अच्युत गंगणेप्रस्थापित व्यवस्थेतील सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काही शेतकरी पूत्र व्यवस्था परिवर्तनाच्या चळवळीत सामील झाले. अशा अनेक चळवळींपैकी एक शेतकरी संघटना. अत्यंत जीवंत, संवेदनशील आणि जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घालणारी आणि सर्वच प्रस्थापित चळवळींच्या विचारांची माहिती देणारी अर्थशास्त्रीय चळवळ ठरली. या चळवळीचे नेते शरद जोशी यांची आज (ता.१२) पुण्यतिथी. त्यानिमित्ताने शेतकऱ्यांची परिस्थिती आणि आंदोलनाचा घेतलेला हा आढावा..शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांना आपल्यातून जाऊन आज (ता.१२) एक दशक पूर्ण झाले. चार दशके शरद जोशी यांनी वेगवेगळ्या प्रसंगी कालानुरूप शेतकरी मेळावे, परिषदा आणि अधिवेशने घेऊन नवे विचार मांडले. त्या आनुषंगिक आंदोलने देखील केली. सारा देश शेतकरी आंदोलनांनी ढवळून निघाला. वेगवेगळ्या प्रांतातील शेतकरी संघटनादेखील या शरद जोशींच्या आंदोलनाने प्रभावित झाल्या..Sharad Joshi : ‘एक होते शरद जोशी आणि असंख्य वेडेपीर’ पुस्तक अमूल्य ठेवा.एवढेच नाही तर अटलबिहारी वाजपेयी, चंद्रशेखर, व्ही. पी. सिंग, डॉ. मनमोहनसिंग हे माजी पंतप्रधान देखील या शेतकरी आंदोलनांच्या झंजावाताने प्रभावित झाले होते. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे, माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री प्रमोद महाजन, माजी केंद्रीय रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस आदि राष्ट्रीय नेते मंडळी ही शरद जोशींच्या आंदोलनाने प्रभावित होऊन अनेक सभा- मेळाव्यांमध्ये सामील झाली होती. एवढे सारे होऊन ही शेतीचे प्रश्न आज ही कायमच आहेत. शेती व्यवसायाचे शोषण थांबलेले नाही आणि त्याचे सारे दुष्परिणाम अजूनही दिसत आहेत. .साऱ्या संकटांचे, आपत्तींचे परिणाम शेतकऱ्यांनाच का भोगावे लागतात या प्रश्नाचे उत्तर अजूनही सापडत नाही. अंबाजोगाई येथे एकदा शेतकरी संघटनेची ज्वारी परिषद भरली होती. त्या वेळी मी शाळेत असेन. आम्ही शाळा, माहाविद्यालयातील शेतकऱ्यांची मुले या परिषदेला हजर होतो. शरद जोशींचे भाषण चालू होते, सारे लोक शांतपणे कानात जीव ओतून शरद जोशींना ऐकत होते. शरद जोशी सांगत होते, की दुष्काळ पडल्यावर शेतकऱ्यांनाच दुष्काळात रोजगार हमीच्या कामावर खडी फोडायला का जावं लागतं? इकडे शहरातील भाजीपाला मंडईमध्ये दोन गृहिणी भाजी खरेदी करायला आल्या, तर त्या एकमेकींत हितगुज करताना म्हणतात, की आज बाजारात टोमॅटो फारच छान आला आहे!.Sharad Joshi : शरद जोशींचा अंगारमळा लवकरच इतिहास जमा होईल... .