Farming Faces Crisis in Panhala: पावसाळ्यात हिरवाई अनुभवणाऱ्या पन्हाळा तालुक्यातील पश्चिमेकडील डोंगरकडा आणि माळरानावर पावसाच्या भरवशावर घेतलेली खरीप पिके अक्षरशः करपून गेली आहेत. धरणे पूर्ण भरलेली, नद्या वाहत असतानाही सिंचनाची सुविधा नसलेल्या शेतांमध्ये पिकांना पाणी देणे शक्य झालेले नाही. पावसाची प्रतीक्षा करत राहिल्याने सोयाबीन, भुईमूग, नाचणी आणि भात या पिकांना मोठा फटका बसला आहे. काही भागांत तर पिके हातात येण्याची शक्यताच मावळली आहे. अनेक ठिकाणी वरवर हिरवाई दिसत असली तरी उत्पन्नघटीचा धोका आताच दिसत आहे. ही उत्पादनघट ५० ते ६० टक्क्यांपेक्षा जास्त असू शकते, असा अंदाज आहे..माजगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, २४ ऑगस्टनंतर अपेक्षित असा दमदार पाऊस झालेला नाही. त्यानंतर जवळपास महिनाभर पावसाने दडी मारल्याने हलक्या, पाणी न साठविणाऱ्या जमिनीतील पिकांची अवस्था बिकट झाली. विशेषतः डोंगरकडा आणि माळरानावरील पिकांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. ‘आज पाऊस येईल, उद्या येईल,’ या आशेवर शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देण्यास विलंब केला. सप्टेंबरमध्ये पावसाची शक्यता असल्याने स्वतंत्रपणे पाण्याची व्यवस्था करण्याची गरज भासणार नाही, असा अंदाज होता. मात्र, पाऊस लांबत गेला आणि पिकांची तहान वाढत गेली. .धरणे भरली; तरी शेत तहानलेलेतालुक्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. नदी-नाल्यांमध्येही पाणी आहे. मात्र, नदीकाठापासून उंचावर असलेल्या डोंगरमाळावरील शेतांपर्यंत हे पाणी पोहोचविणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरले आहे..Crop Damage Panchnamas: दुष्काळी नुकसानीचे अचूक पंचनामे करा : बावनकुळे.‘पाच दिवसांपूर्वी पाणी दिले; तरी पीक वाचले नाही’कोतोली येथील पांडुरंग पाटील म्हणाले, ‘‘पाच-सहा दिवसांपूर्वी पाणी दिले. मात्र, कडक उन्हामुळे तिसऱ्याच दिवशी जमीन पुन्हा कोरडी पडली. पन्हाळ्यात पाणी साठत नाही. पिकाला गारवा मिळणे तर दूरच; जगण्यासाठी आवश्यक तेवढे पाणीही देता येत नाही.’’ पिके वाचविण्यासाठी आता उशिरा का होईना, शेतकरी नदीकाठावर मोटारी बसवू लागले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी तोपर्यंत पिकांची वाढ खुंटली आहे..भुईमुगाचा ‘चुरा’; ३० गुंठ्यांत नऊ हजारांचा खर्चमाजगावातील शेतकरी बाजीराव कदम यांनी सुमारे ३० गुंठे क्षेत्रात भुईमूग घेतला. बियाणे, शेणखत, मशागत, ट्रॅक्टर, भांगलणी आदींसाठी आतापर्यंत सुमारे नऊ ते साडेनऊ हजार रुपये खर्च झाला आहे. दरवर्षी घरच्या वापरासाठी भुईमूग घेणाऱ्या कदम यांना यंदा मात्र शेतात एकही शेंग हाताला लागण्याची शक्यता दिसत नाही. ‘भुईमूग पूर्ण चुरा झाला आहे,’ अशी त्यांची व्यथा आहे. या भागातील अनेक शेतकरी व्यावसायिक उत्पादनासाठी नव्हे, तर घरच्या वापरासाठी भात, भुईमूग, नाचणी यांसारखी पिके घेतात. घरच्या अन्नधान्याचा खर्च वाचविणे, भुईमुगाच्या शेंगांपासून घरचे तेल काढणे, जनावरांसाठी चारा मिळविणे, एवढाच त्यामागचा उद्देश असतो. त्यामुळे यंदाचे नुकसान केवळ आर्थिक नसून कुटुंबाच्या वर्षभराच्या गरजांवरही परिणाम करणारे आहे..