Pilgrimage Infrastructure: आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता.२५) आढावा बैठक झाली. या बैठकीत विठ्ठल भक्तांना व वारीत सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांना उत्कृष्ट सोयी-सुविधा पुरवण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांना आणि विविध निविदांना एकमताने मंजुरी देण्यात आली. प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून यंदा वारकऱ्यांना अधिक दर्जेदार सुविधा मिळतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे..यंदाच्या वारीत वारकऱ्यांच्या निवासाची उत्तम सोय व्हावी यासाठी 'मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र' अंतर्गत अत्याधुनिक जर्मन हॅंगर उभारण्यात येणार आहेत. पुणे, सोलापूर आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी ७ कोटी ९९ लाख रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली आहे. याशिवाय, वारी मार्गावरील ३७ महत्त्वाच्या ठिकाणी भाविकांना पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी ३ कोटी ४९ लाख रुपये खर्चाचे भव्य वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येणार आहेत. .Ashadhi Wari 2026: आषाढी वारीसाठी भाविकांची सुरक्षितता, स्वच्छता, सुविधा व्यवस्थेला प्राधान्य.तसेच स्वागत कमानींसाठी ४ कोटी ४३ लाख रुपये आणि वारकऱ्यांच्या चरणांची सेवा करण्यासाठी ७२ लाख रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली आहे. तसेच वारी काळात भाविकांचे आरोग्य जपण्यासाठी पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी एकूण १० कोटी रुपयांच्या औषधे व वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी सर्वाधिक ६.७४ कोटी रुपयांची तरतूद आहे. .Forest Department: वन विभागाकडे ७२७ कोटींच्या हरित संपत्तीची जबाबदारी.वारी काळात २४ तास डॉक्टर उपलब्ध राहावेत, यादृष्टीने नियोजन केले जात आहे. पिण्याच्या पाण्यासाठी २ कोटी २८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, वारी मार्गावर ५८ शासकीय आणि १६२ खाजगी अशा एकूण २२० टँकरद्वारे अखंडित पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने जिल्ह्यातील सर्व पालखी मार्गांवर दाखल होणाऱ्या सर्व पालख्यांना समान व उच्च दर्जाच्या सुविधा देण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच मंडप आणि जर्मन हॅंगरच्या गुणवत्तेवर विशेष भर दिला जाणार असून, पावसामुळे कोणतीही त्रुटी आढळल्यास ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची अट घालण्यात आल्याचे सांगण्यात आले..ग्रामपंचायतींच्या निधीत वाढपालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना यापूर्वी दिला जाणारा साडेतीन कोटींचा निधी आता १ कोटी रुपयांनी वाढवून तो साडेचार कोटी करण्यात आला आहे. तसेच निधी वाटपात नवीन १० गावांचा समावेश करण्यात आला असून एकूण ९१ ग्रामपंचायतींना याचा फायदा होणार आहे..टेंडर प्रक्रियेवर सदस्यांचा आक्षेपकुर्डूचे जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब ढाणे यांनी प्रशासकीय कारभारावर जोरदार आक्षेप घेतला. टेंडर प्रक्रियेपूर्वी सभा घेतली असती तर सदस्यांना कामे सुचवता आली असती, आता टेंडर झाल्यावर केवळ औपचारिकता म्हणून सभा घेता का, असा सवाल त्यांनी केला. तसेच अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या संगनमताचा संशय व्यक्त करत, वारकऱ्यांच्या मूलभूत सुविधांऐवजी जर्मन हॅंगर, वॉटरप्रूफ मंडप आणि स्वागत कमानींवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी कशासाठी, असा प्रश्न विचारल्याने सभागृहात काही काळ शांतता पसरली.