कृष्णा काळे, चेतन थोटे संत्रा हे लिंबूवर्गीय फळ पोषणमूल्यांनी समृद्ध, आरोग्यासाठी लाभदायक आणि प्रक्रिया उद्योगासाठी महत्त्वाचे मानले जाते. चव, सुगंध आणि पोषणमूल्य यामुळे संत्रा फळाखालील लागवड क्षेत्रात वाढ होत आहे. संत्र्याचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असून शरीर निरोगी राहते. तसेच संत्र्यावर प्रक्रिया करून त्यावर आधारित उद्योगाची उभारणी केल्यास उत्पन्नाचे साधन उपलब्ध होते. त्यामुळे संत्रा हे केवळ फळ नसून आरोग्य आणि अर्थकारण असे दोन्ही दृष्टीने महत्त्वाचे ठरते..संत्र्यामध्ये जीवनसत्त्व क मुबलक प्रमाणात असते. यासह जीवनसत्त्व अ, पोटॅशिअम, कॅल्शिअम, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स यांचा समृद्ध स्रोत म्हणून संत्रा ओळखले जाते. यामध्ये कॅलरी कमी असल्यामुळे संत्रा पचनास हलका मानला जातो.सामान्यपणे ताजी संत्रा फळे साल काढून खाल्ली जातात. मात्र संत्रा फळावर प्रक्रिया केल्यास त्यापासून विविध मूल्यवर्धित पदार्थांची निर्मिती करता येते. संत्र्यापासून मुरंबा, जॅम, जेली आणि स्क्वॅश असे अनेक पदार्थ तयार करता येतात. संत्र्याच्या सालींपासून कँडी, पावडर तसेच सुगंधी तेल काढले जाते. हे तेल औषधनिर्मिती, सौंदर्यप्रसाधने आणि अन्नउद्योगात वापरले जाते. संत्र्यापासून मूल्यवर्धित केलेल्या पदार्थांना बाजारात मागणी चांगली आहे. त्यासाठी संत्रा मूल्यवर्धन अत्यंत फायदेशीर ठरते..Orange Processing: संत्रा ग्रेडिंग-कोटिंगचा पथदर्शी प्रकल्प बासनात .मूल्यवर्धित पदार्थजॅमसंत्रा जॅम तयार करण्यासाठी पूर्ण परिपक्व झालेली निरोगी फळे निवडावीत. संत्रा फळे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. फळांवरील साल, पांढरा पापुद्रा काढून चाकूने फोडीचे लहान तुकडे करून त्यातील बिया काढून टाकाव्यात. हे तुकडे मिक्सरमध्ये फिरवून लगदा तयार करावा. एका भांड्यामध्ये संत्र्याचा तयार लगदा, पाणी घालून मध्यम आचेवर शिजण्यास ठेवून द्यावे. मिश्रण शिजत असताना त्यात साखर घालून सतत ढवळत राहावे. साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवावा. मिश्रण घट्ट होईपर्यंत साधारण २५ ते ३० मिनिटे शिजवावे. मिश्रण शिजत असताना वर येणारा फेस काढून टाकावा. जॅम घट्ट होत असताना त्यात लिंबाचा रस घालावा. लिंबाच्या रसामुळे जॅमला योग्य घट्टपणा येतो आणि टिकाऊपणा वाढतो. प्रमाणीकरणानुसार जॅम बनविताना कमीत कमी ४५ टक्के लगदा, एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण ६८ टक्के व आम्लता ०.६ ते १.० टक्का इतकी ठेवावी. तयार जॅम निर्जंतुक केलेल्या बरणीत भरून हवाबंद करून थंड व कोरड्या जागी साठवावा..आरोग्यदायी फायदेहिवाळ्याच्या दिवसांत अनेक आजारांची तीव्रता वाढते. यापासून बचाव करण्यासाठी संत्रा फळाचे सेवन अत्यंत आरोग्यदायी मानले जाते.संत्र्यामध्ये जीवनसत्त्व क मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे संत्रा सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. थंडीमध्ये होणारा सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांपासून संरक्षण मिळते. नियमित संत्रा सेवन केल्यास शरीरातील प्रतिकारशक्ती मजबूत राहते.नियमित संत्रा सेवन केल्यास पचनक्रिया सुधारते. संत्र्यातील तंतुमय पदार्थांमुळे आतड्यांची हालचाल सुरळीत होऊन पोटाचे आरोग्य उत्तम राहते. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो..Orange Processing Project: आधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प दोन वर्षांनंतरही कागदावरच .हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी संत्रा सेवन फायदेशीर ठरते. संत्र्यातील पोटॅशिअम रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. तर तंतुमय पदार्थ व अँटिऑक्सिडंट्स कोलेस्टेरॉल कमी करण्यास उपयुक्त ठरतात. संत्रा हे जीवनसत्त्व क, जीवनसत्त्व अ, पोटॅशिअम, कॅल्शिअम, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स यांचा समृद्ध स्रोत आहे.संत्र्यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असल्यामुळे संत्रा पचनास हलका मानला जातो. जीवनसत्त्व अ, पोटॅशिअम, कॅल्शिअम, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स यांचा समृद्ध साठा असतो.त्वचेचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी संत्रा अत्यंत लाभदायक आहे. संत्र्यामध्ये जीवनसत्त्व क मुळे त्वचा तजेलदार, चमकदार राहते. चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत.वजन नियंत्रणासाठीही संत्रा सेवन फायदेशीर ठरते. संत्रा फळांचे सेवन केल्यानंतर त्यातील फायबरमुळे पोट भरल्यासारखी भावना होते. त्यामुळे अनावश्यक खाणे टाळले जाते..स्क्वॅशसंत्रा स्क्वॅश तयार करण्यासाठी प्रथम पिकलेल्या संत्र्यांचा रस काढून तो स्वच्छ मलमलच्या कापडातून गाळून घ्यावा. स्क्वॅश दर्जेदार होण्यासाठी त्यामध्ये किमान २५ टक्के फळरस, एकूण विद्राव्य घटक (TSS) ४५ टक्के आणि आम्लता ०.८ टक्का असणे आवश्यक आहे. या प्रमाणीकरणानुसार संत्रा स्क्वॅश तयार करण्यासाठी संत्र्याचा रस १ लिटर, साखर १.६९४ किलो, सायट्रिक आम्ल २० ग्रॅम, पाणी १२५० मिलि आणि सोडिअम बेन्झोएट २ ग्रॅम या प्रमाणात साहित्य वापरावे. प्रथम एका भांड्यात साखर व पाणी घेऊन चांगले उकळून घ्यावे. हे द्रावण उकळत असताना येणारा फेस वेळोवेळी काढून घ्यावा. तयार पाणी व साखरेचे द्रावण थंड करून त्यामध्ये संत्र्याचा रस मिसळून घ्यावा. नंतर दोन ग्लासमध्ये थोडा थोडा स्क्वॅश घेऊन एकामध्ये सायट्रिक आम्ल व दुसऱ्यामध्ये सोडिअम बेंझोएट घेऊन विरघळून घ्यावे व ते स्क्वॅशमध्ये टाकावे. तयार स्क्वॅश पुन्हा मलमलच्या कापडातून गाळून घ्यावा. त्यानंतर निर्जंतुक बाटल्यांमध्ये हवाबंद करून कोरड्या व थंड जागी साठवावा. स्क्वॅशपासून सरबत तयार करताना १ भाग स्क्वॅशमध्ये २ ते ३ भाग थंड पाणी मिसळून वापर करतात. आवश्यकतेनुसार बर्फ घालून थंडगार पेय म्हणून हे सरबत पिण्यासाठी वापरले जाते..जेलीसंत्र्यापासून जेली तयार करण्यासाठी रसरशीत ताजी व पक्व फळे निवडावीत. फळे पाण्याने स्वच्छ धुऊन, सोलून, पांढरा पापुद्रा काढून स्वच्छ करून घ्यावीत. नंतर स्वच्छ केलेल्या फोडींचे छोटे छोटे काप करून घ्यावेत. एका स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात हे काप घेऊन ते बुडतील एवढ्या पाण्यात मंद आचेवर उकळत ठेवावेत. थोड्या वेळाने शिजविलेले फोडींचे तुकडे मलमलच्या कापडात बांधून हलक्या हाताने दाबून रस काढून घ्यावा. शिजवलेल्या फोडींचा रस दुसऱ्या स्टीलच्या पातेल्यात जमा करावा. .या रसात १:१ या प्रमाणात साखर टाकून मंद आचेवर पुन्हा उकळण्यास ठेवावे. मिश्रणास उकळी येण्याआधी त्यात साखर हळूहळू घालावी आणि सतत ढवळत राहावे. साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर गॅस मंद करावा. मिश्रण घट्ट होईपर्यंत साधारण २० ते २५ मिनिटे उकळावे. मिश्रणावर येणारा फेस चमच्याने काढून टाकावा. जेलीला योग्य घट्टपणा येण्यासाठी मिश्रण उकळल्यानंतर लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण एकूण विद्राव्य घटक ६५ ते ६७ अंश ब्रिक्स वर येईपर्यंतच उकळावे. तयार जेली निर्जंतुक बरणीत भरून हवाबंद करून ठेवावी. तयार झालेली जेली थंड व कोरड्या जागी साठवावी.- कृष्णा काळे ८८०५९६८५३६ (प्रशिक्षक, कृषी पुरवठा साखळी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, कौशल्य विकास केंद्र, नागपूर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.