Family Success Story: सह्याद्रीची विशाल पर्वतरांग दुर्गदुर्गेश्वर रायगडाला वंदन करीत पुढे पुण्याच्या मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटात उतरते व तेथून पुढे वळणदारपणे भीमाशंकरकडे कूच करते. मोसे खोऱ्यातील याच ताम्हिणीच्या दाट जंगलात पूर्वेला मुळा नदीकाठी धामणओहोळ नावाचे एक शिवकालीन गाव वसले आहे. .याच गावातील शेतकरी नथू भिकाजी काळे (५४ वर्षे) व सौ. मंगल नथू काळे (५० वर्षे) यांची ही जीवनकहाणी आहे. नथू लहानपणी शेती आणि शिक्षणात रमला. मात्र गावात शाळात सातवीपर्यंतच होती. त्यामुळे त्याचे शिक्षण कायमचे तुटले. धुवाधार पावसाच्या या भागात पाच एकर शेती असली, तरी नथू केवळ भात, नाचणी, वरर्ईच्या पलीकडे कोणतेही पीक घेऊ शकत नव्हता..गावातील शेतकरी हरी शेडगे यांची कन्या मंगल केवळ दुसरी शिकलेली. ती नथूची अर्धांगिनी बनली. मंगलची वैशिष्ट्ये म्हणजे ती लहानपणापासून शेतीकाम आणि जनावरे वळायची आणि नथूदेखील तेच करायचा. त्यामुळे एकप्रकारे दोघांचे प्रोफेशन समान होते. शेडगे आणि काळे ही दोन्ही घराणी तशी नात्यागोत्यातली होती. नथू आणि मंगलचे लग्न अवघे १६ हजार रुपयांत झाले..Inspiring Farmer Story: कळसूबाईच्या जंगलातील संसारशाळा.“तेव्हा सर्वत्र जंगल होते. वीज, रस्ते नव्हते. पायवाटांनी लोक ये-जा करीत. रायगडासमोरील निजामपूर गावात बस्त्यासाठी तेव्हा वऱ्हाडी मंडळी निसणीच्या घाटाने चालत गेली. मी तेव्हा १५ गुरे आणि ५० शेळ्यांचा मालक होतो. आमच्या संसाराला गाईगुरांनीच आधार दिला. रानाचा भाजीपाला, घरचं दूध-दही-तूप, नाचणीची भाकरी यावर आमचा उदरनिर्वाह होत होता. मंगल आमच्या घरी आल्यानंतर तिने आमच्या शेतीला वेग दिला. आमचा संसार शांतपणे चालू होता,” असे नथू काळे सांगत होते..या जोडप्याच्या संसारात अचानक मोठा बदल झाला २००० मध्ये ‘लवासा सिटी’ निर्माण झाल्यानंतर. लवासामुळे गावात रस्ता आला. त्यामुळे नथूसह सारे भूमिपुत्र रोजगारासाठी दऱ्याडोंगरातून बाहेर पडले. लवासा शहराचा तयार करण्यासाठी कंपनीने शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतल्या. त्यात नथूची २० एकर जमीन गेली. कंपनीने काही स्थानिक लोकांना कामावर घेतले..नथू त्यापैकीच एक होता. आजही २५ वर्षांपासून नथू लवासामध्येच नोकरी करतो आहे. “मी कंपनीत केवळ १८०० रुपये पगारावर कामाला जात होतो. मंगल घरची शेती सांभाळायची. उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे मी रोज ३२ किलोमीटर जा-ये करीत कंपनीचे काम टिकवून ठेवले. आता २५ वर्षांनंतर माझा पगार ९ हजार रुपये झाला आहे,” असे नथूने आनंदाने सांगितले. नथू आणि मंगलच्या संसाराला मुलगी रेश्मा (शिक्षण बारावी), मुलगा सुभाष व रवींद्र अशी गोड फळे आली आहे..Inspiring Farmer Story: बिबट्यांना धपाटे देणारी जोडी.या जोडीने मुलांना पदवीधर बनविले आहे. सुभाषने जेसीबी विकत घेत स्वतंत्र व्यवसाय चालू केला आहे; तर रवींद्रने आळंदीतून १५ वर्षे मृदंगाचे शिक्षण घेत वारकरी संप्रदायात प्रवेश केला आहे. तो आता उत्तम कीर्तनकार झाला आहे. मंगलाताई सांगतात, की आमचं गाव पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेच्या दऱ्याखोऱ्यात अगदी टोकाला होते. गावात दवाखाना नव्हता. कोणी आजारी पडला तरी डोलीत घालून रायगडाकडील गावांकडे नेला जायचा. एकदा शस्त्रक्रियेसाठी मला होडीने धरण ओलांडून पानशेत जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले होते. माझी तीनही बाळंतपणं मात्र गावातच सुखरूप पार पडली. गावात माझ्या सासूबाईंसह तीन महिला सुईणीचं उत्तम काम करायच्या..सुदैवाने इतक्या दुर्गम भागात राहूनसुद्धा नथू आणि मंगलच्या संसारात कोणतीही मोठी दुःखदायक घटना घडली नाही. “गावात पूर्वीपासून एकमेकांच्या शेतात कामाला जाण्याची परंपरा आहे. त्यामुळे कोणाची शेती पडून राहिली नाही. पूर्वी गावात बांबूतोडीची कामे मोठ्या प्रमाणात चालायची. मी बांबू विक्रीचा देखील व्यवसाय केला. किरकोळ सुखदुःखाचे प्रसंग कोणाच्याही जीवनात येतात; तसे ते आमच्याही जीवनात आले..आमची किरकोळ भांडणंही व्हायची. पण, मुलेबाळे झाल्यानंतर संसाराची गाडी खूप शांतपणे चालू लागली. आता मुलगी आणि एका मुलाचे लग्न झाले आहे. रवींद्रचे लग्न बाकी आहे. त्याचा संसार झाला, की आमच्या जीवनाचं सार्थक होईल. आता गावात रस्ते, गाड्या, वीज, मोबाइल आले आहेत. मात्र आम्हा दोघांनाही शहराचे आकर्षण नाही. आम्ही हा गाव कधीही सोडणार नाही,” असे जीगरबाज नथूने हसतहसत सांगितले आणि हाती विळा घेत गवत कापण्यासाठी तो ताम्हिणी घाटातील रानाकडे मंगलसह रवाना झाला.: नथू काळे ९९६०३१२५५६.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.