डॉ. सुरेंद्र पाटील, डॉ. देवानंद पंचभाई, वृषाली चौगले Orange Farming: संत्रा-मोसंबीमध्ये आंबिया, मृग आणि हस्त असे तीन बहार येत असले तरी व्यावसायिकदृष्ट्या प्रामुख्याने आंबिया आणि मृग बहर घेतले जातात. प्रत्येक बहाराची फुलधारणा, फळधारणा आणि फळवाढीचा कालावधी वेगळा असल्याने त्या त्या अवस्थेत बागेचे व्यवस्थापनही बदलते. मृग बहरात साधारणतः जून-जुलै तर आंबिया बहरात जानेवारी- फेब्रुवारी महिन्यामध्ये फुलधारणा होते..फुल धारणेपासून फळ काढणीचा कालावधी साधारणतः नऊ महिन्यांचा असतो. आंबिया बहरात साधारणपणे ६० टक्के फुले येतात. तर मृग बहरात ३० टक्के फुले येतात. आंबिया बहरात मोठ्या प्रमाणात फुलधारणा होत असली, तरी फळे काढणीपर्यंत टिकवून ठेवण्याचे आव्हान अधिक असते. त्यामुळे केवळ फुलांची संख्या किंवा सुरुवातीची फळधारणा यावर उत्पादनाचा अंदाज न घेता, फळांची गळ कोणत्या अवस्थेत आणि कोणत्या कारणामुळे होत आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. योग्य वेळी कारणांचा शोध घेऊन पाणी, अन्नद्रव्ये, कीड-रोग आणि संजीवकांचे व्यवस्थापन केल्यास अनावश्यक फळगळ कमी करून बागेतील उत्पादनक्षमता टिकविण्यास मदत होऊ शकते..Orange Orchard Management: बदलत्या हवामानात मृग बहराचे शास्त्रीय नियोजन.भरपूर फुलधारणा म्हणजे जास्तउत्पादन नव्हेसंत्रा आणि मोसंबी बागेत भरपूर फुलधारणा होणे म्हणजे चांगले उत्पादन मिळेलच असे नाही. फुलधारणेनंतर फळधारणा होणे आणि लागलेली फळे काढणीपर्यंत झाडावर टिकून राहणे या दोन्ही बाबी उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. प्रत्यक्षात संत्रा-मोसंबी झाडांवर हजारो फुले येतात; मात्र त्यातील बहुतांश फुले आणि सुरुवातीला लागलेली लहान फळे नैसर्गिकरीत्या गळून पडतात. काही प्रमाणातील फळगळ ही झाडाची नैसर्गिक प्रक्रिया असली, तरी त्याचे प्रमाण वाढल्यास अपेक्षित उत्पादन मिळत नाही. बहराच्या काळातील हवामान, जमिनीतील ओलाव्याची स्थिती, पाण्याचे व्यवस्थापन, अन्नद्रव्यांचा पुरवठा, कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि वनस्पती वाढ संजीवकांचा योग्य अथवा अयोग्य वापर यांचा फळगळीसह फळांच्या वाढीवर परिणाम होतो..फळगळीमागील कारणेनैसर्गिक फळगळआंबिया बहरामध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यात फळधारणा झाल्यावर उष्णतामानात एकदम वाढ होऊन फळे गळतात. शिवाय दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात या काळात जास्त फरक असल्यामुळे फळांची गळ जास्त होते. संत्रा / मोसंबी झाडावर निसर्गतः आवश्यकतेपेक्षा जास्त फुले येतात. त्यामुळे अन्नद्रव्यांसाठी फुले आणि फळांमध्ये स्पर्धा निर्माण होते. झाडाच्या फळे पोसण्याच्या क्षमतेनुसार तेवढीच फळे झाडावर टिकून राहतात. उर्वरित फळांची गळ होते. त्यामुळे नैसर्गिकरित्या फुलांची व फळांची गळ होत असते..वातावरणाचा परिणामसंत्रा/मोसंबीमध्ये तापमान, आर्द्रता आणि वारा या बाबी फळगळीस कारणीभूत ठरतात. मागील काही वर्षांमध्ये एप्रिल महिन्यात तापमानात झालेल्या वाढीमुळे आंबिया बहाराच्या फळांची खूप मोठ्या प्रमाणात गळ होत आहे. तापमानासोबतच हवेतील आर्द्रता सुद्धा फळगळीस कारणीभूत ठरते..