वाटाणा तर सुंदरच आहे! आणि इकडे शेतकरी मायमाउली मात्र सरकारच्या रोजगार हमीच्या कामावर खडी फोडायला जाते. हे गौडबंगाल नेमके काय आहे? हे समजून सांगण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी शरद जोशींनी शेतकऱ्यांची संघटना केली आणि संपूर्ण आयुष्य या एकाच कामासाठी दिले. त्यांच्याबरोबर देशभरातील लाखो शेतकऱ्यांनी शेतकरी प्रश्नांसाठी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. नवीन पिढी ही नव्या जोमाने ऊस आंदोलनात उतरताना दिसत आहे. तरी शेतकऱ्यांचे दारिद्र्य, गरिबी, आत्महत्या, कर्जबाजारीपणा, गुलामी, कोडगेपणा आणि शेतीमालाच्या भावाचे गौडबंगाल कोणालाच का कळत नाही, का वळत नाही? .स्थलांतराचा प्रश्न गंभीर‘ज्याचं जळत, त्यालाच कळत’ असं म्हणतात, ते ही काही खरं होताना दिसत नाही. एक मात्र नक्की खरं ‘ओली पडो का सुकी पडो’ मरतो फक्त शेतकरी. आता ही मरणाची लागण आत्महत्यांच्या रूपाने शेतकऱ्यांच्या घरात घुसली आहे. शेती परवडत नाही म्हणून शेतकऱ्यांची अनेक पोरं शिकली. आपल्या बापाच्याच लुटीसाठी काम करणाऱ्या नोकरशाही नावाच्या यंत्रणेत कामाला लागली. कुणी डॉक्टर, इंजिनिअर झाली. प्रशासनात उच्च पदस्थ, तहसीलदार, आयुक्त, सचिव इत्यादी पदांवर अभिमानाने आरूढ झाली..Sharad Joshi Memorial : शरद जोशींचे स्मारक ठरेल शक्तिस्थळ.तर काही जण कंपन्यांमध्ये चांगल्या पदावर गेले. काही जण स्वतःचा व्यवसाय करू लागले. काहींनी स्वतःच्या कंपन्या स्थापन केल्या. जी पोरं १० वीला, १२ वीला पदवीच्या शेवटच्या वर्षांत नापास झाली, ती देखील शहरात छोट्या-मोठ्या कामाला लागली. एका बाजूला बापाच्या लुटीचा परिणाम म्हणजे वैभवशाली इमारतीमधील ‘इंडिया’ आणि दुसऱ्या बाजूला बापाच्याच लुटीचा विपरीत परिणाम म्हणजे दरिद्री झोपडपट्टीतील ‘भारत’ यांचा एकत्रित अनुभव घेत ग्रामीण पिढी आपल्या जीवनाची कशीबशी गुजराण करत आहे..दुसरीकडे काठावर पास, नापास झालेली काही शेतकऱ्यांची पोरं जी गावात थांबली, त्यांनी आपल्या बापाच्या शेतीचं हिरवं स्वप्न आधुनिक शेती करायच्या नादात कसंबसं तगवून ठेवलं. त्यातलेच काही जण गावातल्या राजकारणाच्या नादाला लागले. गाव पातळीवर सरपंच, सोसायटीचे अध्यक्ष झाले. तालुका, जिल्हा पातळीवर, सहकारी बॅंकेवर, बाजार समितीवर, पंचायत समिती, जिल्हा परिषद, साखर कारखाना, खरेदी विक्री संघ आणि कोणातरी नेत्याचा हात धरून स्वप्नात मश्गूल होऊन राजकारण करताना बरबाद झाले. काही थोड्या फार लाभार्थ्यांचे थोडंफार, तर काहींचे बरेही झाले..Sharad Joshi : कांदा लढ्यातूनच आर्थिक क्रांतीची सुरवात! .