षण करावे. त्यावरील एकूण प्रादुर्भावग्रस्त फुले, पात्या, बोंडे मोजून ५ ते १० टक्के प्रादुर्भावाचे प्रमाण वाढल्यास, बोंड अवस्थेत २० हिरवी बोंडे तोडून त्यात ५ ते १० टक्के बोंडे किंवा २० पैकी दोन बोंडात गुलाबी बोंड अळी आढळून आल्यास आर्थिक नुकसानीची संकेत पातळी समजावी. .कामगंध सापळ्यांची कार्यपद्धतीकामगंध (फेरोमोन) सापळे हे कीड व्यवस्थापनासाठी वापरले जाणारे पर्यावरणपूरक जैवतांत्रिक साधन आहे. या सापळ्यामध्ये प्लॅस्टिकचा ट्रॅप (फनेल ट्रॅप) आणि त्यामध्ये बसविलेला ‘ल्युअर’ म्हणजेच कृत्रिमरीत्या तयार केलेला कामगंध असतो. गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी वापरण्यात येणाऱ्या कामगंध सापळ्यांमध्ये ‘गॉसिप्लुअर’ या लैंगिक फेरोमोनचा वापर केला जातो. हा फेरोमोन मादी गुलाबी बोंड अळीने नैसर्गिकरीत्या उत्सर्जित केलेल्या लैंगिक आकर्षक गंधाची कृत्रिम प्रतिकृती असून, तो ‘ल्युअर’मधून नियंत्रित प्रमाणात सतत उत्सर्जित केला जातो. त्यामुळे नर पतंग आकर्षित होऊन सापळ्यात अडकतात. त्यामुळे नर पतंगांची संख्या कमी होऊन मादींसोबत प्रजनन होण्याचे प्रमाण घटते. परिणामी किडीचे अंडी घालण्याचे प्रमाण कमी होऊन पुढील पिढीची संख्या मर्यादित राहते..Watershed Development: पाणलोट विकासातील आधुनिक अन् नावीन्यपूर्ण उपाययोजना.कापूस हंगामात कामगंध सापळ्यांचा अचूक वापरकापसाची लागवड केल्यापासून ४० ते ४५ दिवसांनी किंवा पात्या लागण्यास सुरुवात होताच शेतात कामगंध सापळे लावावेत.शेतात बोंड अळीचा प्रादुर्भाव जाणून घेण्यासाठी किंवा मोजण्यासाठी शेतात एकरी २ ते ३ सापळे लावावेत. नर पतंग मोठ्या संख्येने पकडून नष्ट करण्यासाठी एकरी ८ ते १० सापळे लावावेत..कामगंध सापळ्यांमध्ये गुलाबी बोंड अळीचे सरासरी ८ ते १० नर पतंग सतत दोन ते तीन दिवस आढळून आल्यास गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे, असे समजावे. त्यानुसार त्वरित नियंत्रणसाठी उपाय करावेत.कामगंध सापळ्यांमध्ये अडकलेले गुलाबी बोंड अळीचे नर पतंग पकडून नष्ट करावेत. त्यामुळे पुढील प्रजननास बाधा निर्माण होऊन अळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते..जिनिंग मिलमधील दक्षताप्रत्येक गावात, कापूस संकलन केंद्रे व जिनिंग कारखान्यांमध्ये डिसेंबर ते जून या कालावधीत १५ ते २० कामगंध सापळे लावून गुलाबी बोंड अळीच्या पतंगांचा नायनाट करावा..कामगंध सापळ्यांचे फायदेगुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या काळातच ओळखणे शक्य.कीटकनाशकांची फवारणी कधी करावी, याची अचूक वेळ ठरवता येते.नर पतंग पकडले गेल्याने प्रजनन रोखले जाते आणि अळीची पुढील पिढी नष्ट होते.हे सापळे केवळ विशिष्ट किडीसाठीच काम करतात. त्यामुळे मित्रकीटक, मधमाश्या, परागीभवन करणारे कीटक व इतर उपयुक्त जीव सुरक्षित राहतात.अनावश्यक रासायनिक फवारण्या टाळल्या जातात. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो.हे पूर्णपणे रसायनमुक्त, सुरक्षित आणि निसर्गाला पूरक असे तंत्रज्ञान आहे.कमी श्रमात मोठ्या शेतातील किडीचे निरीक्षण आणि व्यवस्थापन सहज करता येते..सापळे लावण्याची योग्य पद्धतकपाशी पिकापेक्षा किमान १ ते १.५ फूट उंचीवर राहील अशा पद्धतीने काठीच्या साह्याने शेतात सापळा उभा करावा. सापळे समान अंतरावर संपूर्ण शेतात वितरित करावेत, जेणेकरून संपूर्ण क्षेत्राचे प्रभावी निरीक्षण होईल. कपाशीची उंची वाढेल, तसे सापळ्याची उंची देखील वर सरकवावी..‘ल्युअर’ कधी बदलावेसापळ्यातील ल्युअरची कार्यक्षमता ठराविक काळापर्यंतच असते. ल्यूर कंपनीपरत्वे निर्देशित कालावधीनुसार २० अथवा ४५ दिवसांपर्यंत वापरता येते. या कालावधीनंतर ल्यूर बदलणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया नोव्हेंबर अखेरर्पंत राबवावी..ल्युअर वापरताना घ्यावयाची काळजीकामगंध सापळ्यामध्ये गुलाबी बोंडअळीसाठी शिफारस केलेले ‘गॉसिप्लुअर’ ल्युअरच वापरावेत. पॅकेटवर नमूद केलेल्या कालावधीनंतर ते बदलावे.आवश्यक तेवढेच ल्युअर बाहेर काढून पॅकेट त्वरित बंद करावे.ल्युअरला शक्यतो थेट हाताने स्पर्श करू नये. हातमोजे किंवा स्वच्छ चिमट्याच्या साह्याने ते सापळ्यात बसवावे..सापळ्यातील ल्युअरसाठी असलेल्या जागेतच व्यवस्थित बसवावे.ल्युअर बसविल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत.वापरून झालेल्या ल्युअरची योग्य विल्हेवाट लावावी. ते शेतात किंवा इतर परिसरात खुले फेकू नयेत.- डॉ. पंकज वडस्कर८३०६९१०३५२(कृषी कीटकशास्त्र विभाग, दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव,जि. छत्रपती संभाजीनगर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.