विजय सांबरेNature Conservation: भारतीय समाजाने निसर्गाला देवत्व बहाल केले आहे. निसर्गातील नानाविध घटकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा स्वभाव भारतीय लोकमानसात पिढ्यान् पिढ्या रुजलेला आहे. भारतातील सर्वच धर्म, जाती, पोटजाती, समुदाय हे निसर्गपूजक जीवनशैलीकडे शाश्वत मूल्य व सृष्टी-धर्म म्हणून पाहतात. या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब सण, उत्सव, भाषा, पेहराव, खाद्यपदार्थ, लोकसाहित्य आदी घटकांत उमटते..अश्माचमे मृत्तिकाचमेगिरयश्यमे पर्वताश्यमेवनस्पतयश्यमे हिरण्यचमेअग्निश्यमे आपश्यमेग्राम्याश्यमे पशवआरण्याश्यमे- रुद्राध्याय(या शिला, दगड, माती, हे डोंगर पर्वत, हे वनस्पतीधन, सोने. ही ऊर्जा, हे पाणी, हे गाव (संस्कृती), पशुपक्ष्यांसह अरण्य, हे सर्व माझे आहे. याचे जतन करणे, ही माझी जबाबदारी आहे.).मानव व निसर्ग यांतील अद्वैतनिसर्गाकडे पाहण्याचा भारतीय दृष्टिकोन किती व्यापक आहे, यावर हा संस्कृत श्लोक नेमके भाष्य करतो. मानव व निसर्ग हे वेगळे नसून मानव हा सृष्टी व्यवस्थेचाच एक भाग आहे. याउलट पाश्चात्य अभ्यासकांनी निसर्ग व मानव हे दोन स्वतंत्र घटक आहेत, अशी विपरीत मांडणी केल्याचे दिसते. परिसरशास्र व मानव (Human-Ecology) यांतील सहसंबंध असेल वा मानव व वनस्पती संबंध (Ethno-Botany) अशी आंतरशाखीय मांडणी करताना पाश्चात्त्य अभ्यासक मानव हा निसर्गातील एक घटक न मानता तो नैसर्गिक परिसंस्थांकडून विविध सेवा घेत असतो, असे प्रतिपादन करतात. .आपले भारतीय पर्यावरण अभ्यासक पण याच अंगाने विचार करतात. मानव व निसर्गात अद्वैत आहे, हे मान्य करायला आपण का कचरतो? ही एक प्रकारे मानसिक व बौद्धिक गुलामगिरी आहे. असो, पण आज घडीला विकासाच्या नावाखाली अनियंत्रित नागरीकरण होत आहे. विविध पायाभूत प्रकल्पांच्या उभारणीत स्थानीय निसर्ग-सृष्टी-व्यवस्था (परिसंस्था) नष्ट होत आहे व त्यावर आधारित मानवी वसाहतींचे अस्तित्व पण संपुष्टात येत आहे. असे बाधित लोक पर्यावरणीय बदलामुळे होत असलेले विस्थापित (Ecological refugees) म्हणून निराधारपणे जगताहेत..Nature Connection: ...म्हणून डोळे भरून पाहायचे!.संवर्धनाची परंपरावन व आदिवासी यांचे एक जैविक नाते आहे. या नात्याचा शास्रीय अभ्यास करणारा महत्त्वपूर्ण असा एक आंतर-शाखीय विषय आहे. त्याचे इंग्रजी नाव आहे, Human-Ecology. जगभर जंगलात राहणारा मनुष्य हा तेथील परिसंस्थेला उपयुक्त की घातक, जैवविविधतेला तारक की मारक अशी अनेक वर्षं चर्चा सुरू होती. जंगल हे मानवी वस्ती विरहित असावे, असा आग्रह एका गटाने धरला होता, तर एक गट सांगत होता, की सकारात्मक मानवी हस्तक्षेप (Positive Interference) हा वन-परिसंस्था संतुलित ठेवण्यासाठी गरजेचा आहे..जगभरात विविध ठिकाणी अभ्यास झाले, क्लिष्ट पद्धतीने चर्चा झाल्या व सरतेशेवटी निष्कर्ष काढण्यात आला, की मानवी वस्तीसह वन परिसंस्था उत्तम प्रकारे राहू शकते. जंगलातील विविध नैसर्गिक स्रोतांचे शाश्वत पद्धतीने संकलन केले (Sustainable Harvesting of Natural Resources), तर वनातील मानवी हस्तक्षेप हा उपयुक्त ठरेल अन्यथा घातक. या विषयी Human-Ecology हा विषय सविस्तर चर्चा करतो..