Pune News : लोकसभेचे १८ वे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. हे अधिवेशन जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये होईल अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी मंगळवारी (ता.५) दिली आहे.
रिजिजू यांनी, माननीय राष्ट्रपतींनी भारत सरकारच्या शिफारशीनुसार २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२४ या कालावधीतील हिवाळी अधिवेशन २०२४ साठी मंजुरी दिली आहे. यावेळी संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक बोलावण्यात येणार आहे. तर २६ नोव्हेंबर "संविधान सभेच्या सेंट्रल हॉलमध्ये २०२४ रोजी संविधान स्वीकारल्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम साजरा केला जाईल.
दरम्यान संसदेच्या या अधिवेशनात अनेक विषय गाजण्याची शक्यता असून प्रामुख्याने वन नेशन-वन इलेक्शन, वक्फ विधेयकासह जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच सध्याच्या घडीला शेत मालास भाव आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान याआधी केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ कायदे (दुरुस्ती) विधेयक मांडले होते. ज्यावर अधिवेशनात जोरदार हंगामा झाला होता. विरोधकांनी भाजप सरकार एका समाजाला टार्गेट करण्यासाठी असं करत असल्याचा आरोप केला होता. यानंतर हे विधेयक केंद्र सरकारने संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले आहे.