Heatwave Effect on Agriculture: विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत एप्रिल महिन्यातच तापमानाने ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याने शेतीसह फळबागांना मोठा फटका बसत आहे. प्रखर उष्णतेमुळे विशेषतः नागपुरी संत्रा पट्ट्यात फळगळती आणि डागाळणी वाढली असून, सुमारे दोन लाख टन उत्पादन प्रभावित होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे..वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी शेतीकामांसाठी पहाटेचा पर्याय स्वीकारताना दिसत आहेत. अकोला व अमरावती जिल्ह्यात तापमान ४६.९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील तापमान ४५ अंशांवर स्थिरावल्याने स्थिती अधिक चिंताजनक बनली आहे. .अमरावती जिल्हा नागपुरी संत्र्याच्या लागवडीसाठी राज्यात अग्रस्थानी असून राज्यातील एकूण सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल एक लाख हेक्टर क्षेत्र या जिल्ह्यात आहे. नागपूरसह इतर भागांत प्रत्येकी सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड आहे. सध्या आंबिया बहरातील गावरान बोराच्या आकाराची फळे झाडावर असून ती तीव्र उन्हामुळे काळवंडत आहेत. परिणामी, मोठ्या प्रमाणावर फळगळती वाढली आहे..Heatwave Crop Damage : कांदा उत्पादनाला अतिउष्णतेचा फटका.‘महाऑरेंज’चे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबिया बहरातील एकूण उत्पादन क्षमता सहा ते सात लाख टनांच्या दरम्यान आहे. मात्र उष्णतेच्या लाटेमुळे आतापर्यंत सुमारे दोन लाख टन फळे डागाळून गळून पडली आहेत. सरासरी ३० हजार रुपये प्रति टन दर गृहीत धरल्यास कोट्यवधी रुपयांचे नुकसान संत्रा उत्पादकांना सहन करावे लागत आहे. तापमानाचा हा कल कायम राहिल्यास पुढील काळात नुकसान आणखी वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली..या पार्श्वभूमीवर ‘महाऑरेंज’ने संत्रा पट्ट्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन नुकसानभरपाईची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे संत्र्याखालील सर्वाधिक क्षेत्र वरुड आणि मोर्शी या दोन तालुक्यांतच आहे. या भागात संत्रा बागा जगविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा करण्यात आला. त्याच्या परिणामी, हे दोन्ही तालुके ड्राय झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. परिणामी, या दोन्ही तालुक्यांत पाण्याच्या उपशावर निर्बंध लादण्यात आले. त्याचाही फटका बागांना बसत आहे. या भागात नव्याने बोअरवेल घेण्यास मनाई करण्यात आली आहे..Heatwave Crop Damage: उन्हाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर; पिकांना मोठा फटका.दरम्यान, खरीप हंगामाच्या मशागतीची कामे सुरू असून उष्णतेमुळे बहुतांश शेतकरी सकाळी लवकरच कामे उरकण्यावर भर देत आहेत. दुपारच्या सत्रात कामे पूर्णपणे ठप्प होत असल्याचे चित्र आहे..नदी-नाले कोरडे; पशुधनाचा पाणीप्रश्न तीव्रविदर्भातील अनेक भागांत नदी-नाले आटल्याने पशुधनाच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. महागाव तालुक्यातील पूस नदीचे पात्र कोरडे पडले असून, वेणी येथील लघू प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. जलस्रोतांच्या तुटवड्यामुळे पशुधन व्यवस्थापनासमोरही मोठे आव्हान उभे ठाकले आहे..निर्यात खोळंब्यानंतर दुहेरी फटकायापूर्वी बांगलादेशने आयात शुल्क वाढवल्याने संत्र्याच्या निर्यातीवर परिणाम झाला होता. परिणामी, देशांतर्गत बाजारात विक्री करताना अपेक्षित दर मिळाला नव्हता. या संभाव्य नुकसानीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत्रा बागायतदारांसाठी मदत जाहीर केली होती. आता उष्णतेमुळे होणारी फळगळती हा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी अशी आमची मागणी आहे, असे संत्रा उत्पादक श्रीधर ठाकरे यांनी सांगितले..विदर्भातील संत्रा पट्ट्याची सद्यःस्थितीउत्पादन क्षमता - ६-७ लाख टनसंभाव्य नुकसान - सुमारे २ लाख टनप्रमुख कारणे - उष्णतेची लाट, पाण्याची टंचाई.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.