सह्याद्रीतील भीमाशंकर ते कळसूबाई भूमंडळात आदिवासींचे व जंगलाचे शाश्वत नाते आढळते. मूळ जंगलाचे अवशेष दर्शविणाऱ्या देवरायांचे संगोपन, पाळीव प्राण्यांसाठी शाश्वत चारा देणारे राखणरान, की अशा ठिकाणचे फक्त गवत पक्व होऊन बी पडल्यावर कापून आणले जाते, मुक्त चराई होत नाही. अशा सामूहिक व्यवस्थापन असणाऱ्या संवर्धन परंपरा, त्याचबरोबर खासगी मालकीचे जंगल, वंशवृक्ष, संरक्षित मधमाश्यांचे पोळे, पवित्र डोह अशा नानविध संवर्धन परंपरा कौटुंबिक व सामूहिक पातळीवर आजही जपल्या जात आहेत. मागील शेकडो वर्षांत वातावरणात बदल झाले. .जंगलाचे शेतीत रुपांतर झाले. कुमरी शेतीचा सह्याद्रीत उगम झाला व पूर्ण पश्चिम घाटात पोहोचली. पुढे ब्रिटिश कालखंडात औद्योगिक विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करताना हजारो एकर जंगल साफ झाले. मुख्यत्वे चहा लागवडीसाठी पण उत्तम जंगलाचा बळी दिला गेला. अशी अनेक स्थित्यंतरे झाली, पण आदिवासीचे वन विषयातील समज, शहाणपण कमी झाले नाही. दूर अनगड दऱ्याखोऱ्यात ते आजही टिकून आहे..जंगल ही आमुची माउलीतुम्ही जंगलात का राहता व जंगल का जपता? काय उपयोग आहे त्याचा, असे खोचक प्रश्न जगभरातील आदिवासींना विचारले, की ते वनाशी असणारे आदिवासींचे नाते अगदी सहजपणे उलगडून सांगतात. ती आमुची माउली हाय...! असे बजावतात. आदिवासी व इतर वन निवासी समुदायाच्या दृष्टीने जंगल हे त्यांची ‘माता’ आहे. स्थानिक नैसर्गिक साधनसंपत्तीचा शाश्वत वापर कसा करावा, जतन कसे करावे, याचे परंपरागत ज्ञान व अनुभव त्यांनी आत्मसात केले आहे. आदिवासी बांधवांना जंगल हे प्रमुख पाच प्रकारच्या सेवा पुरवते. 6-F व 1-W या संकल्पनेद्वारे जंगलातील जीवनावश्यक असलेल्या सहा-सात प्रमुख बाबी समजून घेऊ..Food (रान जिन्नसा / मेवा) : आदिवासी समाज जंगलातील फळे, भाज्या, कंदमुळे, बिया आणि मध यांचा उपयोग अन्न म्हणून करतात.Fuel wood (जळावू लाकूड फाटा) : स्वयंपाकासाठी आणि उष्णतेसाठी आवश्यक असणारे वाळलेले लाकूड जंगलातूनच मिळते, ज्याचा वापर आदिवासी समाज करतो.Furniture (घराला लाकूड) : सुरक्षित निवारा मिळावा, यासाठी झाप, घर व गोठे बांधले जातात. त्यासाठी लाकूड गरजेचे असते..Fiber (बांबू व वेलींचा वाक) : जंगलातील वनस्पतींमधून मिळणारे धागे विणकामासाठी आणि वस्त्रनिर्मितीसाठी उपयोगात येतात. त्याचबरोबर बांबू, गवत, आणि इतर वनस्पतींचा वापर हस्तकला आणि घरांच्या बांधणीसाठी केला जातो.Fertiliser (कोहणखत) : जंगलातील पानगळ, पालापाचोळा आणि कुजणारे पदार्थ पाण्यासोबत मातीमध्ये मिसळून नैसर्गिक कोहनखत तयार करतात, जे शेतात सुपिकता वाढवण्यासाठी उपयोगी ठरते..Fodder (चारा-वैरण) : पाळीव प्राण्यांसाठी आवश्यक असणारा चारा मुबलक प्रमाणात जंगलातून मिळतो. हा चारा वर्षभर उपलब्ध राहतो, ज्यामुळे प्राण्यांचे पालनपोषण होते. आदिवासी भागातील सर्व पाळीव प्राणी हे जंगलातून मिळणाऱ्या चाऱ्यावर अवलंबून असतात.Water (पाणी) : सर्वच सजीवांसाठी पाणी हे अत्यावश्यक आहे. दाट जिवंत जंगल वा देवराई / बन असेल तरच वर्षभर जिवंत पाण्याचे झुरे, उभेड उपलब्ध होतात..थोडक्यात 6-F व 1-W माणसाला जंगलाकडून मिळतात. आम्ही जंगलाशिवाय राहूच शकत नाही, असे सर्वच वन निवासी समुदाय ठामपणे सांगतात. त्यामुळे कितीही संकट येवोत, सरकारने विस्थापित होण्यासाठी कितीही प्रलोभने दाखवली तरी, आदिवासी वनाबाहेर राहण्यास इच्छुक नसतो. असे हे वनोपजीवी गाव-समाजाचे जंगलाशी अतूट नाते आहे व आदिवासी समाजाची उपजीविका ही वनसंपत्तीवर अवलंबून आहे, यात शंकाच नाही..Nature Preservation: निसर्ग संवर्धनासाठी देशी वृक्ष संवर्धन.