शेतकरी नियोजन । पीक ः ढोबळी मिरचीशेतकरी : निवृत्ती पुंडलिक पगार , गाव : आमोदे, ता. नांदगाव, जि. नाशिकएकूण क्षेत्र : ८ एकर, ढोबळी मिरची क्षेत्र : अर्धा एकरनाशिक जिल्ह्यातील आमोदे (ता. नांदगाव) येथील निवृत्ती पुंडलिक पगार यांची ८ एकर बागायती शेती आहे. त्यापैकी काही क्षेत्रावर दरवर्षी त्यांचे भाजीपाला लागवडीचे नियोजन असते. मागील दहा वर्षांपासून त्यांनी भाजीपाला उत्पादनात सातत्य राखले आहे. यावर्षी अर्धा एकर क्षेत्रावर ढोबळी मिरची लागवड करण्यात आली आहे. दरवर्षी जुलै महिन्यात प्रामुख्याने शेडनेटमध्ये ढोबळी मिरची लागवडीचे नियोजन केली जाते. .उत्पादन वाढीच्या अनुषंगाने पिकाचे नियोजन करताना वाण निवड हा महत्त्वाचा विषय असतो. कीड रोगास प्रतिरोधक, उत्पादन वाढ या बाबी विचारात घेतल्या जातात. वाण निवडीवेळी गुणवत्तेच्या अनुषंगाने हिरव्या गर्द रंगाची व चार कप्पे असलेली फळे यासह चकाकी व काढणीपश्चात टिकवणक्षमता उत्तम असलेल्या वाणाचा विचार केला जातो..Capsicum Crop : धुळीमुळे मिरची पिकाचे चार लाख रुपयांचे नुकसान.लागवडीचे नियोजन लागवडीपूर्वी नांगरणी, माती पलटी मारणे आदी मशागतीची कामे केली जातात. साधारण २० गुंठे क्षेत्रात चांगले कुजलेले शेणखत ४ ट्रॉली पसरवून घेतले जाते. त्यानंतर माती भुसभुशीत करून रोटाव्हेटर मारून शेणखत मातीमध्ये मिसळले जाते. ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे ४ फूट अंतर ठेवून बेड तयार केले जातात. त्यावर भरखते म्हणून १०:२६:२६, सिंगल सुपर फॉस्फेट व निंबोळी पेंड यांचे मिश्रण करून वापर केला जातो. पंजाने ते बेडवर चाळले जाते..इनलाईन ठिबकच्या लॅटरल पसरवून घेतल्या जातात. त्यावर तणनियंत्रण व मुळी विकसित होण्यासाठी २५ मायक्रॉन जाडीचा पॉलिमल्चिंग पेपर अंथरला जातो. सर्व पूर्वतयारी झाल्यानंतर लागवड नियोजन करताना दरवर्षी रोपवाटिकांमध्ये रोपांची आगाऊ मागणी नोंदवली जाते. त्यानुसार गुणवत्तापूर्ण रोग विरहित ४० ते ४५ दिवसांची दर्जेदार रोपे लागवडीवेळी उपलब्ध केली जातात. अर्धा एकरात साधारणतः साडेचार ते ५ हजार रोपांची आवश्यकता भासते..Modern Farming: गोवेल गावात आधुनिक शेतीची क्रांती.दोन रोपांमध्ये १.५ फूट अंतर ठेवून झिगझॅग पद्धतीने रोपांची लागवड केली जाते. लागवड झाल्यानंतर रोपे स्थिरावण्यासाठी अन्नद्रव्य आणि सिंचनाचे काटेकोर नियोजन केले जाते. लागवड केल्यानंतर ४ दिवसांपासून पुढे दर चार दिवसाच्या अंतराने रासायनिक कीटकनाशक व बुरशीनाशकांची आळवणी केली जाते. अन्नद्रव्यांवर होणारा खर्च नियंत्रित करण्यासाठी व अचूक खत व्यवस्थापनासाठी माती व पाणी परिक्षण केले जाते. त्यानुसार खतांचे नियोजन करण्यावर भर दिला जातो. यासह शेणखत व स्लरीचा वापर करण्यास प्राधान्य दिले जाते..लागवड केल्यानंतर रोपे २५ ते ३० दिवसांची झाल्यानंतर दोऱ्याच्या साह्याने तारेवर रोपांची बांधणी केली जाते. या काळात अन्नद्रव्ये, सिंचन,कीड व रोग व्यवस्थापन याकडे लक्ष देऊन कामकाज केले जाते. पीकवाढीच्या अवस्थेत तसेच फळांची काढणीदरम्यान निरीक्षणे नोंदवून पीक व्यवस्थापन केले जाते. ज्यामध्ये फूलगळ कमी होऊन उत्पादनवाढीकडे लक्ष दिले जाते..Modern Farming: शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनातून तंत्रशुद्ध शेतीकडे वाटचाल.