समग्र शेतकरी आंदोलनप्रस्थापित व्यवस्थेतील सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काही शेतकरी पूत्र व्यवस्था परिवर्तनाच्या चळवळीत सामील झाले. अशा अनेक चळवळीपैकीच शेतकरी संघटना ही एक अत्यंत जीवंत, संवेदनशील आणि जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घालणारी तसेच सर्वच प्रस्थापित चळवळींच्या विचारांची माहिती देणारी अर्थशास्त्रीय चळवळ ठरली. प्रचंड लोकमान्यता, राजमान्यता, विद्वत्ता मान्यताप्राप्त झाली. तरी या प्रस्थापित शेती शोषणाच्या व्यवस्थेतून शेती व्यवसायाची अजूनही सुटका होत नाही. शेतीला चांगले दिवस येतील अशी दूरदूरपर्यंत कुठेच शक्यता दिसत नाही. शेतकऱ्यांच्या दुरवस्थेबद्दल, आत्महत्येबद्दल सर्वच सहवेदना व्यक्त करतात. .एकदा मार्गदर्शन करताना शरद जोशी म्हणाले होते, की सरकार समस्या क्या सुलझाएगी, सरकार ही एक समस्या है. तरीदेखील शेतकरी नेते तीच-तीच आंदोलने करून सरकारकडूनच प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न चिकाटीने करीत आहेत. काही शेतकरी नेते आमदार, खासदार होऊन या शोषणाच्या व्यवस्थेत सामील झाले आहेत. काही याच व्यवस्थेत सामील होण्यासाठी धडपडत आहेत. त्यांची आता आंदोलनजीवी म्हणून संभावना होत आहे. गेली चार दशके झाली, ही शेतकऱ्यांची चळवळ चालू आहे. नेते हाताला काही तरी लागेल म्हणून धडपडत आहेत. तर शेतकरी आपले प्रश्न मार्गी लागेल म्हणून तळमळत आहेत. परंतु चार दशकांच्या आंदोलनातूनही शेतीचे प्रश्न अजूनही सुटत नाहीत. शेतकरी नेत्यांच्या विचारांना कालसुसंगत नवी पालवी फुटत नाही, अशी खंत ही शरद जोशींनी अनेकदा व्यक्त केली होती. आंदोलनांतील रटाळपणा, तोच तोपणा, तीच ती रक्त, घाम आणि अश्रू यांचे उदात्तीकरण करणारी भावनिक कालविसंगत भाषणबाजीची याची खंत त्यांना वाटत होती. .शेतीच्या शोषणाचे दुष्परिणाम हे शेतकऱ्यांच्याच वाट्याला का येतात? निसर्गाचा कोप झाला, अतिवृष्टी किंवा आवर्षण झाले, दुष्काळ पडला तर बाकी सारे या व्यवस्थेचे घटक मजेत असतात. शेतकरी मात्र कर्जबाजारी होतो. त्याला गरिबी, महागाईला तोंड द्यावेच लागते. त्याला अन्नदाता म्हणून शेतात राबण्याची जबाबदारी पार पाडावी लागते. तर त्याचा मुलगा देशाच्या सीमेवर संरक्षणाची जबाबदारी आपला जीव मुठीत घेऊन पार पडतच असतो. शेतीही करा, आंदोलनेही करा आणि पुन्हा दरवर्षी आंदोलने करीत बसा. तोट्याची शेती ही अंगवळणी पडली. तुटपुंज्या यशाची पराभूत आंदोलने ही अंगवळणी पडली आहेत. जंगली जनावरांचा त्रास, दुष्काळ, बदलते हवामान, सरकारच्या शेतीविरोधी धोरण, .कमी भाव, महागाईचे परिणाम आत्तापर्यंत शेतकरी भोगत आला आहे. आता मात्र परिस्थितीने दिशा बदलायला सुरुवात झाली आहे. शेतीविरोधी धोरणांचे दु:ष्परिणाम सर्वांनाच भोगायची वेळ येऊन ठेपली आहे. सर्व राष्ट्रीय समस्या शेती विरोधी धोरणांचाच परिणाम आहेत. तेव्हा या शोषण व्यवस्थेच्या विरोधात ही अमानुष व्यवस्था बदलण्यासाठी एक सर्वस्तरीय समग्र लढा उभारण्याची गरज आहे. -अच्युत गंगणे ८८०६९ ३०३९४(लेखक शेतकरी चळवळीतील प्रयोगशील कार्यकर्ते आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.