जंगलाचा शाश्वत वापरजंगलात मिळणारे विविध वनोपज कोणते हे आपण पाहूयात. सह्याद्रीचा विचार केला तर मध, हिरडा, बेहडा, करवंद, जांभूळ ही महत्त्वाची वन उत्पादने. यांच्या विक्रीतून स्थानिकांना चार पैसे मिळतात. रानभाज्या, कंद मुळे, डिंक, राळ, खेकडे, माशे ते अगदी लहान सहान पशुपक्षी हे सर्व आदिवासींचे पारंपरिक अन्नपदार्थ आहेत. या सर्व घटकांशी संबंधित ज्ञान व कौशल्य आजही आदिवासी समाजात आढळते. काही अपवाद वगळता शाश्वत पद्धतीने या सर्व नैसर्गिक घटकांचे व्यवस्थापन करण्याचे भान व शहाणपण सर्वदूर टिकून आहे. देशभरात झालेल्या नमुना सर्व्हेक्षणांनुसार २५ ते ३० टक्के रोजगार निर्मिती ही लाकडाशिवाय मिळणाऱ्या वन उत्पादनाद्वारे (NTFP- Non Timber Forest Product) होते..वनाधारित शेती व पशुपालन व्यवस्थासद्यःस्थितीत आदिवासींची उपजीविका ही जंगलासह प्रामुख्याने शेती व पशुपालन यांवर अवलंबून आहे. जंगलाशिवाय त्यांची शेती पण होऊ शकत नाही व पशुपालन पण शक्य नाही. जंगल नसेल तर जमीन सुपीक राहत नाही. त्यांच्या भाषेत कोहन खत हे पावसाळ्यात पालापाचोळ्याच्या रूपात जमिनीला मिळते..दुसरीकडे गाई, म्हशी, शेळ्या इ. जनावरांचे कळप पाळणे, दूध काढून खवा बनविणे हा आदिवासी शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय होय. तो करत असताना प्रामुख्याने जंगल, भवतालचे गवताळ कुरण व जलस्रोत हे घटक पशुपालनाचा मुख्य आधार आहे..निसर्गपूजकता व सृष्टीधर्मभारतीय समाजाने निसर्गाला देवत्व बहाल केले आहे. निसर्गातील नानाविध घटकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा स्वभाव भारतीय लोकमानसात पिढ्यान् पिढ्या रुजलेला आहे. भारतातील सर्वच धर्म, जाती, पोटजाती, समुदाय हे निसर्गपूजक जीवनशैलीकडे शाश्वत मूल्य व सृष्टी-धर्म म्हणून पाहतात. या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब सण, उत्सव, भाषा, पेहराव, खाद्यपदार्थ, लोकसाहित्य आदी घटकांत उमटते. अशी ही निसर्गातील नानाविध दृश्य-अदृश्य घटकांना देवत्व बहाल करण्याची रितभात व प्रक्रिया हजारो वर्षे प्राचीन आहे. मानव व निसर्गरूपी देव यांच्या निर्मितीतील गूढ अगम्य आहे. .सारासार विचार केला तर, निसर्गरूपी दैवी शक्तीने मानवाची निर्मिती केली आहे व मानवाने पण जणू काही ऋण फेडण्यासाठी देवदेवता यांची निर्मिती केली आहे. दोन्हीही घटक एकमेकांना पोषक आहेत. एकूणच मानव व देव हे एकमेकांचे सर्जनशील निर्माते म्हणावे लागतील. मानव निर्मित सृष्टी-धर्म व निसर्ग-पूजकता या उत्कट-भव्य अशा परंपरांच्या आधारे समाज व्यवस्था उत्क्रांत झाली आहे, हे मान्य केले तर निसर्गातील जल-जंगल-जनीन-जनावरे आदी घटकांच्या आधारे मानवी जीवन समृद्ध झाले आहे, या विधानाला पुष्टी मिळते. मानव व जंगल यांच्यातील शाश्वत-सह-संबंधाची प्रचिती संत साहित्यात प्रतिबिंबित होते. एकेठिकाणी संत एकनाथ महाराज म्हणतात...एका जनार्दनी मारली बोंब, जन वन स्वयंभ एक झाले...!९४२१३२९९४४vijaysambare@gmail.com(लेखक शेती, पशुपालन व शाश्वत विकास या विषयांचे अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.