खत व्यवस्थापनपिकाच्या वाढीच्या अवस्थेत रासायनिक खतांचे नियोजन करण्यासाठी वेळापत्रक निश्चित केले आहे. लागवड ते काढणी असा ६ महिन्यांचा हंगाम असतो. यामध्ये झाडाची वाढ, फुलधारणा, फळाची पक्वता होण्यासाठी नत्र, स्फुरद आणि पालाश यांची संतुलित मात्रा दिली जाते. यासह सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करून पिकांची गरज पूर्ण केली जाते. यासह बोरॉन, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह, जस्त यांची मात्रा विद्राव्य पद्धतीने दिली जाते. पीक वाढीच्या अवस्थेत १९:१९:०, ०:१२:६१ या विद्राव्य खतांचा वापर केला जातो. ही मात्रा तयार केलेल्या वेळापत्रकानुसार दिली जाते. पीक वाढीच्या अवस्थेत १३:४०:१३, १३:०:४५, तर उत्पादन वाढीसाठी व फुगवणीसाठी ०:५२:३४, १३:०:४५ या विद्राव्य खतांच्या मात्रा दिल्या जातात..पीक संरक्षणढोबळी मिरची पिकावर प्रामुख्याने थ्रीप्स, भुरी, डाऊनी, मूळकूज यांचा प्रादुर्भाव होतो. या कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी शिफारशींनुसार रासायनिक व जैविक बुरशीनाशकांचा वापर होतो. सूत्रकृमी नियंत्रणासाठी पिकाभोवती झेंडू लागवड केली जाते. यासह भुरी, करपा या रोगांसह विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव देखील काही प्रमाणात जाणवतो. त्यासाठी पिकाचे नियमित निरिक्षण करून शिफारशीनुसार बुरशीनाशकांच्या वापरास प्राधान्य दिले जाते. पिकामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी चिकट सापळ्यांचा वापर केला जातो. यामुळे पीक संरक्षणावर होणारा खर्च नियंत्रित करणे शक्य होते..Modern Farming Equipment: प्रगत शेतीसाठी आधुनिक यंत्रे, तंत्रज्ञानाचा वापर.काढणीपश्चात व्यवस्थापनरोप लागवडीनंतर साधारणतः ५५ ते ६० दिवसांनी ढोबळी मिरचीची काढणी सुरू होते. सुरुवातीच्या टप्प्यात उत्पादन कमी असते. मात्र नंतर टप्प्याटप्प्याने उत्पादन वाढत जाते. त्यानुसार मजुरांची उपलब्धता करून तोड्यांचे नियोजन केले जाते. या हंगामातील पहिला तोडा साधारण ऑगस्ट महिन्याच्या शेवटी करण्यात आला. त्यावेळी कमी उत्पादन मिळाले. मात्र हळूहळू उत्पादनात वाढ होत गेली. आत्तापर्यंत साधारण ५ तोडे झाले आहेत. त्यातून सरासरी १७० क्रेट उत्पादन मिळाले आहे. पुढील ४ महिने तोडे होत राहतील. साधारण १० दिवसांनी तोडे घेतले जातात..प्रतवारीवर भरढोबळी मिरचीची तोडणी केल्यानंतर फळे एकत्र आणून मजुरांमार्फत हाताळणी व प्रतवारी करण्यावर भर दिला जातो. प्रतवारीनंतर एकसारखा माल बाजारात नेण्यासाठी क्रेटमध्ये भरला जातो. मालाची प्रतवारी केल्याने बाजारात चांगले दर मिळण्यास मदत होते. योग्य व्यवस्थापन केल्याने सरासरी १०० ते २०० ग्रॅम वजनाच्या ढोबळी मिरचीचे उत्पादन मिळते. यासह गुणवत्तापूर्ण उत्पादनात सातत्य असल्याने व्यापाऱ्यांकडून देखील चांगली मागणी असते. .उत्पादित मालाची स्थानिक मालेगाव बाजारात विक्री केली जाते. मागणी आणि दरांचा अंदाज घेऊन वाशी, सुरत येथे देखील ढोबळी मिरची विक्रीसाठी पाठवली जाते. उत्पादनासोबत बाजारपेठेचा अंदाज घेऊन शेतमाल विक्री केल्यास आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.-निवृत्ती पगार, : ९३७०७६१९३५, (शब्दांकन : मुकुंद पिंगळे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.