हनुमंत पवारFarmer Crisis: पुराचं पाणी गेलं, पण आमची स्वप्नं वाहून गेली...’ ही वेदनादायी हाक आज मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या ओठांवर आहे. गेल्या काही महिन्यांत अवकाळी पाऊस, सलग अतिवृष्टी आणि नद्यांना आलेले महापूर यांनी या प्रदेशाचा कणा मोडला आहे. गावे पाण्याखाली गेली, पोटच्या पोराला जपतो तशी जपलेली पिकं, शेतं वाहून गेली, हजारो जनावरे दगावली, घरे कोसळली. लाखो कुटुंबं एका क्षणात हवालदिल झाली. मराठवाडा हा आधीच दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जाणारा प्रदेश. .राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेचा शिकार झालेला भाग. विकासाचा अनुशेष आमच्या पाचवीला पुजलेला. वर्षानुवर्षं पाण्याची कमतरता, शेतीवरचे कर्ज, बाजारातील अस्थिरता, रोजगाराचा अभाव या संकटांनी शेतकऱ्यांना त्रास दिला आहे. आता या पुरामुळे त्यांचं उरलेसुरले आयुष्यही ढासळलं आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था अक्षरशः कोलमडून पडली आहे. शेतीवर अवलंबून असलेले शेतकरीच नव्हे, तर दूध धंद्यावर आणि रोजंदारीवर जगणारे शेतमजूरही उपासमारीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. इतिहास साक्ष देतो, जेव्हा पश्चिम महाराष्ट्रात महापूर आले, सांगली-कोल्हापूर पाण्याखाली गेले, तेव्हा संपूर्ण राज्य मदतीला धावून आलं. किल्लारीच्या भूकंपानंतर राज्यभरातून मदतीची लाट उसळली. आज मराठवाडा त्याच परिस्थितीत उभा आहे. मंदिर-ट्रस्ट, उद्योगपती, कलाकार, स्वयंसेवी संस्था मदतीला पुढे येत आहेत, पण ती मदत थेंबभर आहे. .पूराची व्याप्तीयंदाच्या पुरामुळे मराठवाड्यातील गावोगावी अक्षरशः हाहाकार माजला आहे. नद्यांनी तटबंदी ओलांडली, धरणं ओसंडून वाहिली, आणि शेकडो गावे पाण्याखाली गेली. महसूल व कृषी खात्याच्या प्राथमिक आकडेवारीनुसार मराठवाड्यातील लाखो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले असून त्यात खरिपातील महत्त्वाची पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. सोयाबीन, कापूस, बाजरी, मका यांसारखी पिकं संपूर्ण नष्ट झाली. शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट आणि गुंतवणूक काही तासांत पाण्याबरोबर वाहून गेली. या पुराने मानवी जीवितहानीही मोठ्या प्रमाणात केली आहे. १०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू, तर शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. गावोगावी शेकडो घरं कोसळली, हजारो घरांना भेगा पडल्या. रस्ते, पूल, वीज खांब, शाळा आणि आरोग्य केंद्रे वाहून गेली. वाहतुकीची साधनं खंडित झाली, वीजपुरवठा खंडित झाला. .Maharashtra Flood : पंचनाम्यांचा सोपस्कार कशासाठी?.शाळा बंद पडल्यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण विस्कळीत झालं. सर्वात मोठा फटका बसला तो पशुधन आणि दुधाच्या अर्थव्यवस्थेला. हजारो गायी-म्हशी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. शेकडो गोठे कोसळले. चारा पूर्ण संपला. दूध संकलन केंद्रं बंद पडली. दुधाच्या रोजंदारीवर चालणारी हजारो कुटुंबं हातावर पोट घेऊन बसली. ही आकडेवारी केवळ सरकारी अहवालापुरती मर्यादित नाही. प्रत्येक आकड्यामागे एका शेतकऱ्याचं, एका मजुराचं, एका कुटुंबाचं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य आहे..पंचनाम्याचे नवे पर्यायआपत्ती निवारणाच्या प्रक्रियेत पंचनाम्याला फार मोठं स्थान दिलं जातं. शासन याच अहवालांच्या आधारावर मदतीचे निर्णय घेतं. पण प्रत्यक्ष वास्तव वेगळं आहे. पंचनामा ही पद्धत कालबाह्य, वेळखाऊ आणि अपुरी ठरत आहे. प्रथम, खरी हानी लगेचच दिसून येत नाही. पूर ओसरल्यानंतरच अनेक घरांना भेगा पडतात, छप्परं गळतात, पिकं कुजतात, जनावरे आजारी पडतात किंवा दगावतात. पण पंचनाम्याचा कालावधी तेव्हाच संपतो आणि उशिराने दिसलेलं नुकसान नोंदीत येतच नाही. दुसरं म्हणजे, महसूल यंत्रणेकडे मनुष्यबळ मर्यादित आहे. हजारो गावांमध्ये, लाखो शेतांमध्ये अधिकारी वेळेत पंचनामा करतात हे प्रत्यक्षात अशक्य आहे. .Maharashtra Flood Relief : महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करणार.