अनियमित पाणीपुरवठाफळधारणा झाल्यानंतर नियमित सिंचन न केल्यास फळांची गळ होते. आंबिया बहाराची फळे टिकविण्यासाठी सिंचनाचे काटेकोर नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे फळगळ होण्याची अधिक शक्यता असते. जमिनीत प्रमाणापेक्षा जास्त पाणी असल्यास सुद्धा फळगळ होते..अयोग्य व्यवस्थापनबागेत पावसाळ्यात पाणी साचून राहिल्यास फळांची गळ होते. तसेच आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात आणि चुकीच्या पद्धतीने सिंचन केल्यास फळगळ होण्याची शक्यता असते. बऱ्याच बागांमध्ये साल काढण्यात येत नाही. साल न काढल्यास त्यावर बुरशीची वाढ होऊन ती फळगळीस कारणीभूत ठरते. अशा बागेत फळे काढल्यानंतर फळांची सड लवकर होते..कीड-रोगांचा प्रादुर्भावलिंबूवर्गीय फळबागेत कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ होते. रस शोषण करणाऱ्या पतंगांमुळे आंबिया बहराच्या फळांची ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात गळ होते. प्रादुर्भावग्रस्त फळे हाताने दाबून पाहिल्यास त्याला छिद्र पडलेले दिसते . त्यातून रस बाहेर येतो. काही फळे फायटोप्थोरा, कोलोटोट्रीकम, अल्टरनेरीया या बुरशींच्या प्रादुर्भावामुळे गळून पडतात. अल्टरनेरीया बुरशीचा फुलांच्या बिजांडावर प्रादुर्भाव होऊन फळ काढणीच्या अवस्थेत फळगळ होते. अशी फळे कापल्यास फोडीजवळ काळा पट्टा आढळून येतो..अन्नद्रव्यांची कमतरताकाही बागांमध्ये फळधारणा चांगली झाल्यानंतर सुद्धा फळांची गळ होते. अशावेळी खूप कमी फळे झाडावर राहतात. झाडांची फळधारणा होण्याची क्षमता आणि आलेली फळे टिकवून ठेवण्याची क्षमता या बाबी जमिनीचा मगदूर आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता यावर अवलंबून असते. जमिनीत चुना व जस्ताचे प्रमाण कमी असल्यास देखील फळगळ होते..संजीवकांचा अभावझाडातील नैसर्गिक संजीवकांचे प्रमाण कमी झाल्यास फळगळ होते. या फळगळीमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येते. ही फळगळ वेळीच उपाययोजना करून रोखणे अत्यंत आवश्यक असते. अन्यथा उत्पादनात मोठी घट येते..वेगवेगळ्या टप्प्यात होणारी फळगळफळगळीचा कालावधी आंबिया बहारवेळ गळ (टक्के)फळ धारणेची वेळ फेब्रुवारी-मार्च ६७उन्हाळा एप्रिल-मे १९.२०पक्वतेपूर्वी जून-सप्टेबर ७.८तोडणीपूर्वी ऑक्टोबर-डिसेंबर १.२.Fruit Orchard: हवामान बदलाचा फळबागांवर परिणाम! केळी-द्राक्ष-आंब्याची घ्या योग्य काळजी.फळगळ कमी करण्यासाठी उपायसेंद्रिय व रासायनिक खतांची मात्रा शिफारशीप्रमाणे योग्य प्रमाणात व योग्यवेळी द्यावी. नत्राची अर्धी मात्रा अधिक स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा पहिले पाणी देण्याच्या वेळी द्यावी. उरलेली नत्राची अर्धी मात्रा फळे वाटण्याएवढी झाल्यावर द्यावी. खते बांगडी पद्धतीने द्यावीत. शक्यतो खते ठिबक सिंचनाद्वारे द्यावीत.जमिनीचा मगदूर, झाडाचे वय आणि शाखीय वाढ पाहून पाण्याच्या पाळ्यांमध्ये ८ ते १२ दिवसांचे अंतर राखावे. पाण्याची कमतरता असल्यास एक दांड किंवा दुहेरी दांड पद्धतीने किंवा अर्धे आळे पद्धतीने झाडांना पाणी द्यावे..