माळरानावरील पिकांना १०० टक्के फटकाशेतकऱ्यांच्या अंदाजानुसार, डोंगरकडा आणि माळरानावरील पिकांचे नुकसान अत्यंत मोठे आहे. सोयाबीन, भुईमूग आणि नाचणीची अवस्था गंभीर असून, काही शेतांमध्ये उत्पादन मिळण्याची शक्यता जवळपास संपली आहे. पाण्याची स्वतंत्र सोय असलेल्या क्षेत्रातील काही पिके मात्र वाचण्याची शक्यता आहे. ‘‘माळरानावरील पिकांना जवळपास १०० टक्के फटका बसला आहे. विहिरी किंवा नदीकाठची पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांपैकी काहींची पिके वाचू शकतात,’’ असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..भाताच्या उत्पादनावरही टांगती तलवारपावसावर अवलंबून असलेल्या भातशेतीचीही अवस्था चिंताजनक आहे. आता पाऊस झाला तरी आधीच करपलेली पिके पूर्ववत होणार नाहीत. काही ठिकाणी पाणी उपलब्ध असल्यास थोडेफार उत्पादन मिळण्याची शक्यता आहे; मात्र, मोठ्या क्षेत्रातील भात उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. शेतकऱ्यांच्या अंदाजानुसार, पाण्याची सोय असलेल्या क्षेत्रामुळे काही उत्पादन हातात येईल; मात्र, पावसावर अवलंबून असलेल्या क्षेत्रात मोठी घट होण्याची शक्यता आहे..Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद.शेतीसोबत मजुरीचा आधारपन्हाळा तालुक्यात अनेक कुटुंबांची परिस्थिती याच स्वरूपाची आहे. घरातील काही सदस्य दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करतात, तर काही जण औद्योगिक वसाहतीत कामाला जातात. स्वतःच्या शेतातून वर्षभराच्या घरखर्चाला हातभार लागावा, एवढीच त्यांची अपेक्षा असते. मात्र, यंदा पावसाने साथ न दिल्याने स्वतःच्या शेतातील उत्पादनाबरोबरच घरच्या अन्नधान्याची हमीही धोक्यात आली आहे. धरणात पाणी, नदीत पाणी; पण डोंगरमाळावरील शेतकऱ्यांच्या बांधावर मात्र पाण्याचा थेंब नाही, अशी विरोधाभासी परिस्थिती पन्हाळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाहायला मिळत आहे..तातडीच्या पंचनाम्याची मागणीपिकांची झालेली अवस्था पाहता महसूल आणि कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तलाठी, कृषी सहायक आणि संबंधित अधिकाऱ्यांनी डोंगरमाळावरील शेतांमध्ये जाऊन पिकांचे पंचनामे करावेत, अशी अपेक्षा आहे. ‘‘पिकासाठी केलेला खर्च तरी काही प्रमाणात भरून निघाला तर शेतकऱ्यांना आधार मिळेल. हातावर पोट असलेल्या कुटुंबांनी कर्ज काढून किंवा घरचा पैसा खर्च करून पीक घेतले आहे. आता पीकच गेले तर कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा,’’ असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत..अनधिकृत पाणी उपशावर होणार कारवाईधरणे, नद्या व कालव्यांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा तत्काळ रोखण्यासाठी महसूल, पोलिस व जलसंपदा विभागाची संयुक्त पथके गस्त घालतील. दोषींवर कारवाई करून बेकायदेशीर पंप व साहित्य जप्त केले जाईल..पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीपाणी वापराचे नियोजन करण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व महापालिका आयुक्त, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी सदस्य, तर धरणाशी संबंधित अधीक्षक अभियंता सदस्य सचिव असतील..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.