परिणामी, अनेक शेतकरी वंचित राहतात किंवा भरपाई खूप उशिरा मिळते. तिसरं म्हणजे, पंचनाम्यात पारदर्शकतेचा अभाव आहे. भ्रष्टाचार, राजकीय दबाव, स्थानिक पातळीवरील पक्षपातीपणा यामुळे खऱ्या गरजूंना मदत मिळत नाही, तर काहींना अन्याय्य लाभ मिळतो. अनेक ठिकाणी पाणी ओसरले नसल्यामुळे शेतकरी, कर्मचारी प्रत्यक्ष बाधित क्षेत्रावर पोहोचू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर पंचनाम्याच्या जुन्या पद्धतीवर ठाम राहणं योग्य नाही..शासनाकडे आधीच प्रचंड माहिती आहे; पीकपेरा नोंदी, हवामान खात्याचे आकडे, सॅटेलाइट आणि ड्रोन प्रतिमा. पडलेल्या पावसाची नोंद. मागील तीन वर्षांतील खरीप उत्पन्न सरासरी आकडेवारी ही साधनं वापरून नुकसान निश्चित करता येऊ शकतं. यामुळे वेळ वाचेल, भ्रष्टाचार कमी होईल आणि खऱ्या अर्थाने पारदर्शकता वाढेल. आज शेतकऱ्याला केवळ कागदोपत्री पंचनाम्याचा अहवाल नको; त्याला तातडीची मदत, थेट खात्यातील पैसे आणि खरा दिलासा हवा आहे..जमिनीची हानीमराठवाडा हा पावसावर अवलंबून असलेला प्रदेश आहे. हजारो हेक्टरवर उभी पिकं वाहून गेली. शेतकरी उत्पादन खर्चही परत मिळवू शकत नाही. जे शेतकरी काही प्रमाणात पिकं वाचवू शकले, त्यांनाही विक्रीत तोटा सहन करावा लागत आहे. याशिवाय, फळबागा आणि पॉलिहाऊस यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. डाळिंब, मोसंबी, द्राक्ष यांसारख्या फळबागांवर प्रचंड परिणाम झाला. एखादी फळबाग उभारण्यासाठी शेतकरी वर्षानुवर्षं मेहनत करतो, लाखो रुपये गुंतवतो. .पण पूर आणि अवकाळी पावसाने या गुंतवणुकीचा पाया कोसळला. सिंचन साधनं, पंपिंग यंत्रणा, मोटारी, विहिरी, ठिबक यंत्रणा या सर्वांची हानी झाली आहे. धरणातून निघालेला गाळ शेतात साचला. सुपीक माती वाहून गेल्याने जमीन नापीक झाली आहे. हे नुकसान केवळ एका हंगामापुरतं मर्यादित नाही. पुढील अनेक वर्षे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार आहे. म्हणून केवळ मदतीच्या घोषणा पुरेशा नाहीत. शासनाने विशेष पुनरुज्जीवन आराखडा तयार करायला हवा. विशेष पावलं उचलल्याशिवाय खरीप हंगामाचं नुकसान भरून निघणं शक्यच नाही..कर्जमाफी : का गरजेची?मराठवाड्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती गेल्या अनेक दशकांपासून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कर्जमाफी ही केवळ मागणी नाही, तर जगण्यासाठीची गरज बनली आहे. कृषी अर्थव्यवस्था वाचवण्याची निकड बनली आहे. २०२४ च्या निवडणुकांमध्ये जवळपास सर्व पक्षांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलं, पण प्रत्यक्षात ती पूर्ण झालेली नाही. योग्य वेळी कर्जमाफी करण्यात येईल अशी विधानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दोन्ही उपमुख्यमंत्री तर आता यावर काही बोलायला तयार नाहीत. मार्च २०२५ पर्यंत राज्यातील एकूण कृषी कर्जाचा आकडा १,७७,२०० कोटी आहे. त्यातील केवळ पीककर्ज ६७,०५८ कोटी आहे. एवढ्या प्रचंड कर्जाच्या ओझ्यातील शेतकरी महापूरानंतर उभा राहू शकतो का? उत्तर स्पष्ट आहे ‘नाही.’.पूरग्रस्त शेतकऱ्यांकडे कर्जफेड करण्याची क्षमता उरलेली नाही. जुनं कर्ज थकल्यामुळे त्याला नवीन कर्जही मिळत नाही. परिणामी, तो सावकारांच्या जाळ्यात अडकतो. व्याजाच्या जाळ्यातून सुटका होत नाही. हीच ती परिस्थिती जी अनेकदा शेतकरी आत्महत्यांना कारणीभूत ठरते. कर्जमाफी ही केवळ निवडणूक आश्वासन राहू नये. ती तातडीची आर्थिक गरज आहे. कर्जमाफीशिवाय शेतकरी पुन्हा उभा राहू शकणार नाही. कर्जमाफीबरोबरच त्याला नवीन पीककर्ज मिळणंही अत्यावश्यक आहे, अन्यथा पुढच्या हंगामात तो शेती सुरूच करू शकणार नाही.(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक तसेच कॉंग्रेसचे कार्यकर्ते आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.