पावसाळ्यात बागेत पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. बागेत साचलेल्या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी. मुख्यतः ऑगस्ट-सप्टेबर महिन्यात बागेत पाणी साचून राहिल्यास व पाण्याचा निचरा न झाल्यास फळांची गळ अधिक होते. बागेत पाणी साचू नये यासाठी दोन किंवा तीन ओळीत एक याप्रमाणे बागेच्या उताराच्या दिशेने उथळ चर काढून पाणी बागेच्या बाहेर काढावे.बागेभोवती दक्षिण व पश्चिम दिशेने शेवरी सारख्या वारा प्रतिबंधक झाडांची लागवड करावी. झाडावरील सल नियमित काढून बुरशीनाशकाची फवारणी करावी..आंबिया बहरातील फळांची प्रथमावस्थेत आणि ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात होणारी फळगळ कमी करण्यासाठी प्रत्येक महिन्यात नॅप्थिल ॲसिटिक ॲसिड (एन.ए.ए.) (१० पीपीएम) १ ग्रॅम अधिक युरिया (१ टक्का) १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पावसाळ्यात ही फवारणी करताना द्रावणात कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळावे. (ॲग्रेस्को शिफारस)नागपूर संत्र्यातील फळगळ व्यवस्थापनासाठी पोटॅशियम नायट्रेट १ किलो अधिक अझोक्सिस्ट्रॉबिन (१८.२ टक्के) अधिक डायफेनोकोनाझोल (११.४ टक्के) १०० मिलि (संयुक्त बुरशीनाशक) अधिक जिबरेलिक ॲसिड १ ग्रॅम किंवा पोटॅशियम नायट्रेट १ किलो अधिक टेब्युकोनाझोल (५० टक्के) अधिक ट्रायफ्लॉक्सिस्ट्रॉबिन (२५ टक्के डब्ल्यूजी) (संयुक्त बुरशीनाशक) ५० ग्रॅम अधिक जिबरेलिक ॲसिड १ ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अशा तीन फवारण्या कराव्यात. (ॲग्रेस्को शिफारस).तेलकट डागनागपूर संत्रा फळ पिकावरील तेलकट डाग या रोगाच्या एकात्मिक व्यवस्थापनाकरिता शेणखतासह मिश्रित बायो-डीकंपोझर १ किलो प्रति झाड याप्रमाणे वापर करावे. प्रतिबंधात्मक फवारणी म्हणून हॉर्टीकल्चरल मिनरल ऑइल (२ टक्के) २०० मिलि याप्रमाणे जुलै, ऑगस्ट आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये फवारणी करावी. किंवा हेक्साकोनाझोल (४ टक्के) अधिक झायनेब (६८ टक्के डब्ल्यूपी) (संयुक्त बुरशीनाशक) १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. (ॲग्रेस्को शिफारस).रसशोषक पतंगआंबिया बहाराच्या फळातील रस शोषणाऱ्या पतंगाचा प्रादुर्भाव सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आढळतो. यासाठी बागेच्या परिसरातील गुळवेल, वासनवेल, चांदवेल इत्यादी तणांचा नाश करावा. तसेच बागेत रात्री धूर केल्यास पतंगाचा प्रादुर्भाव कमी होतो..बागेत खाली गळून पडलेली फळे दररोज गोळा करून खड्ड्यात पुरून टाकावीत.पसरट भांड्यात गुळाचे पाणी अधिक संत्र्याचा रस अधिक कोणतेही आंतर प्रवाही कीटकनाशकाचे द्रावण तयार करून हे भांडे झाडावर लटकविल्यास पतंगाचा प्रादुर्भाव कमी होतो.प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी अर्क (५ टक्के) ५० ग्रॅम किंवा निमतेल १० मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.- डॉ. सुरेंद्र पाटील, ९८८१७ ३५३५३(फळशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.